Next
‘झीरो डम्प’ची अभिनव संकल्पना
BOI
Monday, May 01, 2017 | 07:00 PM
15 1 0
Share this article:


वेंगुर्ला नगर परिषदेने नागरी घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत प्लास्टिक कॅरीबॅग बंदी, चतु:सूत्री पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण, बायोगॅस, कांडी कोळशाची निर्मिती, प्लास्टिक कचऱ्यापासून डांबरी रस्त्यांची निर्मिती, कंपोस्टिंग आणि प्लास्टिक व काचेच्या बाटल्या आणि धातूयुक्त कचऱ्याची भंगारात विक्री हे उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे ‘झीरो डंप’ ही अभिनव व आव्हानात्मक संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात यश प्राप्त झाले आहे.  स्वच्छतेचा दीपस्तंभ असलेल्या वेंगुर्ले पॅटर्नबद्दलच्या लेखाचा हा दुसरा भाग....
.............

कचरा संकलन आणि वर्गीकरण 
टाकाऊ कपडे : नगर परिषदेच्या वाहनातून टाकाऊ कापड वेगवेगळे संकलित करून ठेवण्यात येते.

सॅनिटरी नॅपकिन्स व डायपर्स : या प्रकारच्या कचऱ्याचेही वेगवेगळे संकलन करण्यात येते. त्याची विल्हेवाट बायोमेडिकल वेस्ट प्रोसेसिंग करणाऱ्या संस्थेमार्फत लावण्यात येते.

टायर वगैरे रबरी प्रकार : अशा प्रकारचा कचराही वेगवेगळा संकलित केला जातो. 

केस, मृत जनावरे, कोंबड्यांची पिसे : हा कचरा वेगवेगळा गोळा करून कंपोस्ट डेपोमध्ये खड्डे भू-भरावासाठी वापरला जातो. 

कंपोस्टिंग : बायोगॅस प्रकल्पामध्ये वापरता न येणारा ओला कचरा आणि कांडी कोळशासाठी वापरता न येणारा सुका कचरा वेगळा करण्यात येतो. त्या प्रकारच्या कचऱ्यावर कंपोस्टिंगची प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येते. 

प्लास्टिकचा वापर करून बनवलेला रस्ताप्लास्टिक कचऱ्याचा रस्ते निर्मितीत वापर 
वेंगुर्ला शहरात एकात्मिक घनकचरा मोहीम राबवण्यापूर्वी सात टन कचरा निर्माण होत होता. प्लास्टिक कॅरीबॅग पूर्णत: बंद झाल्यानंतर एक टन कचरा कमी झाला. परंतु प्लास्टिक कॅरीबॅगव्यतिरिक्त दुधाच्या पिशव्या, तेलाच्या पिशव्या, बेकरी उत्पादनांची प्लास्टिक आवरणे, वेफर्सची पाकिटे इत्यादी कचरा वेगळा संकलन केला असता, त्याचे प्रमाण दररोज ५० ते ७० किलोपर्यंत असते. संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्पाच्या (यूएनडीपी) आर्थिक साह्यातून प्लास्टिक क्रशर मशीन खरेदी करण्यात आले. त्याद्वारे प्लास्टिकचे बारीक तुकडे करून डांबरी रस्ते निर्मितीमध्ये डांबराच्या आठ टक्के प्रमाणात त्याचा वापर केला जातो. असा प्रयोग करणारी वेंगुर्ला नगर परिषद ही महाराष्ट्रातील एकमेव नगर परिषद आहे. त्यामुळे प्लास्टिकचे १०० टक्के व्यवस्थापनही झाले व डांबरी रस्ते निर्मितीत वापरून मूल्यही प्राप्त झाले. सर्वसाधारणपणे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी एक टन प्लास्टिकचा वापर होतो.

हरितपट्ट्यांचा विकास
डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर दैनंदिन प्रक्रिया केल्यामुळे मोकळ्या झालेल्या जागेत सोनचाफा, मोगरा, रातराणी, पारिजातक इत्यादी सुगंधी फुलांची झाडे व नारळ, आंबा, काजू इत्यादी फळझाडांची लागवड करून हरितपट्टे विकसित करण्यात आले आहेत. भविष्यात पर्यावरण संतुलनाबरोबरच उत्पन्नाचे साधन म्हणूनही या हरितपट्ट्याकडे पाहता येईल. कंपोस्टिंगमधून निर्माण झालेले खत व बायोगॅस प्रकल्पातील स्लरी यांचा या वृक्षांच्या संवर्धनासाठी खत म्हणून वापर करण्यात येतो. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्चात बचत होण्यास मदत झाली आहे. 

डंपिंग ग्राउंडवरील क्रीडांगणडंपिंग ग्राउंड ते खेळाचे मैदान 
डंपिंग ग्राउंडमधील एकात्मिक घनकचरा व्यवस्थापनामुळे मोकळ्या जागेत व्हॉलिबॉलचे मैदान तयार करण्यात आले आहे. येथे नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व कर्मचारी व सफाई कामगार एकत्रितपणे व्हॉलिबॉल खेळतात. त्यामुळे आपापसात एकीची भावना निर्माण होण्यास मदत होते व नागरिकांना डंपिंग ग्राउंडमध्ये झालेला बदल सहज लक्षात येतो.

फ्री वायफाय सेवा
डंपिंग ग्राउंडवर कचरामुक्तीचे झालेले विविध प्रयोग व अस्तित्वात आलेली झीरो डंप संकल्पना यामुळे नागरिक, विद्यार्थी, या विषयाचे अभ्यासक, तसेच राज्य व केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्या या प्रकल्पाला वारंवार भेटी होतात. सर्वांनाच आज इंटरनेटद्वारे माहितीची देवाण-घेवाण करणे आवश्यक असते. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या सेवेची आवश्यकता असल्याने सर्वांना डंपिंग ग्राउंडवर मोफत वाय-फाय सेवा देणारी वेंगुर्ला नगर परिषद ही एकमेव नगर परिषद असून, या अभिनव उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

डंपिंग ग्राउंडवर गुढीपाडवा उत्सव
‘यूएनडीपी’चे सहायक महासचिव हाव लुज झू व जोंको सिलर यांनी झिरो डंप या अभिनव संकल्पनेचे व मोहिमेचे भरभरून कौतुक केले. त्यांच्याकडून या यशोगाथेची दखल घेण्यात आल्याने वेंगुर्ले नगर परिषदेने या वर्षी डंपिंग ग्राउंडवर गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला.

डंपिंग ग्राउंडचे स्वच्छ भारत पर्यटनस्थळात रूपांतर 
डंपिंग ग्राउंडवर चार महिन्यांत एक हजाराहून अधिक जणांनी भेटी दिल्या. हे ठिकाण सर्वांनाच प्रेरणा देणारे व आकर्षक बनल्यामुळे हे स्थळ स्वच्छ भारत पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जावे, अशी सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे विशेष सचिव सुशीलकुमार यांनी केली. त्यानुसार चार एप्रिल २०१६पासून या डंपिंग ग्राउंडचे स्वच्छ भारत पर्यटनस्थळ असे नामकरण करण्यात आले.

घनकचरा नव्हे धनकचरा 
एकात्मिक घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत बायोगॅस स्लरी, ब्रिकेट, कंपोस्ट खत, प्लास्टिक ग्रॅन्युल्स, प्लास्टिक व काचेच्या बाटल्या, धातू इत्यादीपासून ७० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये निर्माण झाली आहे.

नगर परिषदेच्या सर्व घंटागाड्यांना जीपीएस प्रणाली बसवून त्यांचे मार्ग व वेळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना घंटागाड्यांचे वेळापत्रक सार्वजनिक ठिकाणी, सोशल मीडियावर, वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यामुळे घंटागाडीमध्ये दारोदार १०० टक्के कचरा संकलन व वर्गीकरण करणे ही प्रक्रिया सुलभ झालेली आहे. शहरातील ज्या लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले त्या लाभार्थ्यांच्या संडासाचे फोटो काढून वेबसाइटवर अपलोड करण्यात आले. सध्या २०९ लाभार्थ्यांचे जिओ टॅगसह काढलेले फोटो ‘स्वच्छ भारत वेबसाइटवर’ अपलोड करण्यात आले आहेत.

ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे वेंगुर्ले नगर परिषदेला अनेक सन्मान मिळाले. हागणदारीमुक्त शहर पुरस्कार, स्वच्छ शहर पुरस्कार, उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार यांचा त्यात समावेश आहे. तसेच स्थानिक पातळीपासून केंद्र पातळीपर्यंतचे अधिकारी, मंत्री, नेते आणि संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी आदींनी या प्रकल्पाला भेट देऊन कौतुक केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही मोहीम राबवताना मुख्याधिकारी व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी दररोज सकाळी सहा ते नऊ व तसेच प्रत्येक सार्वजनिक सुट्टीचा वापर या मोहिमेकरिता केला. नगरविकास विभाग, नगरपालिका प्रशासन संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालय, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय या सर्व वरिष्ठ स्तरातून वेळोवेळी दिल्या गेलेल्या प्रोत्साहनामुळे व नगर परिषदेतील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे कमी कालावधीत या मोहिमेला यश प्राप्त झाले.

(लेखक वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत.)

(या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vinayak Nagesh Tamhankar About 142 Days ago
I appreciate it very much.
0
0

Select Language
Share Link
 
Search