Next
गृहवित्त कंपन्या, खासगी बँका, पेट्रोलियम कंपन्याचे शेअर्स उत्तम
BOI
Sunday, July 08, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

पावसाची समाधानकारक वाटचाल, कच्च्या तेलाचे उतरते दर, रुपयाची बळकटी यामुळे सध्या गृहवित्त कंपन्या, पेट्रोलियम कंपन्या, खासगी बँका यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत. अशा काही निवडक शेअर्समधील गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
.....
शुक्रवारी निफ्टी १० हजार ७७२वर, तर निर्देशांक ३५ हजार ६५७वर बंद झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले चीनबाबतचे धोरण ताठर केले आहे व सर्वत्र आयात कर वाढवला आहे. भारतानेही काही अमेरिकन आयातीवर सीमाकर वाढवला आहे. ट्रम्प आता इराणविरुद्ध उभे राहिले आहेत. भारताने इराणकडून पेट्रोल घेऊ नये, असे त्यांनी सुचवले आहे; पण भारताने या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आहे. कारण इराण भारताकडून डॉलरऐवजी रुपये घ्यायला तयार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मात्र घसरत आहे. तो दर आता ६८.८८ रुपयापर्यंत आला आहे. पेट्रोलचे दर आता बॅरलला १५० डॉलरपर्यंत जातील असे म्हटले आहे. सध्या ब्रेंटक्रूडचा दर पिंपामागे ७६.४३ डॉलर्स आहे. तो फारतर १०० डॉलरपर्यंत जावा. पेट्रोलचे भाव वर गेले, तर ओएनजीसी ऑइल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज व वेदांत यांना फायदा व्हावा. तेलशुद्धीकरणाचे मार्जिन वाढले, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांचा नफाही वाढेल. त्यांच्या भावावर लक्ष ठेवून सध्याच्या भावात काही खरेदी करायला हरकत नाही. पेट्रोल उत्पादन व शुद्धीकरण या दोन्ही क्षेत्रातील शेअर्समध्ये, भागभांडवलाच्या निदान ३० टक्के गुंतवणूक हवी. चेन्नई पेट्रोलियम हा शेअर तीनशे रुपयाला घेण्यासारखा आहे. आता जून २०१८ तिमाहीचे कंपन्यांचे विक्री व नक्त नफ्याचे आकडे प्रसिद्ध होऊ लागले आहेत. आपल्या भागभांडारात जे शेअर्स आहेत किंवा जे घ्यावयाचे आहेत, त्यांच्या आकड्यांचे अभ्यास करावेत. विशेषतः गृहवित्त कंपन्या, खासगी बँका, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या यांचे आकडे महत्त्वाचे आहेत.

बजाज फायनान्स व बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांचे आकडे १८ जुलैला प्रसिद्ध होतील. इंडसइंड बँक, टाटा कन्सल्टन्सी यांचे आकडे १० जुलैला, तर अशोक लेलँडचे आकडे १७ जुलैला प्रसिद्ध होतील. इंडिया बुल्स हाउसिंग कंपनीचा शेअर ११४५ रुपयापर्यंत उतरला आहे. दिवाण हाउसिंग फायनान्स कंपनीचा शेअर ६३०-६४० रुपयांच्या आसपास फिरत आहे. दोन्ही कंपन्याच्या शेअर्सचे भाव वर्षभरात २५ टक्के वर जावेत. 

काही प्रमाणात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यांचे शेअरही खरेदीला योग्य आहेत. पाऊस समाधानकारकपणे आगेकूच करत आहे. गेल्या दोन दिवसांत केंद्र सरकारने १४ अन्नधान्यांच्या हमीभावात वाढ केली आहे. उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जास्त हमीभाव असतील. त्यामुळे सुमारे एक लाख ७५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात पडतील; पण यामुळे थोडीशी महागाई वाढेल व त्याचा बागुलबुवा करून, रिझर्व्ह बँक आपल्या ऑगस्टच्या द्वैमासिक धोरणात रेपो व्याजदर वाढवेल. काही राष्ट्रीयीकृत बँका २०१९-२० मध्ये नफ्यात येण्याची शक्यता आहे; पण महाराष्ट्र बँकेच्या प्रमुखांनंतर आता अन्य बँकांच्या माजी अधिकाऱ्यांकडेही केंद्रीय अन्वेषण खात्याची नजर लागली आहे. बँकांच्या अनार्जित कर्जाच्या रकमा २०२० मार्चपर्यंत कमी झाल्या की त्यांच्याकडे गुंतवणूकदार पुन्हा वळतील, तोपर्यंत खासगी बँकांपैकी येस बँक व आरबीएल बँक याच गुंतवणुकीसाठी निवडाव्यात. येस बँक कंपनीचा शेअर सध्या ३३५ रुपयांवर आहे. वर्षभरात तो ४३० रुपये होऊ शकेल.

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search