Next
झुंज श्वासाशी
प्रसन्न पेठे
Saturday, November 25 | 03:32 PM
15 0 0
Share this story

आजारी माणसाला उपचाराच्या शेवटच्या टप्प्यांत ऑक्सिजनची गरज भासते; पण ज्याचे हॉस्पिटलमधले प्राथमिक उपचारच ऑक्सिजन घेऊन सुरू होत असतील त्याच्या आयुष्याची शाश्वती किती कठीण? ज्याला वयाच्या १६व्या वर्षीच त्यापुढचा प्रत्येक दिवस ‘बोनस’ असणार आहे, हे कळलं असेल, त्याच्या मनाची घालमेल इतरांना कशी कळावी? मुकुल गरे यांनी कुमार वयापासून ते वयाची पन्नाशी गाठेपर्यंत दिलेल्या लढ्याची प्रेरणादायी कथा ‘झुंज श्वासाशी’ या पुस्तकातून मांडली आहे. त्या पुस्तकाबद्दल...
.....................
आपल्या आसपासची कितीतरी माणसं किती छोट्या छोट्या प्रश्नांचे बागुलबुवा करून त्याच्या ओझ्याखाली दबून गेलेले आपण पाहत असतो. आपल्यापेक्षा सुस्थितीतल्या लोकांकडे पाहात त्यांचं नशिबाला दोष देणं सुरू असतं. कारण, कदाचित असं दोष देणं सोपं असतं, त्या समस्येशी दोन हात करून तिच्यावर विजय मिळवण्यापेक्षा!
 
भारतात जन्मणाऱ्या दर एक लाख मुलांपैकी ५० जणांना असणारी गंभीर समस्या म्हणजे ‘VSD (हृदयाला छिद्र असणे). ही समस्या मुकुल गरे यांना जन्मतःच उद्भवली होती; पण तिचं निदान इतक्या उशिरा झालं, की तोपर्यंत शस्त्रक्रिया करून ती बरी करण्याच्या शक्यता संपल्या होत्या आणि केवळ येणाऱ्या मृत्यूशी लढा देणं एवढंच हातात उरलं होतं; पण मुकुल गरे यांनी आपल्या दुर्धर समस्येशी टक्कर देण्याचा चंग बांधला. आणि काही दिवसांवर असू शकणारं त्यांचं मरण आज वयाच्या पन्नाशी पार करेपर्यंत त्यांनी दूर ठेवलं आहे. त्याचीच प्रेरणादायी कथा त्यांनी ‘झुंज श्वासाशी’ पुस्तकामधून जगासमोर आणली आहे.

कल्पना करा, केवळ सोळा वर्षांचा एक मुलगा. वर्ध्यासारख्या ठिकाणच्या चांगल्या घरातला. आईवडील सुशिक्षित. मोठा भाऊ-बहीण दोघं हुशार. हाही स्वतः अनेक खेळांत हुशार. अचानक दम्याची लक्षणं सुरू झाली. ‘बालदमा’ असं सुरूवातीचं निदान खोटं ठरून, पुढे अधिक तपासण्या केल्यावर हृदयाला छिद्र असल्याचं समजलं. तिथून आयुष्य पूर्ण बदललं. इतर मित्र भविष्याची स्वप्नं बघत होते, तेव्हा हा ‘कसं जगू?’ या भीतीच्या सावटाखाली एकेक दिवस ढकलत होता. त्या वेळी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळींनी त्याला उमेद दिली -

‘मंज़िल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है
हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है
जिंदगी जख्मों से भरी है, वक़्त को मरहम बनाना सीख लो-
हारना तो है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सिख लो’

आणि त्याची मरणाशी लढाई सुरू झाली. मोठ्या भावाच्या मुंबईच्या मेहुण्यांच्या  (डॉ. नितीन गोखले) सल्ल्याने पुढच्या तपासण्या, उपचार सुरू झाले. सायन्स सोडून मग त्याने कॉमर्सची पदवी घेतली आणि एकीकडे औषधं सांभाळत अकोल्यात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरी सुरू केली. बाणेदारपणा आणि स्वभिमानापायी वरिष्ठांची हांजीहांजी न केल्याने ती गमवावी लागली; पण तो हरला नाही. पुढे पुण्याला नोकरी मिळाली आणि तीही गमवावी लागली. नंतर अभिनेता बनण्याच्या स्वप्नामुळे पुढे मुंबईला जाऊन छोट्या भाड्याच्या जागेत राहून अभिनयाचा कोर्स केला. हिंदी मराठी सीरियल्समध्ये छोटी छोटी कामं मिळवली.
 
अचानक एक दिवस हातात भगवद्गीता आली आणि तिथपासून आयुष्य श्रीकृष्णमय होऊन गेलं. गावाला परतणं झालं. कृष्णावर पूर्ण श्रद्धा ठेवून आजाराला तोंड देणं सुरू झालं. घरी ऑक्सिजन सिलिंडर ठेवून ऑक्सिजन घेत घेत मृत्यूशी लढणं सुरू होतं. शरीरात वाढलेल्या हिमोग्लोबिनमुळे महिन्यातून चार-पाचवेळा शरीरातून रक्त काढण्याची वेळ आली, तीही सर्वांत जाड १८ नंबरची सुई वापरून! दरम्यान यवतमाळमधल्या एका मित्राबरोबर स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन भागीदारीत त्यांनी दुकान सुरू केलं. पुढे त्या मित्राने दगा दिला आणि दोन लाखाचं कर्ज डोक्यावर आलं. त्यातच नागपूरहून रात्रीच्या बसने वर्ध्याला येताना दरोडेखोरांनी बसवर दरोडा टाकला आणि मारहाणीत प्रचंड जखमी केलं. पण कुण्या सावरकर नावाच्या भल्या माणसाच्या मदतीने वैद्यकीय मदत मिळून जीव वाचला. पुढे ते पत्रकारिता शिकले आणि पुन्हा मुंबई गाठली. पुन्हा छोट्या भाड्याच्या जागेत रूम शेअर करून राहणं आणि छोट्या छोट्या सीरियल आणि सिनेमातल्या भूमिका मिळवणं सुरू झालं.

अचानक अमरावतीहून प्रा. उषा पाचघरे यांचा लग्नाच्या प्रस्तावाचा फोन आला. त्यांचे पती अपघातात गेले होते आणि एक मुलगा होता. पुढे देवाच्या दयेने काही अतर्क्य आणि अविश्वसनीय गोष्टी घडत घडत त्यांचं लग्नही झालं. मग परीक्षा पाहणारा खूप कठीण काळ आयुष्यात आला. पुन्हा एकदा मृत्यू दारापर्यंत आला आणि परत गेला. त्या काळात पुण्याच्या डॉ. प. वि. वर्तकांची त्यांना खूप मदत झाली.

अशा तऱ्हेने आयुष्यात अत्यंत खडतर काळ अनुभवत, अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड देत देत मुकुल गरे हा माणूस आज स्वतःचं घर, चांगली नोकरी, प्रेमळ कुटुंब, ह्युंदाई अॅक्सेंट कार, जोडलेले जिवाभावाचे मित्र अशी संपत्ती घेऊन आपल्या हृदयाच्या छिद्राबरोबर आजही लढत, पण हसत जगतो आहे.
 
मुकुल गरेश्रीकृष्णावर अपरंपार भक्ती असल्याने त्याने ‘आर्ट ऑफ डाइंग’ शिकून इथपर्यंत वाटचाल केली आहे. आजही अभिनयाचं वेड जपणं चालूच आहे. काही वर्षांपूर्वी त्याचा मुंबईला जाण्याचा निर्णय ऐकून एक मित्र बोलून गेला होता, ‘अरे, मरायचं आहे तर इथं मर ना. कशाला त्या मुंबईला बेवारस मरायला जातोस?’ त्यावर मुकुल गरेंचं उत्तर होतं, ‘मी मुंबईत मरायला जात नाहीये. तसं तर मी मरणार आहेच; पण बेवारस म्हणून नाही, तर ‘ब्रेकिंग न्यूज’ बनूनच.’ ..आणि आज त्यांची ही ‘श्वासाची झुंज’ खरोखरच ब्रेकिंग न्यूज झाली आहे. प्रेरणादायी ब्रेकिंग न्यूज!! 

झुंज श्वासाशी 
लेखक : मुकुल गरे  
प्रकाशक : २१५९/२, कॉन्टिनेन्टल प्रकाशन,  ना. सी. फडके चौक, विजयानगर, पुणे-३०
पृष्ठे : ११३  
मूल्य : १५० रुपये  

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link