Next
‘पंतप्रधानांनी देशातील राजकीय कार्यसंस्कृती बदलली’
अनिल शिरोळेंच्या कार्य अहवालाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
प्रेस रिलीज
Saturday, November 17, 2018 | 04:04 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण राजकीय कार्यसंस्कृती बदलली आहे. यापूर्वी निर्णय न घेणे हाच मोठा निर्णय आणि धोरणलकवा हीच देशाची अवस्था होती. ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन लोक कित्येक निवडणुका जिंकले; पण गरिबांसाठी कधीच काम केले नाही. मोदींनी आणलेल्या कार्यसंस्कृतीत देशातील गरिबाच्या जीवनात परिवर्तन आणण्याच्या दृष्टीने प्रथम विचार केला गेला,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.     

खासदार अनिल शिरोळे यांच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कार्याच्या अहवालाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यसभेचे खासदार संजय काकडे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, विजय काळे, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी शिरोळे यांच्या खासदारकीच्या कारकीर्दीचे कौतुक करून पुण्याच्या विकासासंबंधीच्या विविध योजनांना राज्य व केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला व त्यासंबंधित दाखलेही दिले.  

शिरोळे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘शिरोळे हे मितभाषी असले, तरी दृढ स्वभावाचे आहेत. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करतात. एक स्वच्छ, निर्मळ प्रतिमा त्यांनी जपली आहे. एक सच्चा प्रामाणिक माणूस म्हणून त्यांचे वर्णन करता येते. राजकारणात ज्यांनी ४० वर्षे काम केले अशा व्यक्तीने अशी प्रतिमा जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.’

‘खासदारांनी देशाच्या संचलनाच्या, विकासाच्या चर्चांमध्ये व धोरणनिर्मितीत सहभागी व्हायला हवे अशी आपली प्राथमिक अपेक्षा असते; परंतु ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून पाठवतो त्यातील अनेकजण सभागृहात महत्त्वाचे विषय सुरू असताना कँटीनला बसलेले असतात किंवा कुठेतरी फिरत असतात अशी दुर्दैवी स्थिती अनेकदा दिसून येते,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

अनिल शिरोळे हे, मात्र संसदेत कायमच पूर्णवेळ उपस्थित असतात आणि पुणे शहर व देशासंबंधीचे प्रश्नही मांडत असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. खासदार संजय काकडे, पालकमंत्री गिरीश बापट यांनीही शिरोळे यांच्या मितभाषी, परंतु पाठपुरावा करण्याच्या स्वभावाचे कौतुक केले.

शिरोळे यांच्या कार्यकाळात त्यांनी सादर केलेला हा दुसरा कार्य अहवाल आहे. या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘पूर्वी केवळ स्वप्नवत वाटणारी मेट्रो तसेच पीएमआरडीए, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण, परवडणारी घरे अशी अनेक विकासकामे आता शहरात प्रत्यक्षात दिसू लागली आहेत. मुख्यमंत्र्यांची पुण्याच्या संदर्भातील सकारात्मक निर्णयांची संख्या पाहता तेही पुणेकरच आहेत असे म्हणावे लागेल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search