Next
‘पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारणे आव्हानच’
प्रेस रिलीज
Tuesday, July 17, 2018 | 05:58 PM
15 0 0
Share this story

सब वाहिनीवरील 'नमुने' मालिकेतील कलाकार तोरल रासपुत्र, संजय मोने, कुणाल कुमार आणि परेश गणात्रा

पुणे : ‘पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या पारदर्शक, नितळ माणसाची भूमिका करणं हे आव्हानच आहे. तो नितळपणा चेहऱ्यावर आणताना मला खूप कष्ट पडले. आता पु. ल. सारखी माणसे नाहीतच. त्यांचं अक्षर अन अक्षर वाचलेले असूनदेखील त्यांची भूमिका साकारणं अवघड होतं’, अशी भावना अभिनेते संजय मोने यांनी व्यक्त केली. सोनी सब वाहिनीवर लवकरच सुरू होत असलेल्या ‘नमूने’ या मालिकेत संजय मोने पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत. या मालिकेची माहिती देण्यासाठी यातील कलाकार, निर्माते, सब वाहिनीचे वरिष्ठ अधिकारी यांनी पुण्याला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. 

‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, प्रसिद्ध मराठी लेखक व विनोदवीर पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ पु. ल. यांच्या लघुकथांवर  आधारीत ‘नमूने’ ही मालिका सोनी सब वाहिनीवर शनिवारी, २१ जुलैपासून सुरू होत आहे. दर शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. यानिमित्ताने प्रथमच पु. ल. देशपांडे यांचे साहित्य हिंदी भाषेत छोट्या पडद्यावर सादर होणार आहे’, अशी माहिती सब वाहिनीचे वरीष्ठ ईव्हीपी आणि प्रमुख नीरज व्यास यांनी दिली. 

‘या मालिकेत हिंदीतील अभिनेता कुणाल कुमार याने निरंजनची भूमिका साकारली असून, परेश गणात्रा यांनी गंपू या पात्राची भूमिका साकारली आहे. निरंजनच्या आयुष्याभोवती या कथा फिरतात. त्याचे आयुष्य आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये पिचलेला हा निरंजन आयुष्याकडे नकारात्मक दृष्टीनेच बघतो, प्रत्येक टप्प्यावर त्याला दुःखच दिसते, स्वभावतःच तो निराशावादी बनला आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध स्वभावाची त्याची पत्नी भैरवी (तोरल रासपुत्र) अत्यंत उत्साही, आनंदी असते आणि छोट्या छोट्या गोष्टींतसुद्धा ती आनंद शोधत असते. निरंजनला पु. ल. देशपांडेंच्या कथा वाचण्याची आवड आहे. एके दिवशी, वाईट गोष्टीतही आनंद शोधण्यात निरंजनला मदत करण्यासाठी स्वतः लेखक पु. ल. निरंजनपुढे जिवंत होतात. आपल्या लेखनातल्या अन्य पात्रांसह, त्यांच्या विनोदबुद्धीच्या मदतीने निरंजनला नकारात्मकतेवर मात करण्यासाठी मदत करतात. फरिदा दादी यांनी निरंजनच्या आईची भूमिका बजावली असून, त्या आपल्या सुनेसह नेहमी हास्यविनोद करीत असतात. या सगळ्यात निरंजनची मुले काव्या (सलोनी दैनी) आणि ललित (आर्यन प्रजापती) यांची भूमिका महत्वाची ठरते’, असेही व्यास यांनी सांगितले. 

दशमी क्रिएशन्सचे नितीन वैद्य यांनी या मालिकेची निर्मिती केली असून, स्वप्ना वाघमारे – जोशी आणि मनीष रायसिंग यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. जय सिंग यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. 

आपल्या भूमिकेबद्दल संजय मोने पुढे म्हणाले, ‘ पु. ल. सारखी माणसे आता पहायला मिळत नाहीत. मी त्याचं अक्षर आणि अक्षर वाचले आहे. माझे आणि त्यांचे नाते वेगळेच आहे. माझा जन्म झाला तेंव्हा माझे वडील पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्याच एका नाटकात काम करत होते, माझे नाव काय ठेवायचे यावर चर्चा सुरू असताना आलेल्या अद्याक्षरानुसार आलेली नावे ठेवणे अशक्य होते, त्या वेळी अभिनेत्री शांता जोग यांनी माझ्या वडीलांना सांगितले की नाटकात ते जे पात्र साकारत आहेत त्याचेच नाव ठेवावे आणि माझे नाव संजय ठेवण्यात आले. त्यामुळे अगदी जन्मापासून माझे पु. ल. शी नाते जुळले आहे. नंतर मी त्यांचे साहित्य वाचतच मोठा झालो. त्यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्या नाटकात कामही केले. तरीही कलाकार म्हणून पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link