Next
अदूर गोपालकृष्णन, टॉम क्रूझ, तिग्मांशू धुलिया, हरभजनसिंग
BOI
Tuesday, July 03, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

जगद्विख्यात चित्रपटदिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन, लोकप्रिय अभिनेता टॉम क्रूझ, लक्षवेधी दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया आणि क्रिकेटपटू हरभजनसिंग यांचा तीन जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
......
अदूर गोपालकृष्णन 

तीन जुलै १९४१ रोजी अदूरमध्ये (केरळ) जन्मलेले अदूर गोपालकृष्णन हे अभिनेते, नाटककार आणि प्रयोगशील चित्रपटदिग्दर्शक म्हणून जगद्विख्यात आहेत. त्यांचं घराणं हे केरळच्या नृत्यशैलीला प्रोत्साहन देणारं. त्यामुळे कलेची आवड उपजतच अंगात मुरली होती. त्यांनी लहान वयातच नाटकात कामं करणं चालू केलं होतं. पुढे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पटकथा लेखनाचं आणि दिग्दर्शनाचं प्रशिक्षण घेतलं. त्यांनी १२ चित्रपट आणि तीसेक डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवल्या आहेत. त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाबद्दल पाच वेळा, उत्कृष्ट पटकथेबद्दल दोन वेळा आणि उत्कृष्ट सिनेनिर्मितीबद्दल नऊ वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांना ‘इंटरनॅशनल फिल्म क्रिटिक्स’तर्फे लागोपाठ सहा वर्षं उत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. कान्स, व्हेनिस, बर्लिन, लंडन, टोरोंटो, अशा सर्वच प्रमुख फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या सिनेमांचं आवर्जून प्रदर्शन केलं जातं. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला २०१६मध्ये ५० वर्षं पूर्ण झाली. अनेक महत्त्वाच्या चित्रपट महोत्सव सोहळ्यांमध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला गेला आहे. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. वन्स ओन चॉइस, असेंट, फेस टू फेस, रॅट ट्रॅप, दी वॉल्स, मोनोलॉग, दी सर्व्हिल, मॅन ऑफ दी स्टोरी, शॅडो किल, ए क्लायमेट फॉर क्राइम, वन्स अगेन, ही त्यांच्या काही गाजलेल्या महत्त्वाच्या सिनेमांची इंग्लिश नावं! भाषेबद्दलची त्यांची मतं परखड आहेत नि वेळोवेळी सार्वजनिक कार्यक्रमांत ते ती व्यक्तही करत असतात. ‘मराठी, मल्याळम, तेलुगू, गुजराती या भारतातल्या अधिकृत भाषा आहेत. त्यामुळे या भाषांतील सिनेमांना प्रादेशिक सिनेमे म्हणणं चुकीचं आहे,’ असं मत त्यांनी मांडलं होतं. तसंच, ‘हिंदी ही एक अत्यंत सुंदर भाषा आहे; मात्र अन्य भाषकांवर ती लादली जाऊ नये,’ असंही मत त्यांनी अलीकडेच व्यक्त केलं होतं. 
...... 

टॉम क्रूझ

तीन जुलै १९६२ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला टॉम क्रूझ हा ८०च्या दशकापासूनचा अत्यंत लोकप्रिय देखणा अभिनेता. १९८१ साली ‘एंडलेस लव्ह’पासून त्यानं सिनेमात काम करायला सुरुवात केली. ‘रिस्की बिझिनेस’मुळे तो लोकांच्या लक्षात आला आणि ‘टॉप गन’मुळे लोकांच्या हृदयात शिरला. दी कलर ऑफ मनी, रेनमॅन, बॉर्न ऑन दी फोर्थ ऑफ जुलै, ए फ्यू गुड मेन या सिनेमांमधल्या त्याच्या भूमिका गाजल्या; पण तो जगभरच्या रसिकांचा प्यारा बनला ते ‘मिशन इम्पॉसिबल’च्या सर्वच भागांमुळे!! यांमधली त्याची एजंट एथन हंट ही भूमिका लक्षवेधी ठरली. त्याला आजपर्यंतच्या कारकिर्दीत तीन वेळा ऑस्करचं नामांकन मिळालं होतं, तर तीनवेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले! कॉकटेल, डेज ऑफ थंडर, फार अँड अवे, दी फर्म, जेरी मॅकग्वायर, मायनॉरिटी रिपोर्ट, दी लास्ट समुराई, वॉर ऑफ दी वर्ल्डज, नाइट अँड डे, इज ऑफ टुमॉरो, ममी, असे त्याचे कित्येक सिनेमे हिट ठरले आहेत. 
.........

तिग्मांशू धुलिया

तीन जुलै १९६७ रोजी अलाहाबादमध्ये जन्मलेला तिग्मांशू धुलिया हा पटकथालेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून त्याने पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सुरुवातीला अनेक दिग्दर्शकांकडे सहायक म्हणून काम केल्यावर त्याने काही काळ दूरदर्शनसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. २००३ सालच्या ‘हासिल’ चित्रपटापासून त्याने दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्याची पुढची ‘चरस’ ही फिल्म अमली पदार्थांच्या तस्करीसंबंधी होती. २०१२ साली त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘पानसिंग तोमर’ चित्रपटाने समीक्षक आणि जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं. राष्ट्रीय पातळीवरच्या क्रीडास्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या एका जवानाला पुढे डाकू बनावं लागलं, त्याची सत्यकथा मांडणाऱ्या या सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. सार्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिग्मांशूला या सिनेमाबद्दल दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. ‘साहब बीबी और गँगस्टर’ आणि ‘साहब बीबी और गँगस्टर रिटर्न्स’ हे त्याचे पुढचे दोन्ही सिनेमे समीक्षकांची आणि चाहत्यांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरले. 
.........

हरभजनसिंग

हरभजनसिंग हा कसोटीपासून टी-ट्वेंटीपर्यंत क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये खेळणारा भारतीय संघामधला एक प्रमुख खेळाडू आहे. तो फिरकी गोलंदाज आहे. तीन जुलै, १९८० पंजाबमधील जालंधरमध्ये हरभजनचा जन्म झाला. अगदी लहान वयात भारतीय संघात दाखल झालेल्या हरभजनच्या कारकिर्दीची सुरुवात विचित्र झाली. सुरुवातीच्या काळात त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून बरेचसे वादंग झाले आणि तो संघाबाहेर फेकला गेला. २००१मध्ये ‘स्टीव्ह वॉ’चा संघ भारताच्या दौऱ्यावर आलेला असताना भारतीय संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे खांद्याच्या दुखापतीने जायबंदी झाल्याने, कप्तान सौरव गांगुली चिंतेत पडला होता. ऑसी फलंदाज ऑफ स्पिन गोलंदाजाला बिचकून खेळतात, याचा पक्का अभ्यास सौरवने केला असल्याने, त्याने हरभजनसिंगला संघात घेण्याकरता निवड समितीला शिफारस केली. निवड समितीने केवळ कप्तानाच्या आग्रहाखातर हरभजनला संघात घेतले. २००६ ते २००८चा काळ हरभजनसाठी निराशेचा ठरला. या काळात १३ कसोटी सामन्यांत जेमतेम ३७ बळी हरभजनला मिळवता आले. या काळात त्याला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर पडावे लागले. २००७मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात हरभजन नव्हता; पहिल्या टी-२० वर्ल्ड कपसाठी निवड समितीने हरभजनला संघात परत आणले, तो क्षण त्याच्यासाठी मोलाचा ठरला. हरभजनसिंग हा ४०० कसोटी बळींचा टप्पा पार करणारा फक्त तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे (६१९ बळी) आणि कपिल देव (४३२ बळी) हे दोनच भारतीय गोलंदाज हरभजनच्या पुढे आहेत. इ. स. २००१ मध्ये अनिल कुंबळेच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाला पराभूत करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या हरभजनने गेल्या दहा वर्षांत भारतीय संघाकरिता भरपूर कष्ट घेतले आहेत. 
........

सुनीता देशपांडे
प्रतिभावान मराठी लेखिका आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या सहधर्मचारिणी सुनीताबाई देशपांडे यांचाही तीन जुलै हा जन्मदिन. त्यांच्याविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link