Next
मुंबईतील जुन्या वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची मागणी
प्रेस रिलीज
Friday, March 23, 2018 | 02:46 PM
15 0 0
Share this story

आमदार जयंत पाटीलमुंबई : मुंबईतील जुन्या इमारती आणि ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी आठ ते दहा कोटी रुपयांचा निधी दरवर्षी मिळावा, अशी मागणी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत केली.

राज्यातील पर्यटन या विषयावर आमदार जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये सविस्तर चर्चा केली. ‘राज्याच्या पर्यटनासाठी सरकारने सर्वंकष असे धोरण आणण्याची गरज आहे. मुंबई सागरी किनाऱ्यावर पर्यटनाच्यादृष्टीने चांगला विकास झाला, असे दाखवले जात आहे. परंतु आज दादर येथील समुद्रकिनाऱ्याची धूप होत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईला एकशे १४ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून, महाराष्ट्र सागरी मंडळाने या किनाऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी सिंगापूरच्या कंपनीला दिली आहे. दादर किनारपट्टीचा उल्लेख यासाठी करतोय की, या किनारपट्टीची पाहणी स्वत: पायी फिरुन मी केली आहे. दादरजवळचा वाळूचा प्रदेश संपल्यातच जमा आहे. पुण्याच्या शनिवारवाडयातील खोल्या मध्यंतरी जळून खाक झाल्या होत्या. त्या खोल्यांची प्रतिकृती तयार करण्याचा आणि रायगड किल्ल्यातील ऐतिहासिक साहित्याची प्रतिकृती तयार करावी असा प्रस्ताव मी दिल्लीला घेऊन गेलो होतो,’ असे जयंत पाटील यांनी सांगितले.

‘ऐतिहासिक वास्तूंचे जतन करायचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे न देता, ऐतिहासिक वास्तू तज्ज्ञांकडून ते काम करुन घ्यायला हवे,’ असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

‘ब्रिटीशांनी मुंबईमध्ये ज्या इमारती उभारल्या, त्या मुंबईची शान आहेत. पर्यटनामध्ये सुधारणा करताना मास्टर प्लॅन तयार करा आणि त्यामध्ये सर्वांना विश्वासात घ्या,’ असा सल्ला जयंत पाटील यांनी सरकारला दिला.

जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मजबुतीबाबतचा मुद्दाही या वेळी समोर आणला. ‘समुद्री पाण्यामुळे किल्ल्याचे दगड झिजत चालले आहेत. त्यांचे जॉईंट त्यामुळे दिसत असून, त्यावेळी किती पक्कं बांधकाम होतं हे लक्षात येतं. त्यामुळे या किल्ल्याची सुधारणा करण्याची व वारसा जपण्याची गरज आहे,’ असेही जयंत पाटील म्हणाले.

त्यांनी मुंबईमध्ये समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय पुतळयाचा मुद्दा उपस्थित केला. ‘या स्मारकाला पहिल्यांदा पर्यटकांनी भेट द्यावी, अशा पध्दतीचे काम व्हायला हवे,’ असे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये राज्यातील पर्यटनाचा दर्जा कशा पध्दतीने वाढला पाहिजे, हेही सरकारच्या लक्षात आणून दिले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link