Next
शहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख
‘नव अजंठा अॅव्हेन्यू’चा उपक्रम
प्राची गावस्कर
Friday, February 22, 2019 | 04:37 PM
15 0 0
Share this story

‘सिर्फ फाउंडेशन’चे संस्थापक सुमेधा आणि योगेश चिथडे यांच्यासह तृप्ती नायर, मधुलिका चव्हाण, सोनाली फराटे, लता नायर आदी मान्यवर.

पुणे : सीमेवर कोणी जवान धारातीर्थी पडला, की सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या संतापाचे, चर्चेचे प्रमाण मोठे असते; मात्र प्रत्यक्ष काही कृती करण्यासाठी, मदतीसाठी पुढे येणारे हात तुलनेने कमी असतात. पुण्याच्या कोथरूड भागातील नव अजंठा अॅव्हेन्यू या सोसायटीतील नागरिकांनी मात्र आपल्या कृतीतून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. या नागरिकांनी पाच लाख रुपयांचा निधी उभारून, तो सीमेवर शहीद झालेल्या सहा जवानांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. नुकताच हा हृद्य सोहळा पार पडला. मनात आणले, तर एक सोसायटीही किती मोठे काम करू शकते, याचेच हे उदाहरण.

तृप्ती नायर यांना मदतीचा धनादेश प्रदान करताना वृंदा पाथरकर
पुलवामामध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसहून अधिक जवान मृत्युमुखी पडले. त्यामुळे संतप्त, व्यथित झालेल्या नागरिकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत, निधी गोळा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘नव अजंठा अॅव्हेन्यू’मधील रहिवाशांनी एकत्र येऊन पाच लाख रुपयांचा निधी जमा केला. सोसायटीत असलेल्या ‘चक दे इंडिया’ या समूहाने यासाठी पुढाकार घेतला. २६ जानेवारी रोजी सोसायटीत झालेल्या आनंदमेळ्यात लावण्यात आलेल्या स्टॉल्समधून झालेला फायदा भारतीय सैन्याला मदत म्हणून देण्याची कल्पना पुढे आली. हळूहळू या कल्पनेला सगळ्यांची साथ मिळत गेली. प्रत्येकाने जमेल तसा निधी देण्याचे आवाहन करण्यात आले. १८ फेब्रुवारीपर्यंत पाच लाख रुपयांचा निधी जमा झाला. 

मधुलिका चव्हाण यांना मदतीचा धनादेश प्रदान करताना वृंदा पाथरकर
सहा शहीदांच्या कुटुंबीयांना मदत

कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या सहा जवानांच्या कुटुंबीयांना हा निधी देण्याचे ठरवण्यात आले. अशा कुटुंबीयांशी संपर्क साधण्याच्या कामात सुमेधा आणि योगेश चिथडे यांनी मदत केली. शहीद झालेल्या पाच जवानांच्या कुटुंबीयांशी त्यांच्या ‘सिर्फ फाउंडेशन’च्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. त्यात तृप्ती नायर, मधुलिका चव्हाण, सोनाली फराटे, अश्विनी पाटील, प्रियांका तांबडे आणि पूनम भदाणे यांचा समावेश होता. 

यापैकी सोनाली फराटे, मधुलिका चव्हाण आणि तृप्ती नायर या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तृप्ती नायर व्हीलचेअरवरून आपली आई, सासू, आजेसासूबाई यांच्यासह कार्यक्रमाला आल्या होत्या. सोनाली फराटे आपल्या चार-पाच वर्षांच्या जुळ्या मुलींसह आल्या होत्या. या मुली एका वर्षाच्या असताना सौरभ फराटे शहीद झाले. उच्चशिक्षित मधुलिका चव्हाण नोकरी करून स्वाभिमानाने जगत आहेत आणि त्यातून काही रक्कम भारतीय सैन्यासाठी मदत म्हणून देतात. निपाणीत राहणाऱ्या अश्विनी पाटील यांनी आपले पती साताप्पा पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शासनाकडून मिळालेली पंचवीस लाख रुपयांची मदत खर्च करून एक शाळा उभारली आहे. सोसायटीत राहणाऱ्या एका मेजरच्या आई आणि एका कॅप्टनच्या आजी असलेल्या वृंदा पाथरकर यांच्या हस्ते या सर्वांना मदतीचे धनादेश देण्यात आले. 
 
सुमेधा आणि योगेश चिथडे यांना मदतीचा धनादेश प्रदान करताना वृंदा पाथरकर
उलगडली शौर्यगाथा...

सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी सुमेधा आणि योगेश चिथडे हे दाम्पत्य ‘सिर्फ फाउंडेशन’च्या माध्यमातून निधी उभारत आहे. ज्यांच्यामुळे आपण सुखाने, सुरक्षितपणे जगू शकतो, अशा जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिथडे दाम्पत्य हा प्रकल्प उभारत आहे. या दाम्पत्याने या कार्यक्रमात भारतीय लष्कराची कामगिरी, शहीद जवानांच्या कुटुंबीयांची माहिती दिली. भारताच्या शूरवीर जवानांच्या वेगवेगळ्या युद्धांमधील असामान्य शौर्याच्या कथा, कारगिल युद्धातील प्रसंग, जम्मू-काश्मीरमधील वातावरण, सियाचीनमधील प्रतिकूल परिस्थितीतही देशासाठी शीर तळहातावर घेऊन लढणारे जवान, परमवीरचक्र विजेत्यांच्या कथा अशी शौर्यगाथा सुमेधा चिथडे यांनी उलगडली आणि सारे सभागृह रोमांचित होऊन ऐकत होते. 

‘मैलोन् मैल पसरलेला बर्फ, तापमान उणे ५३ अंश सेल्सिअस, श्वास घेणेही कठीण अशा अत्यंत प्रतिकूल स्थितीत सियाचीनमध्ये आपला तिरंगा फडकताना दिसतो. जिवाची पर्वा न करता, छातीचा कोट करून हिमालयासारखे शत्रूसमोर उभे ठाकलेले आपले जवान फक्त देशप्रेमाच्या प्रेरणेने आपले कर्तव्य बजावत असतात, आणि आपण काय करतो?.....’ सुमेधा यांच्या या सवालाने सारेच जण स्तब्ध झाले होते. अनेकांच्या डोळ्याला आसवांच्या धारा लागल्या होत्या. 


वीरपत्नींचे निःशब्द करणारे उत्तर

ज्या शहीद जवानांच्या पत्नींना या वेळी निधी देण्यात आला, त्यांनी उत्तरादाखल व्यक्त केलेल्या भावना निःशब्द करणाऱ्या होत्या. ‘तुम्ही आमच्याप्रति जे प्रेम, आदर दाखवलात, त्याबद्दल खूप आभारी आहोत. तुम्ही आमच्याबरोबर राहा, हीच मागणी आहे. आमच्याकडून जे शक्य होईल, ते आम्ही देशासाठी देतच राहू.’ आपला माणूस देशासाठी गमावूनही देशासाठी देण्याची त्यांची ऊर्मी सगळ्यांनाच थक्क करून गेली. उपस्थित आबालवृद्ध उभे राहिले आणि त्यांनी सर्वांना सलाम केला. वंदे मातरम् आणि ‘जय हिंद’चा जयघोष सगळ्या सभागृहात निनादत राहिला.

संपर्क : सिर्फ फाउंडेशन :  ९७६४२ ९४२९२

(सुमेधा चिथडे यांच्या कार्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jayawant Desai About 24 Days ago
Great Patriotic work by women
0
0
महेश माधव वर्तक About 25 Days ago
नव अजंठा सोसायटी, कोथरूड, पुणे कायम सामाजिक बांधिलकी दाखवून हर प्रकारे समाजा साठी पर्यायाने राष्ट्रासाठी मोलाच्या गोष्टी करत आली आहे. माझ्या अनेक शुभेच्छा! नागरिकांनी सुद्धा यातून स्फूर्ती घ्यावी ही सदिच्छा!
0
0
लांबतुरे प्रकाश सोलापूर About 25 Days ago
खुपच छान. सोसायटी सभासदांना धन्यवाद
0
0

Select Language
Share Link