Next
गुरु: साक्षात् परब्रह्म।
‘स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता’
BOI
Sunday, September 23, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this story

श्री स्वामी स्वरूपानंद‘‘मी कोण, कुठून आलो, कुठे जाणार?’ या प्रश्नांची उत्तरं प्राप्त होऊन, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका म्हणजेच अध्यात्म. हे ज्ञान ज्याच्या सान्निध्यात मिळतं, तो आध्यात्मिक गुरू. मुमुक्षूला म्हणजे मोक्षाची इच्छा असलेल्या व्यक्तीला गुरू शोधावा लागत नाही. गुरूच आपल्या योग्य शिष्याला आपल्याजवळ बोलावून घेतो किंवा स्वतः त्याच्याकडे जातो. मी माझ्या गुरूजवळ जाऊन कसा पोहोचलो, त्याची ही गोष्ट...’ लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर, त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
...........
गीतेच्या १०व्या अध्यायातील ३२व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात - ‘अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्’... अध्यात्माचं ज्ञान देणारी विद्या सर्व विद्यांमध्ये सर्वांत श्रेष्ठ होय. ‘मी कोण, कुठून आलो, कुठे जाणार?’ या प्रश्नांची उत्तरं प्राप्त होऊन, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका म्हणजेच अध्यात्म. हे ज्ञान ज्याच्या सान्निध्यात मिळतं, तो आध्यात्मिक गुरू. मुमुक्षूला म्हणजे मोक्षाची इच्छा असलेल्या व्यक्तीला गुरू शोधावा लागत नाही. गुरूच आपल्या योग्य शिष्याला आपल्याजवळ बोलावून घेतो किंवा स्वतः त्याच्याकडे जातो. 

मी माझ्या गुरूजवळ जाऊन कसा पोहोचलो, त्याची ही गोष्ट.  

दिनांक १५ डिसेंबर १९७३. रात्री पावणेनऊच्या एसटीनं रत्नागिरीला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनजवळच्या स्टँडवर आम्ही गाडीची वाट बघत बसलो होतो. आम्ही म्हणजे मी आणि माझी मामेबहीण डॉ. चित्रा खेर. ती विद्यापीठात पालीची प्राध्यापक होती.

तिला काही महिन्यांसाठी जपानला जायचं होतं. तत्पूर्वी पावसला जाऊन स्वामी स्वरूपानंद यांचा आशीर्वाद घ्यावा, अशी तिची इच्छा होती. सोबत म्हणून मी तिच्याबरोबर जात होतो. तिकडे येत असल्याबद्दल एक पत्रही टाकलेलं होतं.

रात्रीचे १० वाजले, बसचा पत्ता नव्हता. अकरा वाजले, बारा वाजले - आम्ही आपले बसून! जनतेची सहनशक्ती अफाट आहे. एकनंतर मात्र ती संपली. आरडाओरड सुरू झाली. स्वारगेट डेपोला फोन गेले. अखेर रात्री सव्वादोनला बस आली आणि पावणेतीनला ती निघाली. सहा तास लेट!

एरव्ही, सकाळी सातच्या आत पोहोचणारी गाडी जवळपास दुपारी १२च्या सुमारास रत्नागिरीला जाऊन थडकली. त्या वेळी, रत्नागिरीजवळच्या भाट्ये खाडीवर आजच्यासारखा पूल नव्हता. रिक्शानं अलीकडच्या काठावर जायचं, तरीतून खाडी ओलांडायची आणि पलीकडे बस पकडून पावसला जायचं. हा सर्व प्रवास आणि वातावरण अतिशय सुंदर असे. पावसला पोहोचायला, साहजिकच दुपारचे दोन झाले. ‘आंबेवाले देसाईं’च्या घरी स्वामींची खोली होती. ते विश्रांती घेत असल्यामुळे लगेच दर्शन शक्य झालं नाही; पण देसाईंच्या एका मुलानं सांगितलं, की स्वामींनी तीन वेळा ‘आले का’ म्हणून चौकशी केली होती. ‘तुम्ही आता आवरून घ्या आणि जेवण करा. पाचच्या सुमारास दर्शनासाठी इथे या,’ तो म्हणाला.

त्याप्रमाणे, आम्ही दुपारी पाचला पुन्हा तिथे हजर झालो आणि वाट बघत बसलो. खोलीच्या बाहेरूनच दर्शन मिळत असे. आम्हाला बोलावल्यावर, स्वामींना साष्टांग नमस्कार केला. त्यांनी हात वर करून आशीर्वाद दिला.

काल, १५ डिसेंबर म्हणजे स्वामींचा जन्मदिवस. आज दिनांक १६ची संध्याकाळ. मनात विचारांची घालमेल चालू होती. रात्रीपर्यंत, आधी ध्यानीमनी नसताना, स्वामींना अनुग्रह मागावा, असा निश्चय केला. बहिणीच्या कानावर ती गोष्ट घातली. त्या वेळी ती काय म्हणाली, ते आठवत नाही.

सकाळी, ‘आपला अनुग्रह मिळावा, अशी तीव्र इच्छा आहे,’ असं लिहिलेली चिठ्ठी स्वामींच्या खोलीबाहेरील सेवकाकडे दिली. स्वामी यथावकाश त्याचं उत्तर देतीलच!

बहिणीनंही एक पत्र दिलं. त्यात, जपानच्या दौऱ्यासाठी आशीर्वाद असावेत, अशी विनंती केलेली होती. आणखीही असं लिहिलं होतं - ‘श्री अक्कलकोट स्वामींची उपासना घरात आहे. त्यांच्यावर दृढ श्रद्धा आहे. परंतु, आपल्याबद्दलही खूप भक्ती आणि ओढ आहे. त्यामुळे द्विधा मन:स्थिती झालेली आहे. मी कुणाची निवड करू?’

तिनं मला ते पत्र वाचायला दिलं होतं. तिचा प्रश्न मला खटकला होता. दोन्ही स्वामींची भक्ती केली, तरी त्यात विरोध नव्हताच. अक्कलकोटचे स्वामी आम्हाला आजोबा, पणजोबांसारखे प्रेमळ व अधिकारी संत वाटत असत. पावसचे स्वामी वर्तमानकाळातील, समक्ष मार्गदर्शन करू शकतील असे साक्षात्कारी संत होते.

...पण मी हे बहिणीला बोललो नाही. एकतर ती माझ्यापेक्षा मोठी होती आणि आध्यात्मिक बाबतीत आपण काही बोलू नये, असं मला वाटलं.

स्वामींचं तिला उत्तर आलं - ‘मुली, तू नि:शंकपणे अक्कलकोट स्वामींची उपासना कर. तुझ्या प्रवासाला माझे आशीर्वाद!’ हे अपेक्षितच होतं.

त्या माझ्या चित्राताईचं १९७८ साली, अक्कलकोट स्वामींच्या १००व्या पुण्यस्मृतीच्या वर्षी, त्याच तिथीला - चैत्र वद्य त्रयोदशी - कॅन्सरनं दुर्दैवी निधन झालं. योगायोग पाहा - माझा जन्मही चैत्र वद्य त्रयोदशीचा आहे.

माझ्याही पत्राला उत्तर आलं होतं. दुसऱ्या दिवशी अनुग्रह घेण्यासाठी मला स्वामींच्या खोलीबाहेर हजर राहायला सांगण्यात आलं. मंत्र आणि उपासनेची पद्धत छापील कागदावर देण्यात येत असे. स्वामींची प्रकृती नाजूक झाली असल्यानं समक्ष अनुग्रह देणं शक्य नव्हतं. परंतु, दृष्टीतल्या सामर्थ्यामुळे, शिष्य दूर असला तरी त्याला ते ‘कृतार्थ’ करू शकत होते.

पावस येथील स्वामी स्वरूपानंदांचं मंदिरपूजेचं साहित्य घेऊन मी तिथे जाऊन थांबलो. योग्य वेळी मला अनुग्रह मिळाला. जन्माचं कल्याण झालं. त्यासाठीच आम्ही तिथे गेलो होतो!

१९ तारखेला पुन्हा स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही दुपारपर्यंत रत्नागिरीला पोहोचलो. पुण्याला परतण्यासाठी रात्रीची बस होती. रत्नागिरीला आम्ही घाणेकर आळीत पं. पुरुषोत्तमशास्त्री फडके यांच्या घरी आलो. त्या वेळी ते एक वर्षाचं गायत्री पुरश्चरण करत होते. त्यांचं मौन होतं. त्यांची मुलगी पुणे विद्यापीठात एका संस्कृत व्याकरण ग्रंथावर पीएचडी करत होती.

शास्त्रीबुवांच्या सौभाग्यवतींनी चांगलं आदरातिथ्य केलं. थोडंफार शहरात फिरलो. कोकणचं निसर्ग-सौंदर्य मनाला भुरळ घालतं. फडक्यांच्या घरी मनात विचार आला- आपली सासुरवाडी इथे आणि अशीच असावी. दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला पोहोचलो. २० डिसेंबर १९७३ रोजी साधना सुरू झाली.

त्यानंतर, स्वामी असताना दोन वेळा पावसला गेलो होतो. त्यांची प्रकृती ढासळत होती. शिष्य आणि भक्तवृंद दिवसरात्र ‘रामकृष्णहरि’चा जप करत होते. अखेर, १५ ऑगस्ट १९७४ रोजी स्वामी निजधामाला गेले. 

डिसेंबर २०१५मध्ये साधना सुरू करून ४२ वर्षं - साडेतीन तपं झाली.  

१९७४ पूर्वी मी नियतकालिकांत (वृत्तपत्रांसह) लेख, नाट्यचित्र परीक्षणं वगैरे लिहीत असे. डिसेंबर ७४पासून ‘माणूस’ साप्ताहिकात मी केलेला पहिला अनुवाद क्रमश: प्रसिद्ध होऊ लागला. तो इतका गाजला, की ऑक्टोबर ७५मध्ये पुस्तक रूपात त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. आळंदीला, श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात त्याचं पाच ऑक्टोबरला प्रकाशन झालं. आजवर त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. नंतर माझ्या नावावर ३५ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.
स्वामींच्या अनुग्रहानंतर मी लेखक बनलो. पुस्तकांमधील शब्दांना सामर्थ्य आणि जिवंतपणा त्यांच्या आशीर्वादामुळे प्राप्त झाला, अशी माझी श्रद्धा (नव्हे खात्री) आहे.

पं. फडकेशास्त्रींची एक कन्या आशा. तिचं बीए व बीएडचं शिक्षण रत्नागिरीतच झालं. त्यानंतर काही दिवस ती पावसच्या शाळेत शिकवत होती. त्या वेळी अनेकदा स्वामींना भेटलीही होती. स्वामींची तब्येत ठीक असल्यामुळे ते सगळ्यांशी बोलत असत. फडकेशास्त्री कार्यक्रमांच्या निमित्तानं पावसला जात असल्यामुळे, त्यांच्या मुलीबद्दल स्वामींना प्रेम वाटत होतं.

पुढे आशा एमए आणि नंतर डॉक्टरेटसाठी ६९-७० साली पुण्याला आली. माझ्या पहिल्या पावस-भेटीच्या मागे-पुढे आमची भेट झाली. त्या वेळी मी फक्त बीए होतो. मामेबहिणीच्या घरी किंवा विद्यापीठात काही वेळा आमच्या गाठीभेटी झाल्या. फेब्रुवारी-मार्च ७४च्या दरम्यान एकदा तिच्याबरोबर रत्नागिरीच्या समुद्रावर गेलो असताना ‘आपण लग्न करायचं का?’ असं तिला विचारलं आणि ती ‘हो’ म्हणाली!

गंमत अशी होती, की मी कुठेही चांगली अशी नोकरी करत नव्हतो. ‘लेखक’ म्हणून नुकतीच कारकीर्द सुरू झाली होती. म्हणजे नियमित उत्पन्नाची वानवाच. पुढे लेखक म्हणून नाव झालं, तरी चहा-पेट्रोलपाण्यापुरते पैसे मिळत राहणार, क्वचित चार पैसे जास्त! मग ‘याच्या’ उदरनिर्वाहाची सोय काय, असा नियती विचार करत असेल.

इकडे आशा स्वतंत्र वृत्तीची, हॉस्टेलला एकटी राहिलेली. फोटोग्राफी, प्रवास, संस्कृतचे कार्यक्रम, मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी, या सर्वांत पुढे असलेली, त्यामुळे रूढार्थानं ‘सातच्या आत घरात’ ही शक्यताच नव्हती. सर्वसामान्य घरात ते चाललं नसतं.

आता, या दोघांचंही ‘कल्याण’ करावं, असा विचार स्वामींनी केला असणार (असं मला वाटतं). ईश्वरी योजना काय असते, हे आपल्याला कळत नाही - आणि आपण नशिबाला दोष देत राहतो.

एकूण काय, तर सात डिसेंबर १९७५ला आमचं लग्न झालं. कोकणातल्या सासुरवाडीची माझी इच्छा पूर्ण झाली. सुखदु:खाचे दिवस जात-येत, त्यालाही ४५ वर्षे पूर्ण होतील. या जन्मात आता उर्वरित काळ फार उरलेला नाही. तोही आनंदात जाईलच.

‘आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया’

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link