Next
भारताची प्राचीन ज्ञान-विज्ञान परंपरा
BOI
Sunday, July 08, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this story

पांढरीचे टेकाड. याच्या उत्खननात एखादा राजवाडा किंवा प्राचीन वस्ती उजेडात येऊ शकते.डेक्कन कॉलेजचे (विद्यापीठ) कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी अलीकडेच केलेल्या संशोधनानुसार, आर्य बाहेरून आलेले नसून, ते इथलेच होते, हे ‘डीएनए’च्या अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. याचा अर्थ, पुरातत्त्व आणि प्राचीन वाङ्‌मयाचा एकाच वेळी अभ्यास करण्याची गरज आहे. भारताची प्राचीन ज्ञान-विज्ञान परंपरा अतिशय अभिमानास्पद अशी आहे. त्याविषयी लिहीत आहेत ज्येष्ठ अनुवादक, लेखक आणि पुरातत्त्व अभ्यासक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
...........
जगातील सर्वांत प्राचीन वाङ्‌मय म्हणजे आपले चार वेद. महर्षी व्यासांनी आधीच अस्तित्वात असलेल्या हजारो ऋचांचे संपादन करून, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे त्याचे चार भाग केले. वेगवेगळे विषय त्यात समाविष्ट आहेत. त्यांच्या लेखनाचा काल पाच ते दहा हजार वर्षांपूर्वीचा आहे. आपल्याकडे कित्येक ज्ञानशाखा त्यानंतर विकसित होत गेल्या. नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला इत्यादी ठिकाणच्या विद्यापीठांमधून त्यांचे अध्यापन-अध्ययन होत असे. हजारो विद्यार्थी त्याचा लाभ घेत. पुढे परकीय आक्रमणांमुळे ही ठिकाणे आणि कित्येक ग्रंथ नष्ट झाले. असंख्य ग्रंथ तिबेट, चीन, जर्मनी इत्यादी देशांमध्ये नेण्यात आले. अस्त्रविद्या, विमानविद्या, शल्यकर्म, प्रसूतिशास्त्र, युद्धशास्त्र अशा शेकडो शास्त्रांचा प्रत्यक्ष उपयोग केला जात होता. पुढे काही शतके ही ज्ञानपरंपरा खंडित झाल्यामुळे आपल्याकडे खरोखर या विद्या होत्या का, अशी शंका लोकांना येऊ लागली. ब्रिटिशांच्या शासनकालात तर ‘भारत हा एक अडाणी, अविकसित देश होता,’ या विचाराला खतपाणी मिळाले. सिंधू संस्कृती उजेडात आल्यानंतर त्या कल्पनेला पहिला धक्का बसला आणि सारे जग जग भारताच्या प्राचीन इतिहासाकडे कुतुहल, आश्चेर्य आणि आदराने पाहू लागले.

डेक्कन कॉलेजचे (विद्यापीठ) कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी लिहिलेल्या ‘Ancient Indian Knowledge System : Archaeological Perspective’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. त्या वेळी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय भटकर (कुलपती, नालंदा विद्यापीठ), डॉ. गो. बं. देगलूरकर (माजी कुलपती, डेक्कन कॉलेज) आणि डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) हे विद्वज्जन उपस्थित होते. भारताच्या प्राचीन ज्ञानविज्ञानाबद्दल त्यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. इतिहासाच्या साधनांमध्ये वाङ्‌मयीन, शिलालेख, मुद्रा-नाणी, उत्खननाद्वारे मिळणाऱ्या भौतिक गोष्टी यांचा उपयोग पुरावे म्हणून केला जातो. त्या सगळ्यांत वाङ्‌मयीन साहित्याला सर्वांत कमी महत्त्व दिले जात होते. पुरातत्त्व हे एक शास्त्र आहे; परंतु उत्खननांमधून मिळणाऱ्या वस्तूंचे प्रमाण अत्यंत अल्प असते. त्यावरून काढण्यात येणारे निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात. नव्याने मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे त्यात बदल/सुधारणा होऊ शकते. उदाहरणार्थ, महाभारत ही दंतकथा आहे अशी प्रथम समजूत होती. त्यानंतर, त्यात उल्लेख केलेल्या ठिकाणांमध्ये उत्खनने केल्यानंतर तो इतिहास आहे, हे मान्य झाले. आर्यांचे भारताबाहेरून झालेले आक्रमण, या विषयावर हजारो पाने प्रसिद्ध झाली. काही थोड्या लोकांनी त्याविरुद्ध आपली मते मांडली होती. आता तो सिद्धांत मागे पडला आहे. डॉ. वसंत शिंदे यांनी अलीकडेच केलेल्या संशोधनानुसार, आर्य बाहेरून आलेले नसून, ते इथलेच होते, हे ‘डीएनए’च्या अभ्यासावरून सिद्ध झाले आहे.

मोहेंजोदडोमधील पोहण्याचा प्रशस्त तलाव.याचा अर्थ, पुरातत्त्व आणि प्राचीन वाङ्‌मयाचा एकाच वेळी अभ्यास करण्याची गरज आहे. जुन्या काळी यंत्र-तंत्र आणि मंत्र या तीन गोष्टींना महत्त्व होते. युद्धात अस्त्र सोडताना मंत्राचा उच्चार करावा लागे. आता मंत्र जरी विस्मरणात गेले असले आणि तथाकथित विज्ञानवादी त्याला दंतकथा किंवा थोतांड मानत असले, तरी ओंकार उच्चारणामुळे निर्माण होणारी ऊर्जा विज्ञानाने मान्य केली आहे. संगीताचे वनस्पती आणि जनावरांवर होणारे शुभ परिणाम सिद्ध झाले आहेत. ‘आपल्याकडे अण्वस्त्रे होती, तर जुन्या काळात वीजही असली पाहिजे,’ असे उद्गार नुकतेच एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने काढले होते. तेही कदाचित नजीकच्या काळात सिद्ध होईल. वेद-उपनिषद-पुराणादि वाङ्‌मय संस्कृतमध्ये असल्याने त्या भाषेच्या विद्वानांची संशोधनासाठी गरज आहे. ते लक्षात घेऊनच जानेवारी २०१८ मध्ये डेक्कन कॉलेजने ‘विश्वा वेद-विज्ञान संमेलन’ भरवले होते. ज्ञान-विज्ञान क्षेत्रात आता एक नवे पर्व सुरू झाले आहे, असे म्हणता येईल.

राखीगढी (हरियाणा) उत्खननाचे दृश्य.ब्रिटिशांच्या पुढाकाराने भारतात पुरातत्त्व विषयाचा अभ्यास आणि उत्खनन सुरू झाले. इथली संस्कृती, इतिहास, समाजरचना याबद्दल अत्यंत अपुरी माहिती असल्यामुळे, मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे त्या त्या संशोधकाच्या कल्पनाशक्तीनुसार निष्कर्ष काढले गेले. उदा. मोहेंजोदडोच्या उत्खननानंतर, आर्यांनी बाहेरून येऊन इथल्या अनार्यांना पराभूत केले, हा सिद्धांत गाजला. ‘Indra stands accused’ हे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. म्हणजे ‘इंद्र नावाच्या कोणी आर्य राजाने इथल्या लोकांना नेस्तनाबूत केले, म्हणून तो दोषी ठरतो.’ वेदांतील ऋचांच्या आधारे हे ठरविण्यात आले. वास्तविक, इंद्र ही एक देवता आहे. पर्जन्यवृष्टीशी तिचा संबंध आहे, असे मूळ रूपक आहे. त्याबद्दल अज्ञान असल्यामुळे चुकीचे सिद्धांत मांडण्यात आले. आपल्या संशोधकांनीदेखील अनेक वर्षे तेच उचलून धरले. त्या मानसिक दास्यातून बाहेर पडण्यासाठी फार मोठा काळ जावा लागला. आपला इतिहास आणि इतिहासपूर्व काळ हजारो वर्षे मागे जातो, हे मान्यच नसल्याने, वाङ्‌मय-निर्मितीचा काळ किंवा निरनिराळ्या राजवटी, कला-विज्ञानामधील प्रगती या सर्व गोष्टी इसवी सनपूर्व तिसरे ते चौथे शतक ते इसवी सनाचे तिसरे-चौथे शतक या कालावधीत कोंबण्यात आल्या. वेदनिर्मिती किंवा महाभारत काळ हा इसवी सनपूर्व १५०० असा निश्चितत करण्यात आला. वाङ्‌मयीन पुराव्यांनुसार इसवी सनपूर्व ३१०२मध्ये कलियुग सुरू झाले आणि कौरव-पांडव युद्धानंतर युधिष्ठिर सिंहासनावर बसला; पण त्या सगळ्या भाकडकथाच ना! प्राचीन वाङ्‌मयातील संदर्भ आणि खगोल- शास्त्राच्या आधारे कालनिश्चिती करता येते, हे आता सिद्ध झाले आहे. योग्य संशोधनाद्वारे अनेक राजांच्या वंशावळी तयार करण्यात आलेल्या आहेत. संशोधनाच्याही काही शास्त्रीय पद्धती आहेत. त्यांच्या आधारे सिद्धांत मांडले पाहिजेत. ‘मला असे वाटते’ किंवा ‘मला नाही वाटत’, हे संशोधनात बसत नाही. म्हणून संशोधकाची मानसिक-नैतिक (Mental-Moral) प्रगल्भताही विचारात घ्यावी लागते.

गुजरातमधील लोथलचे प्राचीन बंदर.महत्त्वाचा अजून एक विषय असा आहे, की रानटी अवस्थेपासून मानव आजच्या प्रगत अवस्थेपर्यंत क्रमश: हळूहळू पोचला, असे मानण्यात येते. अशा प्रगतीमध्ये अनेक चढउतार असतात. सिंधू संस्कृती उदयास आली, तिचा उत्कर्ष झाला आणि पुढे ऱ्हास झाला. अनेक राजवटींमध्ये तसेच घडले. सोन्याचा धूर निघण्याचा काळ होता, तसेच अंधारयुगही मध्येच आले. राजधानीच्या ठिकाणी जे वैभव, सुखसोयी असतील, त्या छोट्या खेड्यांमध्ये दिसणार नाहीत. याचा अर्थ तो देश मागासलेला आहे, असा होत नाही. भारत हा अण्वस्त्रधारी देश आहे, म्हणजे गावागावात ती अस्त्रे ठेवलेली नाहीत. हजारो गावांत अजून वीज नाही की स्वच्छतागृहे नाहीत. तरीही भारत आज एक आघाडीचा प्रागतिक देश आहे.

सर्वसामान्य लोकांना संशोधनांची दशा आणि दिशा ठाऊक नसते. ती अवगत करून देण्याची जबाबदारी शास्त्रज्ञ, लेखक आणि माध्यमांची आहे. आपला प्राचीन इतिहास निश्चि तच अभिमानास्पद आहे. इथले अश्मयुग २० लाख वर्षांइतके मागे जाते. तसेच विज्ञान-तंत्रज्ञानाचा आरंभ इसवी सनपूर्व ७०००पासून झाला. आर्थिक-राजकीय स्थैर्याबरोबर लेखन आणि कलांचा उत्कर्ष होत गेला. वास्तुरचना, परदेशाबरोबर व्यापार आणि अशा अनेक क्षेत्रांत आपला देश प्रगत होता. पुस्तकरूपाने सोप्या भाषेत आधी आपल्या जनतेला आणि साऱ्या जगाला ते सांगण्याची गरज आहे. त्याला सुरुवातही झाली आहे. त्यासाठीच वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन आणि देशाच्या प्राचीन परंपरेचे भान आणि अभिमान, या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Uttara Shinde About 224 Days ago
Very nicely written and explained in the layman language. Thank you.
0
0

Select Language
Share Link