Next
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक - हातिसचा उरूस
BOI
Tuesday, February 19, 2019 | 01:21 PM
15 1 0
Share this story

हातिस येथील दर्गा (फोटो : कांचन मालगुंडकर)

रत्नागिरीपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हातिस या चिमुकल्या गावात पीर बाबरशेख यांचा उरूस गेली अनेक वर्षे साजरा होतो. हा उरूस वैशिष्ट्यपूर्ण असून, हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जातो. यंदा हा उरूस १९ आणि २० फेब्रुवारी रोजी होत आहे. या उरुसाबद्दल मुंबई आणि हातिस येथील हातिस ग्रामविकास मंडळातर्फे देण्यात आलेली ही माहिती...
........
रत्नागिरीपासून अवघ्या १८ किलोमीटरवर असलेले हातिस हे चिमुकले गाव. काजळी नदीच्या खोऱ्याचा रमणीय असा परिसर, झाडाझुडपात लपलेली छोटी छोटी घरे. गावातील वस्ती चारशे ते पाचशे. सारीच वस्ती हिंदू (भंडारी) समाजाची. अशा या छोटेखानी गावात कधीकाळी पीर बाबरशेख बाबांचे वास्तव्य होते.

बाबरशेख बाबांचा इतिहास
फार वर्षांपूर्वी कोणी एक योगीपुरुष हातिस येथे आले. येथील परिसर आणि लोक त्यांना आवडले आणि त्यांनी येथे वास्तव्य केले. त्यांनी येथील लोकांना भक्तिमार्ग दाखविला. येणाऱ्या संकाटातून मार्ग कसा काढायचा, याची शिकवण दिली. व्याधीग्रस्त लोकांना अंगारा, उदी देऊन व्याधिमुक्त केले. हळूहळू बाबांची कीर्ती पंचक्रोशीत पसरली आणि सारे गाव त्यांना देवाचा अवतार मानू लागले.

बाबांचे महानिर्वाण
कालांतराने बाबांचे महानिर्वाण झाले. ग्रामस्थ हिंदू, तर बाबा मुस्लिम. त्यामुळे बाबांचा अत्यविधी कसा करावा, असा प्रश्न उभा राहिला. त्या वेळी नजीकच्या इब्राहिमपट्टण गावातील मुस्लिम बांधवांनी हातिस ग्रामस्थांच्या मदतीने बाबांचा दफनविधी पार पाडला. तेव्हापासून ही मंडळी दर वर्षी हातिस येथे येऊन बाबांचा उरूस (पुण्यतिथी) साजरा करत आहेत. बाबरशेख बाबांचा उरूस हिंदू धर्माप्रमाणे माघ पौर्णिमेला, तर मुस्लिम धर्माप्रमाणे १३ तारखेला येतो.उरुसाचे मुख्य कार्यक्रम
उरुसाच्या दिवशी संध्याकाळी इब्राहिमपट्टण येथील सय्यद व इतर मुस्लिम कुटुंबीय आज गाडीची सोय असतानाही चालत येतात. गावच्या पूर्वेस नार्वेकर यांच्या घराशेजारी हातिस ग्रामस्थ त्यांचे स्वागत करतात. त्या वेळी जलपान कार्यक्रम होतो. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघते. तेथून पुढे ती कै. दत्तात्रय हरिश्चंद्र नागवेकर उर्फ फकीर यांच्या घरी येते. तेथे प्रार्थना केली जाते. तेथून मिरवणूक बाबरशेख मंदिरात येते. प्रार्थना होते आणि इब्राहिमपट्टणच्या मुस्लिम बांधवांनी आणलेल्या प्रसादाचे वाटप होते.

चंदन संदल कार्यक्रम
आज गावात अनेक घरे निर्माण झाली आहेत. परंतु पूर्वीची जी दोन मूळ घरे आहेत, त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाचा मान ठेवण्यात आला आहे. दत्तात्रय हरिश्चंद्र नागवेकर, सुधीर श्यामराव नागवेकर यांच्याकडे आलटून-पालटून मान असतो. रात्री ११च्या सुमारास मिरवणूक मानकऱ्यांच्या घरी येते. तेथे सय्यद व इतर मुस्लिम कुटुंबे आणि हातिस ग्रामस्थ एकत्र येतात. चंदन उगाळून ते भांड्यात भरून चौरंगावर ठेवले जाते. मानकऱ्याला चौरंगासमोर बसविले जाते. कुराण पठणात त्यांच्या हाती चंदन दिले जाते. त्यानंतर त्याच्या अंगात बाबारशेख बाबांचा संचार होतो असे मानले जाते. चंदन वाजतगाजत दर्ग्यामध्ये आणले जाते. त्या ठिकाणी प्रथम सय्यद संदल लावतात. त्या वेळी कुराणाचे पठण होते व प्रसादाचे वाटप होते. याला ‘मलिंदा’ असे म्हणतात. याला लागणारे साहित्य ग्रामस्थ पुरवितात, तर प्रसाद सय्यद तयार करतात.

गिलाफ
चंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री एकच्या सुमारास पुन्हा मिरवणूक मानकऱ्यांच्या घरी येते. तेथे ग्रामस्थांचे वतीने आणलेले गिलाफ (चादर) असते. त्या ठिकाणी भाविकांनी नवसाच्याही चादरी आणलेल्या असतात. एका थाळीत त्या सर्व जमा केल्या जातात आणि वाजतगाजत मंदिरामध्ये नेल्या जातात. येथे सय्यद घराण्यातील व्यक्ती गिलाफ डोक्यावर घेऊन येते. तेथे कुराण पठणात गिलाफ बाबरशेख कबरीवर चढविल्या जातात.

दर्गा परिसर (फोटो : कांचन मालगुंडकर)

शस्त्रास्त्रांचा खेळ
गिलाफ घेऊन निघतेवेळी मानकऱ्याच्या अंगणात शस्त्रांचा खेळ सुरू केला जातो. तेथील अपुऱ्या जागेमुळे तो आता गावच्या पटांगणात केला जातो. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आता स्टेज तयार केले आहे. यामध्ये लांब सुया गालातून, जिभेतून कानातून, मनगटातून आरपार घातल्या जातात. खिळ्यासारख्याच, परंतु चेंडूसारखा गोल भाग असलेल्या हत्याराने माणसाला लाकडी खांबाला ठोकून ठेवले जाते. तलवारीने अंगभर वार केले जातात. असे अनेक खेळ सादर केले जातात. परंतु रक्ताचा एकही थेंबही सांडत नाही, असा अनुभव आहे.

गिलाफ कार्यक्रम झाल्यानंतर भाविकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ततेसाठी गाऱ्हाण्यांचा कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी जमा झालेल्या प्रसादाचे वाटप केले जाते.

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक
बाबरशेख बाबांच्या कृपेने हिंदू- मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्रित येऊन गेली अनेक वर्षे हा उरूस साजरा करत आहेत. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार यात आढळून येत नाही. या दोन्ही समाजांनी एकत्र नांदावे हीच यामागची भावना आहे. गेली अनेक वर्षे ती टिकून आहे, टिकली आहे आणि टिकून राहणार आहे, हे निश्चितच. हे दोन समाज एकत्र येत असतात. त्यामुळे विचारांची आणि प्रेमाची देवाणघेवाण होत असते. आप्तेष्ट आणि मित्रमंडळी या निमित्ताने एकत्र येतात. सहभोजन आनंद लुटतात. सुख:दुखाचे वाटप होते. प्रेमाला उजाळा मिळतो आणि ते वृद्धिंगत होते.खलीप किंवा खवीस
बाबरशेख बाबांनी आपल्याजवळ ‘खलीप’ व ‘खवीस’ या नावाची अघोरी शक्ती बाळगली होती, असे सांगितले जाते. आजही मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर त्यांची ही कबर आहे. चोरी, अत्याचार, मारामारी अगर कोणत्याही गुन्ह्यांविरुद्ध गुन्हेगारास शिक्षा द्यायची असेल, तर अनेक भाविक आपली गाऱ्हाणी या ठिकाणी सांगतात आणि त्यांना न्यायही मिळाला आहे, अशी अनेक उदाहरणे येथील ग्रामस्थ सांगत असतात. तेथे होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. एसटी महामंडळ जादा गाड्या सोडून भाविकांची सोय करते. हातिस ग्रामस्थ भाविकांच्या सोयीकडे लक्ष पुरवत असतात. असा हा उरूस दर वर्षी साजरा होत असतो.

फोटो : प्रवीण भातडे
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अमित नागवेकर About 34 Days ago
अप्रतिम महिती
1
0
Lata Ramesh Narwa About 34 Days ago
👌👌 Baba ka bulaya Ana chahiye. Bahot ichha ho rahi hai darshan ki
0
0

Select Language
Share Link