Next
मीरा-भाईंदर परिसराचा फेरफटका
BOI
Wednesday, July 24, 2019 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

धारावी देवी‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण ठाणे शहराची माहिती घेतली. आजच्या भागात ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती घेऊ या.
...........
ठाण्याच्या पश्चिमेकडे अरबी समुद्राची थोडीशी किनारपट्टी आहे व तेथे मीरा-भाईंदर महापालिका आहे. त्याच्या आसपास डोंगरी परिसर आहे. तो पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे; मात्र इतिहासात याचे मोठे स्थान आहे; पण ते फारसे कोणास माहिती नाही. हा भाग सन १५००पासून पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. सन १७३७मध्ये या भागाचे महत्त्व चिमाजीअप्पांनी वसईवर केलेल्या स्वारीमुळे लक्षात येते. मीरा-भाईंदर व वसई यांच्यामध्ये खाडी आहे व त्यापलीकडे वसईचा किल्ला दिसतो. भाईंदर पश्चिम हा भाग अजून तरी सिमेंटच्या जंगलात अडकलेला नाही. येथील निसर्गसौंदर्य अजून तरी मोहात पाडते. हिरव्यागार वृक्षांनी झाकलेल्या टेकड्या, समोर अथांग समुद्र, बाजूला वसईची खाडी, मधूनच दिसणारी मिठागरे, हे पाहिल्यावर पर्यटकांची पावले पुन्हा पुन्हा येथे नक्कीच वळणार. संजय गांधी अभयारण्य याच भागात विस्तारले आहे. पश्चिमेला सागर आणि पूर्वेला राष्ट्रीय उद्यान असा हा परिसर आहे. 

धारावी/डोंगरी किल्ला अवशेष

डोंगरी किल्ला/ धारावी किल्ला :
या डोंगरी किल्ल्याचे अस्तित्व आता राहिलेले नाही. किल्ल्यावर थोडेफार एका बुरुजाचे, तटबंदीचे अवशेष शिल्लक राहिले आहेत; मात्र अरबी समुद्र ३६० अंशांमध्ये पाहता येतो. एका पॉइंटवर जणू समुद्र आपल्या सर्व बाजूंनी आहे असे वाटते. या किल्ल्यासमोरच वसईचा प्रसिद्ध किल्ला आहे. हा परिसर आता हॉटेल, रिसॉर्टस् यांनी गजबजू लागला आहे. मुंबईहून तासा-दीड तासात रेल्वेने, रस्त्यावरचे ट्रॅफिक टाळून तेथे जाता येते. लागूनच उत्तन बीच आहे, तसेच वेलंकनी बीच आणि दक्षिणेला गोराई बीच आहे. या भागात पोर्तुगीजांनी बांधलेल्या चर्चेसचे अवशेष, तसेच सुस्थितीतील चर्चही आहेत. 

लेडी ऑफ बेथलहेम चर्च, डोंगरी‘लेडी ऑफ बेथलहेम’ हे डोंगरी येथे पोर्तुगीज राजवटीत बांधलेले चर्च आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे चर्च सन १६१३मध्ये बांधले गेले. जवळच वरच्या बाजूला टेकडीवर ऐतिहासिक जेसुइट हर्मिटेज आणि इरेमिट्री चर्चचे अवशेष आहेत. 

वसईचा किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांना धारावीत किल्ला बांधणे आवश्यक आहे याची जाणीव होताच १२ एप्रिल १७३७ रोजी मराठ्यांनी धारावीवर हल्ला केला आणि धारावी ताब्यात घेऊन किल्ला बांधायला घेतला. या वेळी शंकरजी केशव व चिमाजीअप्पा यांच्यातील पत्रव्यवहारावरून किल्ल्याच्या बांधकामाबद्दल माहिती मिळते. त्यानुसार, या किल्ल्याच्या कामावर २२०० मजूर होते व त्यांना पाच रुपये रोज देण्यात येत होता. किल्ल्याच्या बांधकामाची माहिती मिळताच पोर्तुगीजांना धोक्याची जाणीव झाली व २८ फेब्रुवारी १७३८ रोजी पोर्तुगीजांनी किल्ला परत घेतला आणि अर्धवट झालेले किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. 

३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला. २८ फेब्रुवारी १७३८ रोजी पोर्तुगीजांनी धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला. नऊ मार्च १७३८ला चिमाजीअप्पांनी परत हल्ला केला; पण यश आले नाही. पुढे सहा मार्च १७३९ रोजी किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला व पोर्तुगीज आणि मराठे यांचा पाठशिवणीचा खेळ थांबला. या किल्ल्यावरूनच वसईची मोहीम पार पडली. त्यामुळे वसईच्या लढाईतील धारावी हे सोनेरी पान होते, असे म्हणावे लागेल. 

वसई किल्याची मोहीम दोन वर्षे चालू होती. त्यासाठी धारावी किल्ल्याचा महत्त्वाचा भाग विसरता येणार नाही. धारावी मंदिरापासून थोड्या अंतरावरून उजव्या बाजूला एक रॉक कट (दगड खाण) दिसून येतो. १५३६ ते १६०० दरम्यान पोर्तुगीजांनी गोव्यातील आणि वसई किल्ला बांधण्यासाठी या खाणीतील दगडाचा वापर केला होता. 

धारावी देवी मंदिर

धारावी देवी मंदिर :
१७३७मध्ये बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजीअप्पा यांच्याकडे वसई मोहिमेचे नेतृत्व होते. त्या वेळी धारावी येथे त्यांनी किल्ला बांधला. त्या वेळी खोदकाम करीत असताना देवीची एक मूर्ती सापडली. तिचे मंदिर येथे बांधण्यात आले. स्थानिक विश्वस्तांमार्फत मंदिराची चांगली व्यवस्था केली जाते. कोळी व आगरी समाजाचे हे कुलदैवत समजले जाते. येथील परिसर निसर्गरम्य असून सुंदर बगीचा, लहान मुलांसाठी खेळाची साधने, कारंजे अशा गोष्टी उपलब्ध आहेत. सहलीसाठी हे उत्तम ठिकाण आहे. 

धारावी मंदिर उद्यान

साई प्रतिशिर्डी राईमुर्धेउत्तन/उतन : हा मुंबईकरांचा वीकेंड पॉइंट आहे. शांत व स्वच्छ, गर्दी कमी असलेला किनारा म्हणून हा ओळखला जातो. मत्स्याहारी पर्यटकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. या गावामध्ये, बोंबील, बांगडा, पापलेट आणि अनेक प्रकारचे ताजे मासे मिळतात. तसेच स्थानिक लोकही स्वयंपाक करून जेवायला घालतात. 

मीरा-भाईंदर महानगरपालिका : पाच ग्रामपंचायतींच्या समावेशासह १२ जून १९८५ रोजी मीरा-भाईंदर नगरपालिकेची स्थापना झाली. २८ फेब्रुवारी २००२ रोजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. महानगरपालिका क्षेत्रामध्ये ३१ बगीचे शोभा वाढवीत आहेत. भाईंदरच्या आसपास अनेक वॉटर पार्क्स करमणुकीसाठी उपलब्ध आहेत. विश्रांतीसाठी रिसॉर्टस् आहेत.  

साई प्रतिशिर्डी राईमुर्धे : भाईंदरच्या पश्चिम भागात साई प्रतिशिर्डी हे श्री साईनाथांचे मंदिर आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हे फार लोकप्रिय ठिकाण आहे. 

कांदळवन

कांदळवन :
कांदळवनाच्या झाडांची जलप्रदूषणासह हवेतील कार्बन शोषण्याची क्षमता मोठी असते. मीरा-भाईंदर शहराच्या उत्तर दिशेला वसई खाडी, दक्षिणेकडे जाफरी खाडी, पश्चिमेला समुद्र आहे. खाड्या आणि त्यांच्या उपखाड्यांच्या परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात दाट कांदळवन आहे. या दाट कांदळवनात सोनेरी कोल्ह्यासह अनेक प्राणी, पक्षी, जलचर-मासे यांचे अस्तित्व आहे. याचे संवर्धन करण्याची उपाययोजना महापालिकेकडून करण्यात येत आहे. 

चौपाटीमीरा-भाईंदर चौपाटी : रेल्वे ब्रिजजवळ भाईंदर चौपाटी व जैसल चौपाटी असून, हे भाईंदरकरांचे संध्याकाळचे फिरण्याचे ठिकाण आहे. येथे मुलांसाठी खेळाची साधने आहेत. उद्यान आहे. समोर वसई खाडीचे निसर्गसुंदर वातावरण आहे. येथे बोटिंगचीही व्यवस्था आहे. समोर वसई खाडीतील तीन बेटेही दिसतात. भाईंदर वसई खाडीच्या तीरावर चौपाटीच्या पश्चिमेला क्रिकेट मैदान, फुटबॉल मैदान, जॉगिंग पार्क, नेहरू उद्यान ही करमणुकीची व फिरण्याची ठिकाणे आहेत. भाईंदर चौपाटीवरून वसई खाडी, किल्ला व बेट यांचे सुंदर दर्शन होते. 

चौपाटीजलवाहतूक : मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी आणि कल्याण या मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ आणि सागरी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांना गती देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यावर पर्यटन आणि प्रवासी वाहतुकीला चालना मिळेल. 

देशभरातील पर्यटकांच्या पसंतीला उतरेल असे बायो-डायव्हर्सिटी पार्क मीरा भाईंदर महापालिका आणि पर्यटन विभाग, एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. हा जैवविविधता उद्यानाचा पर्यटन प्रकल्प १२० कोटी रुपयांचा असणार आहे. 

घोडबंदर किल्ला

घोडबंदर :
१५३०मध्ये पोर्तुगीज ठाणे येथे आले व १५५०मध्ये त्यांनी किल्ला बांधला. पोर्तुगीज शैलीतील कमानी व भिंतींच्या बांधकामाचे अवशेष अद्यापही दिसून येतात. येथे कोयंडे किंवा बिजागऱ्यांची गरज नसलेला वैशिष्ट्यपूर्ण दरवाजा आहे. बुरुजाच्या माथ्यापर्यंत असलेल्या खाचांमधून हा दरवाजा वर-खाली सरकवून उघड-बंद करता येत असे. या बुरुजाच्या माथ्यावरून उल्हास खाडी व आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. दूरवरचा प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. घोडबंदर किल्ल्याची तटबंदी आजमितीस शिल्लक नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार येथपर्यंत आहे 

मीरा-भाईंदर व ठाणे यांची हद्द घोडबंदरने अधोरेखित होते. प्राचीन काळी मध्य-पूर्वेतून येणारी व्यापारी गलबते उल्हास नदीच्या खाडीतून कल्याणपर्यंत जात असत. त्यामुळे जलमार्गावर देखरेख करण्यासाठी घोडबंदरची उभारणी केली गेली. सह्याद्रीची एक सोंड उल्हास खाडीजवळ उतरते. तिचे टोक घोड्यासारखे दिसते. त्यामुळे या बंदराला घोडबंदर असे नाव पडले. सह्याद्रीच्या या सोंडेवरच घोडबंदर किल्ला बांधण्यात आला. काहींच्या मते घोड्याचे व्यापारी येथे घोडे उतरवीत, म्हणून घोडबंदर नाव पडले. 

वसईपासून धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, गायमुख किल्ला, नागला बंदर किल्ला, दुर्गाडी किल्ला अशी खाडीच्या बाजूने किल्ल्यांची शृंखला संरक्षणासाठी केली गेलेली दिसते. १७३७मध्ये चिमाजी अप्पाने हा किल्ला जिंकला, त्या वेळी पोर्तुगीजांची २५० माणसे मारल्याची व सात गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे. १८१८मध्ये तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. घोडबंदर येथे मीरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. (शिवसृष्टीबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

गायमुख

गायमुख :
ठाणे येथील घोडबंदर रस्त्यावर गायमुख हे ठिकाण आहे. येथे पूर्वी किल्ला होता. आता स्थानिकांनाही तेथे किल्ला होता याची माहिती नाही. येथे एका लहान टेकडीवर जगन्नाथ महादेवाचे सुंदर मंदिर आहे. येथून गर्द झाडीतून वाहणाऱ्या उल्हास नदीचे विहंगम दृश्य दिसते. खरे तर बॅकवॉटरसाठी केरळएवढेच या खाडीचे सौंदर्य आहे. येथे खाडीजवळ चौपाटी विकसित झाली आहे. गायमुखाच्या पश्चिमेला उल्हास खाडीचे पात्र अरुंद होते व पूर्वेला वळण घेऊन एकदम मोठे होते. त्यामुळे विलोभनीय असे दृश्य येथे पाहण्यास मिळते.  

जगन्नाथ मंदिर

नागला बंदर :
खाडीमध्ये रूपांतर झालेल्या उल्हास नदीमुळे मीरा-भाईंदर, ठाणे, कल्याण खाडीतीराचे सौंदर्य अधिक खुलते. उल्हास नदीची दिमाखदार वळणे, बाजूला असलेले हिरवेगार डोंगर यामुळे गायमुख परिसर अधिकच खुलून दिसतो. ठाणे शहर जिथे संपते, त्या गायमुख परिसरात असणारे नागला बंदर हे त्यापैकीच एक. येथे सध्या रेती उपसण्याचे काम चालू असते. ठाणे-बोरिवली रस्त्यावरचे हे एक विश्रांतीस्थळ आहे. नागला बंदरामध्ये चाललेली बोटींची वर्दळ बघण्याचीही थोडीशी गंमत असते. नागला येथे पूर्वी टेकडीवर किल्ला होता. आता त्याचे अस्तित्व राहिलेले नाही. एक चर्चही येथे आहे. वसई मोहिमेवर निघालेल्या चिमाजीअप्पा यांनी अगोदर नागला किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यातून जिंकला आणि पुढे कूच केले. या किल्ल्याला दगडखाणींचा विळखा पडला आहे. तसेच त्याचे नैसर्गिक सौंदर्य लोप पावत चालले आहे. काही स्थनिक लोकांनी याविरुद्ध आवजाही उठवला आहे. 

जगन्नाथ मंदिर सभामंडप

कसे जाल मीरा भाईंदर परिसरात?
मीरा-भाईंदर मुंबई-सुरत मार्गावर आहे. तसेच ठाणे-वसई रस्त्यावर आहे. मीरा-भाईंदर हे पश्चिम रेल्वेवरील रेल्वे स्टेशन आहे. जवळचा विमानतळ मुंबई. येथे राहण्यासाठी अनेक हॉटेल्स, रिसॉर्टस् आहेत. जास्त पावसाचा जुलै महिना सोडून वर्षभर केव्हाही पर्यटनास सोयीचे.

(या भागातील माहितीसाठी धारावी देवी मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, भाईंदर महापालिकेतील कार्यकारी अभियंता श्री. वाकोडे यांचे सहकार्य मिळाले.) 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

गायमुख
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sameer About 27 Days ago
छान
0
0
Vikki Vyas About 28 Days ago
Superb article.. Keep it up..
0
1
MILIND LAD About 29 Days ago
अतिशय माहितीपूर्ण लेख..
0
1
Vandana koranne About 29 Days ago
खुपच छान माहिती...
1
1

Select Language
Share Link
 
Search