Next
अस्मितेच्या शोधात असलेली आसामी
BOI
Monday, August 06, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आसाम साहित्य सभेतर्फे घेतल्या जाणाऱ्या अधिवेशनाची भव्यता यावरून कळावी.एखाद्या व्यक्तीची जात, भाषा, धर्म किंवा जन्मस्थान कोणतेही असो, त्याने मातृभाषा म्हणून किंवा दुसरी वा तिसरी भाषा म्हणून असमिया भाषेला स्थान दिले, तर त्या व्यक्तीला आसामी म्हणावे, असा उदार दृष्टिकोन आसाम साहित्य सभेने घेतला आहे. विविध जाती-जमाती आणि समुदायांमध्ये विखुरलेल्या आसाम राज्यात आपली भाषा टिकविण्यासाठी या संस्था व व्यक्ती जे प्रयत्न करत आहेत, त्याला तोड नाही. हा त्यांच्या अस्मितेचा शोध आहे. अन् सध्याची परिस्थिती पाहता तो चालूच राहणार आहे.
..........
पाच-एक वर्षांपूर्वीची गोष्ट. ‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जाहनू बरुआ पुण्यात आले होते. त्यांना एक पुरस्कार मिळणार होता. या पुरस्काराला उत्तरादाखल केलेल्या भाषणात त्यांनी एक किस्सा सांगितला होता, तो म्हणजे उदयपूर येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरले असताना तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पासपोर्टची मागणी केली होती. अत्यंत विषादाने त्यांनी हा सर्व प्रकार कथन केला होता.

गेला आठवडाभर देशात ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’च्या (एनआरसी) मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना बरुआ यांची ती कैफियत सतत आठवत होती. आपल्या देशाच्या इतिहासात अविभाज्य भाग असणाऱ्या एका राज्याच्या व्यक्तीला आपण कोणती वागणूक देतो, हे बरुआ यांच्या ‘आप-बीती’वरून दिसत होते, तर आपली अस्मिता दाखवून देण्यासाठी आसामी लोक इरेला का पेटले आहेत, हे ‘एनआरसी’च्या चर्चेवरून कळून येत होते.

संपूर्ण पूर्व भारतात बंगाली भाषेचा मोठा प्रभाव आहे. आसाम आणि बांगलादेशात लाखो नागरिक बंगाली भाषा बोलतात, हे खरे आहे; पण ते सगळेच पश्चिम बंगालमध्ये राहणारे नाहीत. स्वामी विवेकानंदांसारखे महान संन्यासी, रवींद्रनाथ टागोरांसारखे प्रतिभावान कवी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे स्वातंत्र्यसेनानी यामुळे बंगाली भाषेने सर्व भारतीयांमध्ये एक आगळे स्थान मिळवले आहे. सप्तभगिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येतील राज्यांमध्ये खासकरून त्या भाषेचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे आणि अनेक राज्यांमध्ये बंगाली भाषक विखुरलेले आहेत. या बंगाली भाषा समुदायाला आपल्याकडे खेचण्यासाठी ममता बॅनर्जी शक्ती लावत आहेत; पण त्यात आसामी नागरिकांच्या स्वत्व टिकविण्याच्या धडपडीकडे दुर्लक्ष व्हायला नको.

आसाम खोऱ्याची आसामी किंवा असमिया ही इंडो-आर्यन वंशाची भाषा असून, शब्दभांडार मुख्यत: संस्कृतमधून आलेल्या शब्दांचे आहे. तिचे व्याकरण बंगालीसारखे आहे. एवढे, की काही वर्षांपूर्वी युनिकोड कन्सॉर्शियमने आसामी लिपीला बंगाली लिपीचाच एक उप-प्रकार मानला होता. त्यावरूनही मोठा वाद झाला होता. तसा या दोन भाषांमधील संघर्ष ५० वर्षांपेक्षाही जुना, एप्रिल १९६०पासूनचा. त्या वेळी आसाम प्रदेश काँग्रेस समितीने आसामी भाषा ही राज्याची एकमेव अधिकृत भाषा असावी, हा ठराव संमत केला होता.

त्यानंतर ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात तणाव निर्माण झाला. आसामी जमावाने बंगाली वस्त्यांवर हल्ले केले. जुलै आणि सप्टेंबर महिन्यात हे हल्ले सर्वाधिक तीव्र झाले. त्या वेळी सुमारे पन्नास हजार बंगाली हिंदूंनी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातून पलायन करून पश्चिम बंगालमध्ये आश्रय घेतला, तर ९० हजार जणांनी बराक खोऱ्यामध्ये आणि ईशान्येतील अन्य भागांमध्ये आश्रय घेतला होता. या प्रकाराची तीव्रता कामरूप जिल्ह्यात सर्वाधिक होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती गोपाल मेहरोत्रा यांची एकसदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीच्या अहवालानुसार ४०१९ झोपड्या जाळण्यात आल्या, तर ५८ घरे उद्ध्वस्त करण्यात आली होती. बंगाली भाषकांविरुद्धच्या या आंदोलनाला ‘बोंगाल खेडा’ या नावाने ओळखले जाते.

त्यानंतर आसामी भाषेला एकमेव अधिकृत भाषा म्हणून दर्जा देणारे विधेयक आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री बिमल प्रसाद चलिहा यांनी १० ऑक्टोबर १९६० रोजी विधानसभेत मांडले. इतकेच नव्हे, तर आसामी भाषेला राज्यभाषा करण्याची मागणी गैर-आसामी लोकांनी करायला हवी, अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. बंगाली हिंदूंचे प्रतिनिधी असलेले करीमगंज मतदारसंघाचे आमदार राजेंद्र मोहनदास यांनी या विधेयकाला विरोध केला; मात्र आसाम विधानसभेत हे विधेयक २४ ऑक्टोबर रोजी संमत झाले.

त्यानंतर फेब्रुवारी १९६१मध्ये बंगाली भाषक बराक खोऱ्यात राहणाऱ्या बंगाली भाषकांवर आसामी भाषा लादण्यात येत असल्याचा आरोप करून कचर गणसंग्राम परिषद या संघटनेची स्थापना झाली. आसाम सरकारच्या अन्यायाविरोधात सिल्चर, करीमगंज आणि हैलाकांडी येथील लोकांनी पाच फेब्रुवारी रोजी संकल्प दिवस पाळला, पदयात्रा काढल्या. या आंदोलनात मे १९६१मध्ये ११ जण मारले गेले.

याचे कारण म्हणजे बंगालीने आसामीवर सातत्याने कुरघोडी केल्याची आसामी लोकांची भावना होती. तसे पाहिले, तर भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये ब्रिटिशांचे बंगालीवर जरा जास्तच प्रेम होते. भारतात तळ ठोकल्यानंतर ब्रिटिश अधिकारी आणि सैनिकांनी सर्वांत आधी बंगाली भाषा शिकली होती. त्यानंतर हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषांचा क्रमांक लागला. (हिंदीसुद्धा त्या वेळी हिंदुस्तानी या नावाने ओळखली जात होती). ऐकायला गोड असलेल्या या भाषेने त्यांना मोहिनी घातली होती.

ब्रिटिशांच्या या बंगाली प्रेमाची झळ आसामी भाषेलाही पोहोचली. या वेळी आसामी भाषेला एवढे गौण स्थान मिळाले, की या भाषेच्या इतिहासात सन १८३६ ते १८७३ या ३७ वर्षांच्या काळाला काळे अंधारयुग असे नाव मिळाले आहे. या काळात बंगाली भाषेने आसामी भाषेला जवळपास झाकोळून टाकले. इंग्रजांसोबत आलेल्या बंगाली पांढरपेशा समाजाने आणि चहाच्या मळ्यातील मजुरांनी स्वतःसोबत बंगाली भाषाही आणली. त्यांच्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिक्षणाचे माध्यम म्हणून आणि सर्व सरकारी कामकाजात बंगाली भाषा स्थिरावली.

या अवस्थेतही आसामी भाषेचे पुनरुत्थान झाले, त्याचे श्रेय भारतात मिशनरी म्हणून आलेल्या नॅथन ब्राउन या अमेरिकी व्यक्तीला दिले जाते. आसामी भाषेला तिचे स्थान मिळवून देण्यासाठी त्याने ब्रिटिश प्रशासनाशी संपर्क केला. त्याच्यासारखेच आणखी एक मिशनरी माइल्स ब्रॉन्सन यांनी या भाषेला तिचा पहिला शब्दकोश दिला. त्याचप्रमाणे ‘अरुणोदोई’ (अरुणोदय) हे आसामीतील पहिले वर्तमानपत्र त्यांनीच काढले. आसाम आणि आसामी हे शब्दही पहिल्यांदा या ब्रॉन्सन यांच्या लिखाणातच सापडतात. या भागावर राज्य करणारे पराक्रमी आहोम राजांच्या नावावरून मिळालेले हे नाव.

स्वातंत्र्यानंतर तेरा वर्षांनी का होईना, आसामला स्वतःची राजभाषा मिळाली. परंतु तिला तिचे स्थान मिळत नसल्याची खंत आसामी लोकांना आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी आसामच्या तत्कालीन सरकारने विधानसभेत सांगितले होते, की आसामी या शब्दाची व्याख्या अद्याप झालेली नसल्यामुळे आसाम करारातील सहाव्या कलमाची अंमलबजावणी करता येणे अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे आसामी म्हणजे कोण, यावरून वाद सुरू झाला होता.

अजूनही ही भाषा संकटात असल्याचे तेथील लोकांचे मत बदललेले नाही. जून महिन्यात जनगणनेच्या आधारावर भाषिक गटांवर जो अहवाल आला होता, त्यात आसाममधील आसामी भाषेच्या लोकांची संख्या घटल्याचे दिसून आले होते. या अहवालानुसार, २००१मध्ये ४८.८० टक्के असलेल्या आसामी भाषकांची संख्या २०११मध्ये ४८.३८ टक्क्यांपर्यंत खाली आली होती. दुसरीकडे, राज्यातील बंगाली भाषकांची संख्या २००१मध्ये २७.५४ टक्के होती. ती वाढवून २०११मध्ये २८.९१ टक्के झाली.

त्यामुळेच आपली भाषा आणि संस्कृतीसाठी लढण्याची तीव्र ऊर्मी आसामी लोकांमध्ये दिसून येते. आसाम साहित्य सभा आणि आसाम जातीय महासभा यांसारख्या संस्था हिरीरीने या भाषेच्या संवर्धन आणि प्रसारासाठी प्रयत्न करतात. एखाद्या व्यक्तीची जात, भाषा, धर्म किंवा जन्मस्थान कोणतेही असो, त्याने मातृभाषा म्हणून किंवा दुसरी वा तिसरी भाषा म्हणून असमिया भाषेला स्थान दिले, तर त्या व्यक्तीला आसामी म्हणावे, असा उदार दृष्टिकोन आसाम साहित्य सभेने घेतला आहे. विविध जाती-जमाती आणि समुदायांमध्ये विखुरलेल्या आसाम राज्यात आपली भाषा टिकविण्यासाठी या संस्था व व्यक्ती जे प्रयत्न करत आहेत, त्याला तोड नाही. हा त्यांच्या अस्मितेचा शोध आहे. अन् सध्याची परिस्थिती पाहता तो चालूच राहणार आहे.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search