दुबई : ‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना ‘फोर्ब्ज मिडल इस्ट’ मासिकातर्फे नुकतेच ‘टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१८ – रीटेल ॲवॉर्ड ’ पुरस्काराने गौरवण्यात आले. अरब जगतातील आघाडीच्या भारतीय नामवंतांच्या यादीत डॉ. दातार यांना तिसावे मानांकन मिळाले आहे. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव व अल अदील ट्रेडिंगचे संचालक हृषिकेश दातार यांचाही या यादीत भावी नेतृत्वाच्या स्वतंत्र श्रेणीत नामोल्लेख करण्यात आला आहे. दुबईतील फाईव्ह पाम जुमैरा येथे झालेल्या शानदार समारंभात भारताचे संयुक्त अरब अमिरातीतील (युएई) राजदूत नवदीपसिंग सुरी यांच्या हस्ते दातार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी फोर्ब्ज मिडल इस्टच्या संपादक खुलौद अल ओमिया आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. दातार म्हणाले, ‘हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून, त्यामागे अल अदील समूहाचे कर्मचारी आणि ग्राहक यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा कारणीभूत आहे. संयुक्त अऱब अमिरातीतील राज्यकर्त्यांचाही मी आभारी आहे. त्यांच्या पाठबळामुळे आम्हाला कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आले आहे.’
डॉ. धनंजय दातार यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करणाऱ्या अल अदील ट्रेडिंगने नऊ हजार भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत उपलब्ध करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज घडीला अल अदील ग्रुपची आखाती देशांत ३९ सुपरमार्केट्स, दुबई, अबूधाबी, शारजा व अजमान भागात दोन पीठाच्या आधुनिक गिरण्या, दोन मसाला उत्पादन कारखाने असे जाळे विस्तारले आहे. मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या नावाने मुंबई निर्यात विभागही कार्यरत आहे. अल अदील समूह सक्रिय विस्तार साधत असून, नुकतीच ओमान व बहारीनमध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली त्याचप्रमाणे कुवेत, ओमान व युएई या देशांत व्यापारी मार्ग निर्माण करुन विशेष वर्गातील आस्थापनांद्वारे आयात व निर्यात क्षेत्रांतही विस्तार केला आहे.