Next
लता मंगेशकर... एकाच आवाजातल्या अनंत भावच्छटा!
BOI
Saturday, September 28, 2019 | 06:00 AM
15 0 0
Share this article:

प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेले लता मंगेशकर यांचे छायाचित्र (छायाचित्र सौजन्य : लता मंगेशकर यांचे ट्विटर अकाउंट)

लताबाईंच्या आवाजाला साध्या फूटपट्ट्या का लावता येत नाहीत? एकच आवाज शिळा, एकसुरी न होता, अनेक तपं आपल्यावर अधिराज्य गाजवतो, हे कसं शक्य झालं असावं? हा आवाज कधीच सगळ्यांसाठी सारखा भासला नाही... सगळ्या भावनांसाठी तो एकाच प्रकारे लावण्यात आला नाही... प्रत्येक भावनेचा त्या त्या व्यक्तिरेखेसाठी असलेला सूक्ष्म पदर त्या आवाजातून समोर आला. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आज (२८ सप्टेंबर २०१९) ९० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने, प्रसिद्ध गायिका आणि चित्रपट संगीत अभ्यासक डॉ. मृदुला दाढे-जोशी यांनी लताबाईंच्या आवाजातल्या अनंत भावच्छटांचा घेतलेला हा वेध!
.....
लता मंगेशकर! विश्वाच्या निर्मात्यानं हे विश्व निर्माण केल्याबद्दल स्वतःलाच दिलेलं हे बक्षीस! या नावातली सात अक्षरं म्हणजे सप्त स्वर असं म्हणू शकलो असतो; पण त्या उरलेल्या पाच स्वरांचं काय? या सम्राज्ञीपुढे ठेवलेल्या बाराही अलंकारांना तिने स्वतःच्या गळ्यात मानाची जागा दिली... त्यांना खुलवलं. त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान वाटावा अशा डौलात, अशा दिमाखात वाढवलं... आणि ते स्वर या राणीच्या गळ्यात असे काही बहरले, की त्याची जागा विश्वातला कुठलाही गळा, कुठलाही वाद्य कधीच घेऊ शकलं नाही... कारण या गळ्यातली स्वरवेल जेव्हा थरथरली, तेव्हा कुठल्या तरी अनामिक दैवी सुगंधाची फुलंच ओठावर उमलली. या आवाजाची व्याख्या करण्याच्या फंदात शहाण्यांनी पडू नये. कारण शब्दात बांधायला तो काही कुठला धातू नव्हे किंवा भूमितीचं प्रमेय नव्हे... ‘लता’साठी भाषासुद्धा नवीच जन्माला घालावी... उपमाही नव्याच... कारण त्या आवाजाची लिपीच वेगळी आहे... कष्टात घालवलेलं बालपण म्हणजे लता नव्हे... वाटेल तिथे पोहोचू शकणारा गळा म्हणजे लता नव्हे... भावनेचे पदर उलगडू शकणारा लवचिक आवाज म्हणजे लता नव्हे... सूक्ष्म हरकती, मुरक्या स्वच्छ ऐकू येणं म्हणजे लता नव्हे... ऐकणाऱ्याचा श्वास कोंडावा असा दमश्वास म्हणजे लता नव्हे... दोन ओळींत लपलेला भावार्थ आपल्या आवाजात अचूक दाखवण्याचं कसब म्हणजे लता नव्हे आणि प्रत्येक अभिनेत्रीसाठी वेगळा टोन आवाजात आणू शकणं म्हणजेही लता नव्हे... लता म्हणजे या सगळ्या गोष्टींचं एकत्र येणं, तेही योग्य प्रमाणात... म्हणूनच ते गाणं रुक्ष हरकतींनी कोरडं होत नाही... नुसतंच तुम्हाला दम कोंडून अचंबित करत नाही... अति लाडिक होत नाही... अति भावबंबाळ, नाटकी होत नाही... गायन या विषयातल्या सगळ्या सौंदर्यकल्पना एकत्र येऊन घडवलेलं प्रमाणबद्ध शिल्प आहे लता मंगेशकर...! 

सर्व छायाचित्रांचा स्रोत : लता मंगेशकर यांचे ट्विटर अकाउंट

काही आवाज आपल्याला आपल्यातले वाटतात... काही आवाज किंचित परके, पण तरीही हवेहवेसे... तर काही आवाज इथले नाहीत हे कळूनही ‘त्या’ दुनियेशी आपलंही नातं जोडण्याच्या विलक्षण ताकदीचे... लता हा आवाज ‘त्या’ प्रकारचा... संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वतःचा मखमली रस्ता दिला या आवाजानं. सगळा खडबडीतपणा स्वतःच्या त्या मुलायम आवाजाखाली दडवून हा रस्ता केशराच्या शेतातून नेला... आपल्या पायाखाली सतरंजी असण्याचीसुद्धा पात्रता नसणाऱ्यांसाठी पायाखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या त्या या आवाजानं... त्या आवाजाला ‘दैवी’ हे विशेषण आपण लावतो... पण देवाचा आवाज आपण ऐकलाय का? मग लताबाईंचा आवाज दैवी कसा? तर देवालासुद्धा आपला आवाज असा असावा असं वाटायला लावणारा हा आवाज...!

या आवाजाला साध्या फूटपट्ट्या का लावता येत नाहीत? एकच आवाज शिळा, एकसुरी न होता, अनेक तपं आपल्यावर अधिराज्य गाजवतो, हे कसं शक्य झालं असावं? प्रत्येक व्यक्ती निराळी, असं जरी क्षणभर गृहीत धरलं तरी अनेक भावना या सामायिक असतात. त्यात वैविध्य कसं आणि कुठून आणणार? असे अनेक प्रश्न पडतात; पण हा आवाज कधीच सगळ्यांसाठी सारखा भासला नाही... सगळ्या भावनांसाठी तो एकाच प्रकारे लावण्यात आला नाही... आणि या आवाजाला घाऊकपणा कधीच नव्हता. असं कधीच झालं नाही, की ‘प्रेम’ आहे ना? मग मी असा आवाज लावणार... ‘दु:ख’ आहे का?... मग मी आवाजातून असे हुंदके देणार... तर त्या प्रत्येक भावनेचा त्या त्या व्यक्तिरेखेसाठी असलेला सूक्ष्म पदर त्या आवाजातून समोर आला. तोच वेगळेपणा ठरला. म्हणून ‘आवारा’मधल्या नर्गिसचं दु:ख आणि ‘श्री ४२०’मधल्या नर्गिसचं दु:ख वेगळं झालं. ‘गाइड’मधल्या वहिदाचा, ‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणतानाचा आनंद हा वहिदाच्याच ‘पिया तोसे नैना लागे रे’ म्हणतानाच्या आनंदापेक्षा वेगळा ठरला... या नायिका त्याच होत्या... अगदी तारुण्यातल्या नवथर भावना... स्वतःवर खूष होणं. प्रेमात पडण्याच्या कल्पनेनंच मोहरून जाणं. हे सगळं व्यक्त करणारी दोन गाणी (भाई बत्तूर भाई बत्तूर आणि उड के पवन के संग चलूँगी) सायराबानोवरच चित्रित होऊनही त्यांच्या आवाजात फरक आहे... हे सगळं कसं होतं? ‘व्हॉइंस मॉड्युलेशन’ या एका शब्दात ते कसं स्पष्ट व्हावं? प्रणय, मीलन, रुसवा-फुगवा, विरह, वंचना, पश्चाताप, वात्सल्य, फसवणूक... या सगळ्यांना अंतर्गत अनंत छटा आहेत, हे या आवाजातून व्यक्त झाल्यामुळे समजलं अनेकदा... आणि ऐकणाऱ्यांची भावनिक श्रीमंती वाढली. गाणीच बघू या... अनुराग ही मनुष्यजातीला मिळालेली देणगी आहे... कुणावर तरी अनुरक्त होण्यातला, जीव ओवाळून टाकण्यातला आनंद शरीरातल्या प्रत्येक पेशीला जिवंत करत असतो, जिवंत ठेवत असतो... अनुराग नसता आयुष्यात, तर प्लास्टिकच्या फुलांसारखं फसवं आणि बेगडी आयुष्य वाट्याला आलं असतं, ज्या फुलांना फक्त आकार आहे... खऱ्या फुलांचा भास आहे... पण पोत कधीच नसेल, गंध तर अशक्यच... अनुराग स्वरातून जागवला लताबाईंनी... ती थरथर... काळजाला अंतर्बाह्य उजळून टाकणारी ती विशिष्ट जाणीव बाईंच्या आवाजात कायम दरवळतेय... अनुरागाचा स्पर्श झालेली स्त्री ही वेगळीच... तिच्या श्वासात, तिच्या रक्तात ‘तो’ वाहतो आहे अखंड... मग त्या निशिगंधेच्या फुलांना गूज सांगणारी किंवा त्याची वाट पाहताना आतून अस्वस्थ, पण त्या बेचैनीतली मजा स्वतः अनुभवणारी, ‘धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार’ म्हणणारी ती नायिका... यांच्यासाठी लताबाई ती उत्कंठा स्वतःच्या स्वरातून जागवतात. ‘धीरे धीरे मचल’च्या पुढची ओळ.. ‘कोई आता है’... तिथे लय किंचित वाढल्यासारखी वाटत नाही? तिथे ते त्याचं येणं, ही किती महत्त्वाची घटना ठरली... त्यात केवढी लगबग आहे... 

घडी घडी मोरा दिल धडके’ गाताना ती नाचरी मधुमती सिनेमा न बघतासुद्धा डोळ्यांपुढे येते... हे यश जितकं शब्दांचं, चालीचं, तितकंच या नाचऱ्या आवाजाचं. ‘बेताब दिल की तमन्ना यहीं है’ म्हणताना आपण ‘बेताब’ आहोत हे ती आधीच कबूल करतेय... त्या ‘बेताब’ शब्दाचा उच्चार ‘बेताऽऽऽऽऽऽब’ असा करतात, त्यात खालच्या ‘सा’पासून, पंचमाचा एक ठहराव ते वरचा ‘सा...’ एवढा त्या एका मिंडेतून फिरून येतात... त्या आवाजाचा तेव्हाचा झोल बघा... ते बेताब होणं यातूनच तर लक्षात आलं आपल्या... आणि... त्याच्या अस्तित्वानं भरून जाताना... त्याच्या विचारांमध्ये असताना स्वतःच्या देहातून येणारी सुगंधी स्पंदनं झेलणं तिलाच कठीण जातंय... ‘जब भी खयालों में तू आए... मेरे बदन से खुशबू आए... महकें बदन में रहा ना जाये.!’ ही ती अवस्था... लताबाई, त्या ‘महके बदन’वर आवाज बदलतात चक्क... त्याच्या आठवणीच्या सुगंधाची अत्तरकुपी फुटून शरीरात रक्त बनून वाहत असेल तर तो भेटल्यावर काय होईल? 

मुरलिया समझकर मुझे तुम उठालो... बस एक बार होटों से अपने लगा लो ना’ ही विनवणी स्वस्त आणि बाजारू का वाटत नाही? केवळ ‘मुरलिया’ या शब्दाला असलेल्या कृष्णाच्या संदर्भामुळे? त्या चालीमुळे? नाही...! त्यात ‘होटों से अपने लगा लो ना’ ही ओळ म्हणताना त्यातलं समर्पण ऐकू आलं पाहिजे... केवळ आकर्षण नाही हे.... म्हणूनच ‘लता’ समजण्याच्यासुद्धा एक एक पातळ्या आहेत... 

त्याच्या नकळत त्याच्यावर प्रेम करत राहणं हीसुद्धा एक साधनाच की! त्याच्या डोळ्यातला तो अनामिक सुगंध... तसाच राहू दे... त्याला स्पर्शू नयेच कुणी. प्रकाशाचा निरंतर वाहणारा तो थेंब असाच मिरवायचा अभिमानानं. मग आपसूक त्या ‘हमने देखी है’मध्ये ‘हम ने’ शब्दावर हलकासा जोर दिला जातो... ‘इल्जाम ना दो’ म्हणताना ती काकुळतीची भावना येते त्या आवाजात... आणि कुणी प्रेमाचाच उपहास केला तर ‘दिल में किसी के प्यार का जलता हुआ दिया, दुनिया की आंधियों से भला ये बुझेगा क्या’... हे उत्तर त्याला दिलं जातं... ‘दिया’वरचा ठाम मंद्र पंचम लावण्याची पद्धतच कमाल आहे, तिथेच लताबाई समोरच्या त्या करंट्या शंकेला मोडीत काढतात... आणि ‘भला’वरची ती जागा किंचित आक्रमक ठेवलीय. त्यामुळे ‘ये बुझेगा क्या’ हा प्रश्न प्रेमाची शंका घेणाऱ्याचाच आत्मविश्वास धुळीला मिळवतो... 

हाच ठामपणा आणि किंचित जास्त आक्रमकता ‘प्यार किया तो डरना क्या’मध्ये आहे... तिथे दादरा असा काही जम बसवतो, की प्रत्येक वेळी पहिल्या मात्रेवर जोर देण्याची संधी बाई सोडत नाहीत... बघा, ‘प्यार’, ‘डरना’ या अक्षरांवरचा जोर ऐका... काय बिशाद कोणी या प्रेमाचा पराभव करेल? पु. शि. रेग्यांनी म्हटल्याप्रमाणे, स्त्री ही ‘पुष्कळा’ आहे... खूप भावनाप्रधान आहे... तिच्याकडे खूप आहे जे ती सतत उधळून देते प्रियकरावर... हा ‘देण्याचा’ भाव लताबाई फार वेगळा दाखवतात. ‘आजा पिया तोहे प्यार दूँ’मधला आवाज किती आवाहन करणारा... त्याचा जीवनरस बनून तो आवाज त्याच्या प्राणापर्यंत पोहोचतो... हा आवाज हा स्वतःचं वर्चस्व गाजवून त्याचा सगळा ताबा स्वतःकडे घेणारा नाही... ज्या काळात स्त्रिया ‘त्याचा’ इगो सांभाळायला धडपडत होत्या त्या काळातलं हे गाणं असल्यानं स्वतःकडे सगळं दु:ख मागून (तेही त्याचा अहंकर ना दुखावता) त्याला प्रेमात न्हाऊ घालायचा फील त्या आवाजातून देतात! ‘मैं तो नहीं हारी, सजन जरा सोचो?’ हा प्रश्नार्थक पॉज खूप सांगून जाणारा... ‘चलो सजना जहाँ तक घटा चले’मध्ये ‘खाओगे जब ठोकर होटोंसे चूम लूँगी’ हे गाताना अशी खनक आहे आवाजात, की त्याला ठोकर खाण्याचाच मोह व्हावा... अरे किती ते प्रेम... किती ती काळजी... किती ते समर्पण... पुरुष होऊन प्रेम जिंकावं ते याच स्त्रीचं... हेच वाटून जाईल... 

१९५०च्या दशकात लतादीदींनी स्वतःच टिपलेले स्वतःचे छायाचित्रपण एके काळच्या प्रियकराला हा आवाज ठणकावतोसुद्धा ‘... और भी है गम है जमाने में मुहब्बत के सिवा...’ असं सांगणारा तो आवाज. ‘छोड दे सारी दुनिया किसी के लिये... ये मुनासिब नहीं आदमी के लिये... प्यार से भी जरूरी कई काम हैं, प्यार सबकुछ नहीं जिंदगी के लिये...’ हे त्याला जीव तोडून सांगतेय ती... ‘दूसरा तुम जहाँ क्यूँ बसाते नहीं?’ असं त्याला कळवळून विचारण्यात त्याचंही विश्व उजाड होऊ नये ही तळमळ दिसते... म्हणजे हे प्रेम या पातळीला पोहोचलंय! ‘माझ्या प्रेमात अडकू नकोस, मी म्हणजेच सर्वस्व नाही, आणि तो चंद्र नाही सगळ्यांना मिळत... हा छोटा दिवाच खूप आहे प्रकाशासाठी... ’ असा किरणही त्या आवाजातून चमकतो... ‘सारी दुनिया’मधला ‘सारी’चा उच्चार नीट ऐकायचा... ‘साऽऽऽरी... असा आहे तो... त्यात ते ‘सगळं’ आलंय. 

गाण्यात काय नसतं? शह, काटशह, डावपेच, शरणागती, खिलाडूपणा... हे सगळं सापडतं गाण्यात आणि आवाज लावण्याच्या पद्धतीत... आणि या कौशल्यात लताबाई म्हणजे गौरीशंकर आहेत... 

लताबाईंच्या आवाजात जन्मजात एक घरंदाजपणा आहे... या आवाजातून कामुकता जेव्हा व्यक्त झाली, तेव्हा ती कधीही उथळ किंवा सवंग वाटली नाही... याचं कारण काय असावं? तर त्यात सांभाळली गेलेली ग्रेस... आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सूचक शृंगार. बाईंच्या आवाजातलं स्त्रीत्व अशा वेळी पूर्ण चरम बहरात असतं. ‘निसदिन निसदिन मेरा जुलमी सजन’ बारकाईने ऐकावं... त्यातली ‘जले बैरी मन सुलगे बदन, आग सी लग जाये हाँ’ या ओळीतली ती आग... त्या ‘जाये’च्या ‘जा’वर एकवटते... तो रिषभ अक्षरशः चिरत जातो... बाप रे... किती वेळा ऐकावं आणि शहारून घ्यावं स्वतःला... ‘तडप ये दिन रात की, कसक ये बिन बात की...’ या ठिकाणी ‘तडप’नंतर ‘कसक’ हाच शब्द शैलेंद्रला का सुचला? ‘कसक’ या शब्दात जी कामुकता आहे ती ‘तडप’ या शब्दाच्या पुढची जास्त तीव्र छटा आहे... मग त्याचा उच्चारसुद्धा बाई खूप वेगळा करतात... आणि ‘सजन अब तो बताओ’ला टिपेला गेलेला आवाज ती तगमग तर दाखवून जातोच; पण दुसऱ्याच क्षणी अस्फुट होणारा आवाज त्यातला संयमसुद्धा दाखवतो... किती करावं एका ओळीत? कसं सुचलं असेल हे? आता या मूडमध्ये आणि ‘जलता है बदन’च्या मूडमध्ये पुन्हा फरक आहे... त्यातली तगमग जास्त शारीर आणि थेट आहे... कारण ती शेवटी राणी आहे... तिच्यातली स्वामित्वाची भावना तिच्या शृंगारातही डोकावते... ‘सुबह तक कौन जले? दौरपर दौर चले.!’ ही... किंवा ‘इश्क से कह दो के ले आये कहीं से सावन’ या सगळ्यात एक हुकमत दिसते... बाईंनी आवाजही तसाच लावलाय... 

विरहभावनेचे तर असंख्य प्रकार बाईंच्या आवाजातून व्यक्त झाले. ‘लो आ गयी उनकी याद, वो नहीं आए’मधला एक बिचारा भाव असो... किंवा ‘अखियों को रहने दो’मधला करुण आक्रोश... विरह हा स्थायीभाव असला तरी आवाजाचा लगाव वेगळा आहे. ‘दो दिल टूटे दो दिल हारे दुनियावालों सदके तुम्हारे’मध्ये दुनियेला तळतळाट देणारा हंबरडा आहे... तो त्या आवाजाला दिलेल्या एका खास व्हायब्रेटोमुळे कापत जातो आपल्याला. असाच वियोग, फसवणूक यातून आलेलं वैफल्यही तेवढंच दाहक. तेव्हा बाईंचा आवाज जबरदस्त तिखट होतो. ‘जब भी जी चाहे नयी दुनिया बसा लेते ही लोग’मधला आवाज या प्रकारचा आहे... पण अगदी डोळ्यासमोर जेव्हा प्रियकर परक्या स्त्रीच्या निकट दिसतो तेव्हा अश्रू लपवत म्हटलेलं ‘गैरों पे करम अपनों पे सितम’ आठवा... यातला आवाज वेगळा आहे. ‘बेमौत कहीं मर जाये ना हम’ या ओळीत खरोखर मरणयातना दिसतात. आपल्याच डोळ्यांत पाणी येतं. 

जाना था हमसे दूर बहाने बना लिए’मध्ये जाना, हमसे, दूर या प्रत्येक शब्दातल्या पहिल्या अक्षरांत हुंदके आहेत... ज्याला हे ऐकूनही गलबलून येत नाही अशी व्यक्ती म्हणजे टेबल किंवा खुर्ची बनण्याऐवजी चुकून मनुष्यजातीत जन्माला आली असंच म्हणावं लागेल. 

आश्चर्य करावं अशा अगणित गोष्टी बाईंच्या गाण्यात पदोपदी आढळतात. द्वंद्वगीतामधली त्यांची भूमिका त्या अचूक ओळखतात. कुठे ती फटकळ आहे, कुठे मिश्कील, कुठे अवखळ तर कुठे समर्पित वृत्तीची... ‘ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं’मधली तनुजा अत्यंत ‘अॅसर्टिव्ह’ आहे.. ‘एकदा काय ते सांग... तुझ्या मनात काय आहे... हे असं आग लावून, आशा लावून तडफडत ठेवणं बरं नाही...’ हे ती ठणकावून सांगते... तिथे रफी कायम बचावात्मकच राहिला आहे. तसाच बाईंचा अत्यंत खंबीर आवाज लागतो, उच्चारही तसेच. ‘पत्ता पत्ता बूटा बूटा’मध्ये रफी, ‘कोई किसी को चाहे तो क्यूँ गुनाह समझते हैं लोग’ असं तक्रारीच्या सुरात मांडतो; पण बाई ठामपणे ‘बेगाना आलम है सारा’ म्हणत असा काही तेजस्वी पंचम लावतात... अहाहा... तिथे त्या पुढच्या विजयाची सूचनाच देतात. ‘चाहत के गुल खिलेंगे, चलती रहे हजार आंधियाँ..., हमने तो दिल में ठानी है आज’ वगैरे ओळीतून दिसणारी कणखर स्त्री त्यांच्या आवाजात आधी ऐकू येते हे महत्त्वाचं. आणि एकूण ज्या पद्धतीने त्या गाण्याला त्यांनी व्यापून टाकलंय ते केवळ अफाट आहे... इथे मी त्या ‘बूटा’वरच्या बारीक तानेबद्दल बोलायचा मोह टाळते आहे... जीवघेणी आहे ती...! ‘छुपा लो यूँ दिल में प्यार मेरा,’ ‘तुम गगन के चंद्रमा’मध्ये हा आवाज समर्पण भावनेत भिजून येतो. संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे?’ हा, शारीरिक आकर्षणाला हीन लेखून त्याचं अस्तित्वच नाकारणाऱ्या, ढोंगी विरक्तीला केलेला सवाल उपरोधिक बनतो तो बाईंच्या ‘क्या’ या शब्दाच्या अत्यंत उपहासात्मक अशा उच्चारामुळे... ‘ये भोग भी एक तपस्या है... तुम त्याग के मारे क्या जानो?’ इथे ‘भोग’वरचा तार षड्ज समोरच्याचा जीवच घेतो... ‘हम जनम बिताऽऽऽकर जायेंगे तुम जनम गँवाकर जाओगे...’ इथे तर उपहासाने हसण्याचा भास आहे... हे काय आहे? कसं होऊ शकतं हे एका आवाजातून? स्त्रीच्या स्वभावातले कंगोरे लताबाई स्वतःच्या आवाजातून इतक्या प्रकारे खुलवतात... 

पुरुष गायकाने गायलेलं गाणं त्या जेव्हा गातात, तेव्हा हमखास त्यात लाडिकपणा, स्वरांना जास्त वळसे देणं असे अनेक बदल त्या करतात. ‘दिल विल प्यार व्यार’ गाताना ग्रामीण हेल देतात... काय काय आणि किती सांगावं? हे सगळं त्या कसं करतात? लताबाई आवाजाचे पडदे फार सुंदर रीतीने वापरतात... त्यांचं श्वासनियंत्रण, ‘हम’, ‘हवा’ या शब्दांचे त्यांचे उच्चार, त्यांचा श्रुतीविचार, तालाला ‘सोडून’ गाणं आणि त्यांचं ‘फेड इन फेड आउट’चं तंत्र, यावर स्वतंत्र लेख होईल... तूर्त इथे एक अल्पविराम घ्यावा... 

मौनाच्या संध्याकाळी आकाश स्वरांचे झाले
वितळले क्षितिज गंधात, रंगातून रूप निथळले... 

अशी अवस्था, सुखाची परमावधी म्हणजे ‘लता’ हा आवाज... त्या आवाजाला... त्या श्रुतींना, त्या अलौकिक अस्तित्वाला फक्त प्राणातून कृतज्ञ नमस्कार... 

हा सूर अनाहत कोठून आला येथे
हा जिथे तरंगे तेथे गाणे उमटे 
हा अखंड अविरत अथक वाहता राहे 
हा सूर जणू शब्दांचे हृद्गत आहे... (सुधीर मोघे) 

डॉ. मृदुला दाढे-जोशी- डॉ. मृदुला दाढे-जोशी
ई-मेल : mrudulasjoshi@gmail. com

(लेखिका प्रसिद्ध सुगम संगीत गायिका आणि चित्रपटसंगीताच्या मर्मज्ञ अभ्यासक असून, मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.) 

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

(लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘माय भवानी तुझे लेकरू’ या गाण्याबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांनी गायलेल्या ‘मुहब्बत ऐसी धडकन है...’ या गीताबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. लता मंगेशकर यांच्याविषयीची पुस्तके, ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दीपक धोंगडे About 17 Days ago
अप्रतिम लेख सादर केल्याबद्दल धन्यवाद
0
0
Ajit Rajkumar About 18 Days ago
केवळ अप्रतिम या पलीकडे शब्दच नाहीत
0
0
UDAY Hulawe About 19 Days ago
I cannot find better word for Lata Didi.Lata mhanaje 33 coti devani milun kelela asa avishkar ahe.
0
0
मनीषा लेले About 19 Days ago
अप्रतिम शब्द! लताच्या अविस्मरणीय गाण्यांची सफर घडवली लेखिकेने.⚘⚘⚘
0
0
Dilip Laxman Deshmukh About 20 Days ago
अतिशय सुंदर, केवळ अप्रतिम
0
0
Vilas Deshmukh About 20 Days ago
निव्वळ अप्रतिम !!! आजच्या दिवसाला एकदम समर्पक !!! 👌👌👌!!!
0
0
विवेक जवळेकर About 20 Days ago
फक्त गाणी ऐकणे, बाकी सर्व दैवी आणि अवर्णनीय.
0
0
Vijayalaxmi About 20 Days ago
No words to express the fillings.
0
0
Anand About 20 Days ago
इतक्या सुंदर रीतीने गाणी , त्यातल्या ओळी, श आणी त्यामागच्या भावना खचितच कोणी उजागर केल्या असतील..... हा लेख वाचल्यावर आणखीनच आवडून जातात लता ची गाणी ... एखादं सौदर्य शिल्प जाणकारांनी सौदर्य स्थळं दाखवून दिल्यावर आणखीनच आवडून जावे तसे वाटले...
1
0
Mrs. Meenakshi Vijay Kendhe. Prabhas. About 20 Days ago
Mrudulatai खूप सुंदर लेख लिहिलात. आमच्या Prabhas मध्ये तुमचे माहेर आहे. मी प्रचंड fan आहे तुमच्या आवाजाची अणि संगीत अभ्यासाची.
0
0
Vinod Shah. About 20 Days ago
Very nice article.
1
0
Manali bhadkamkkar About 20 Days ago
सुन्दर लेख lihala ahai,
0
0

Select Language
Share Link
 
Search