Next
तेरे प्यार का आसरा...
BOI
Sunday, April 21, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

चित्रपट आणि टीव्ही मालिका क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी केलेले दिग्दर्शक, निर्माते म्हणजे बी. आर. चोप्रा. २२ एप्रिल हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आस्वाद घेऊ या त्यांच्या ‘धूल का फूल’ चित्रपटातील ‘तेरे प्यार का आसरा...’ या गीताचा...
.............
हिंदी चित्रपटसृष्टीत काही घराणी प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ कपूर, आनंद, मुखर्जी, तसेच चोप्रा! होय! भावाभावांनी मिळून चित्रपटसृष्टीत कधी एका चुलीवर, तर कधी स्वतंत्र चूल मांडून स्वयंपाक केला! स्वादिष्ट पक्वान्नांनी ताटे भरून रसिकांपुढे ठेवली. त्यांच्यापैकी बलदेवराज चोप्रा अर्थात बी. आर. चोप्रा यांचा उद्या म्हणजे २२ एप्रिलला जन्मदिन! त्या निमित्ताने या दिग्गज कलावंताच्या स्मृती जागवताना काय दिसते?

लुधियानाला जन्मलेला बलदेवराज अत्यंत बुद्धिमान होता. १९३६च्या सुमारास इंग्लिश विषय घेऊन तो एमए झाला व त्याने आयएएस परीक्षेची जोरदार तयारी सुरू केली; पण प्रकृतीने मोडता घातला. नाही तर उच्चपदस्थ सरकारी अधिकारी म्हणूनच तो ओळखला गेला असता; पण नियतीचे खेळ वेगळे असतात, ते कोणाला ज्ञात होतात? 

बलदेवराजला सिनेमाची आवड होती आणि लिहिण्याचीही हौस होती. चित्रपटासंदर्भातील एक लेख त्याने ‘व्हरायटीज’ या नियतकालिकाकडे पाठवला; पण तो लगेचच्या अंकात छापला गेला नाही. निराश न होता तो लेख लिहीत गेला व पाठवत गेला. आश्चर्य म्हणजे त्याचे तीन लेख ‘व्हरायटीज’च्या एकाच अंकात प्रसिद्ध झाले. पुढे लेखन चालू ठेवल्यामुळेच पुढच्या दोन वर्षात ‘सिने हेराल्ड’ या मासिकाचा तो संपादक झाला; पण हे सर्व लाहोरला चालू होते. 

फाळणीनंतर बलदेवराज मुंबईला आले. एका चित्रपट कंपनीत काही काळ व्यवस्थापक म्हणून नोकरी केली. ओळखी होत गेल्या आणि त्यातूनच एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी त्यांना मिळाली. ‘करवट’ हे त्या चित्रपटाचे नाव होते! आणि नंतर आय. एस. जोहरची एक कथा विकत घेऊन बलदेवराज यांनी त्या कथेवर भागीदारीत एक चित्रपट निर्माण केला! ‘अफसाना’ हे त्या चित्रपटाचे नाव! अशोककुमार, वीणा, कुलदीप कौर, प्राण हे कलावंत त्यात होते. हुस्नलाल भगतरामचे संगीत त्याला लाभले होते. ‘अभी तो मै जवान हूँ...’ हे मधुर गीत त्याच चित्रपटात होते. आजही ते श्रवणीय आहे. ‘अफसाना’नंतर शोले, चांदनी चौक हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. १९५३ व १९५४मध्ये ते प्रदर्शित झाले. 

१९५६मध्ये बी. आर. चोप्रांनी ‘बी. आर. फिल्म्स’ ही स्वत:ची चित्रसंस्था स्थापन केली आणि ‘एक ही रास्ता’ या चित्रपटाची निर्मिती केली. अशोककुमार, मीनाकुमारी, सुनील दत्त हे कलावंत त्या चित्रपटात होते. बी. आर. फिल्म्सच्या या पहिल्याच चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश मिळवले. या पहिल्याच चित्रपटात विधवा विवाह ही सामाजिक समस्या त्यांनी हाताळली होती. या चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटांसाठी ज्वलंत व स्फोटक विषय निवडले. ‘धूल का फूल’ हा चित्रपट कुमारी माता या विषयावरील होता. जातीय वैमनस्याचे परिमाण त्यांनी ‘धर्मपुत्र’मध्ये दाखवले. वेश्येचे पुनर्वसन (साधना), विवाहबाह्य संबंध (गुमराह), फाशीची शिक्षा (कानून), बलात्कार (इन्साफ का तराजू), घटस्फोटाच्या प्रथेमुळे मुस्लिम महिलांवर होणारा अन्याय (निकाह) असे सामाजिक विषय चित्रपटांमधून मांडताना त्यांनी ते चित्रपट केवळ उपदेशाचे डोस पाजणारे न बनवता सुसह्य बनवले. यांत्रिकीकरण व त्यामुळे होणारी कष्टकऱ्यांची हालत हा विषय ‘नया दौर’मध्ये मांडल्यावर ‘हा चित्रपट चालणार नाही’ असे अनेकांनी सांगितले होते. 

...पण चोप्रांच्या चित्रपटातील कथानकाची हाताळणी, त्याची पटकथा व महत्त्वाचे म्हणजे सुमधुर गीते यामुळे बी. आर. फिल्म्सचा चित्रपट आवर्जून बघावा असाच बनत गेला. चित्रपटाच्या कथानकासंदर्भात विचार करून, उलटसुलट चर्चा करून त्या कथेचे पटकथेत रूपांतर करताना कष्ट घेणारे सी. जे. पावरी, अख्तर उल इमान आणि सतीश भटनागर या बी. आर. फिल्म्सच्या कथा विभागाच्या लेखकांचे श्रेय बी. आर. फिल्म्सच्या चित्रपटांच्या यशात निश्चितच मोलाचे होते. 

कॅमेरामन धरम चोप्रा व यश चोप्रा हे बी. आर. यांचे भाऊही त्यांना या निर्मितीत साह्य करत असत! काही काळाने यश चोप्रा वेगळे झाले आणि त्यानंतर बी. आर. यांनी दिलेले दास्तान, धुंद, जमीर, कर्म हे चित्रपट म्हणावे इतके प्रभावी ठरले नाहीत; पण चित्रपटातील वेगळे प्रयोग ही त्यांची एक वेगळी ओळख राहिलीच. त्यांनी यानंतरच्या काळात ‘इत्तेफाक’ हा चित्रपट काढला. त्यात एकही गाणे नव्हते. अर्थात असा प्रयोग त्यांना त्यापूर्वी ‘कानून’ चित्रपटासाठीही केला होता. 

‘अफसाना’ या आपल्या जुन्या चित्रपटावरून त्यांनी ‘दास्तान’ हा चित्रपट १९७२मध्ये काढला आणि ‘नया दौर’चा नवीन अवतार म्हणून ‘मजदूर’ हा चित्रपट १९८३मध्ये काढला; पण दोन्हीही चित्रपट अपयशी ठरले. हो, अगदी दिलीपकुमार असूनही!

...आणि यानंतर मात्र सामाजिक समस्या, चित्रपटाच्या कथानकातून हाताळणाऱ्या या निर्मात्याने ‘पती पत्नी और वो’ हा हलक्याफुलक्या विषयाचा एक धमाल विनोदी चित्रपट निर्माण करून चित्रपटप्रेमींना एक सुखद धक्का दिला. त्यानंतर मात्र चोप्रांच्या जीवनात यशापयशाचाच खेळ सुरू झाला. इन्साफ का तराजू, निकाह, तवाईफ, आज की आवाज हे चित्रपट यशस्वी ठरले, तर दी बर्निंग ट्रेन, आवाम, देहलीज हे चित्रपट अयशस्वी ठरले!

बी. आर. प्रतिभावंत होते. दी बर्निंग ट्रेन, वक्त यांसारख्या चित्रपटांचे मूळ विषय म्हणजे आग, भूकंप यातून घडणारे उत्पात यावर परदेशात निर्माण झालेल्या चित्रपटांची उदाहरणे देऊन एका चित्रपट अभ्यासूकांनी बी. आर. यांच्या या दोन चित्रपटांची खिल्ली उडवली! पण भूकंपामुळे असेही घडू शकते, हा बघण्याचा वेगळा दृष्टिकोन असू शकत नाही का? त्यामुळेच मला त्यांचा ‘वक्त’ खूप भावला होता. 

बी. आर. चोप्रा यांनी चित्रपटाच्या क्षेत्रात अशी अनमोल कामगिरी केली व काही अपयशेही पचवली. पुढे काळ बदलला. टीव्हीचा जमाना सुरू झाला. रामानंद सागर यांनी रामायण टीव्हीच्या पडद्यावर आणले व लोकांनी ते डोक्यावर घेतले. ते बघून चोप्राही या नवीन क्षेत्रात उतरले व त्यांनी महाभारतालाच हात घातला. ‘कर्मण्येवाधिकारस्ते...’ या श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोकाच्या उच्चारणाबरोबर बी. आर. फिल्म्सचा लोगो पडद्यावर येऊन मगच मुख्य चित्रपट सुरू होत असे. आता तो श्लोक, तो लोगो सारे टीव्हीच्या पडद्यावर आले. आकर्षक, सुरेल आणि आशयपूर्ण टायटल साँगबाबतीत बी. आर. यांनी कोणतीच कसूर ठेवली नाही आणि महाभारतकालीन वातावरण, पोषाख, शस्त्रे, वाहने, इतकेच नव्हे तर सुसंस्कृत भाषा या बारीकसारीक गोष्टींचा विचार करून महाभारत मालिका त्यांनी परिपूर्ण केली. तरीही त्यांच्यावर टीका झाली, की नको त्या गोष्टी त्यांनी महाभारतात घुसडल्या! पण आम पब्लिकने महाभारत आवडीने पाहिले. घराघरातून ‘कर्मण्येवाधिकारस्ते...’चे स्वर घुमत गेले. 

चित्रपट आणि टीव्ही मालिका यांमध्ये संस्मरणीय कलाकृती तयार करून पाच नोव्हेंबर २००८ रोजी बी. आर. यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या माघारी त्यांचा मुलगा रवी चोप्रा बी. आर. फिल्म्स ही संस्था चालवत आहे. अर्थात तेथे यशापयशाचा लपंडाव चालू आहे. 

बी. आर. हयात होते, तेव्हा त्यांच्या चित्रपटांची काही वैशिष्ट्ये होती. कथानकात एखादा पत्रकार असायचा! चित्रपटासाठी बहुतेक वेळी साहिर यांचीच गीते असायची! महेंद्र कपूरचा आवाज, रवीचे संगीत बहुतेक वेळी असायचे! टीव्ही मालिकेतसुद्धा महेंद्र कपूरचाच आवाज वापरला गेला होता. 

अशा या बी. आर. चोप्रांच्या चित्रपटांतील अनेक गीते ‘सुनहरी’ आहेत. त्यापैकीच एक गीत ‘धूल का फूल’ चित्रपटातील! एखादा मुकाबला किंवा सवाल-जवाब अशा पद्धतीने लिहिले गेलेले, गीतकार साहिर यांच्या प्रतिभेचा वेगळा आविष्कार दाखवणारे हळुवार प्रेमगीत आपण येथे बघणार आहोत. खरे तर तो दोन प्रेमी जीवांचा प्रेमळ संवाद आहे. हा असाच प्रकार साहिर यांनी वक्त चित्रपटाकरिताही लिहिला होता. तो ही बी. आर. चोप्रा यांचाच चित्रपट होता. 

बघू या येथे हा प्रियकर काय म्हणतो - 

वफा कर रहा हूँ, वफा चाहता हूँ 

तुझ्या प्रीतीच्या आसऱ्याची-आधाराची अपेक्षा करत आहे. मी निष्ठा दाखवत आहे व तुझ्याकडूनही निष्ठेचीच अपेक्षा करत आहे. 

प्रेमाची अपेक्षा करणाऱ्या प्रियकराला ही प्रेयसी एक कठोर सत्य कसे सांगते बघा – 
ती म्हणते - 

हसीनों से अहदे वफा चाहते हो 
बडे नासमझ हो ये क्या चाहते हो

हसीनों से - अर्थात सुंदर तरुणींकडून वचने, निष्ठा यांची अपेक्षा करता तुम्ही? खरोखरच या अशा गोष्टींची अपेक्षा करता म्हणजे तुम्ही निर्बुद्ध, बेअक्कल आहात. 

इतकी अपमानित करणारी भाषा ऐकूनही हा प्रेमात पागल झालेला आशिक आपली स्वप्ने तिला सांगतो - 

तेरे नर्म बालों में तारे सजा के 
तेरे शोख कदमों में कलिया बिछा के 
मोहब्बत का छोटासा मंदिर बना के 
तुझे रात-दिन पूजना चाहता हूँ

तुझ्या मुलायम केशकलापामध्ये तारकांची सजावट करून, तुझी चंचल पावले जेथे पडतील त्या मार्गात कळ्या अंथरून, प्रेमाचे एक छोटेसे मंदिर बनवून (अर्थातच त्यात तुला ठेवून) तुझी मी दिवसरात्र पूजा करू इच्छित आहे. 

आपल्याबद्दल इतके काही करू इच्छिणारा आशिक, त्याची स्वप्ने ऐकून खूश होण्याऐवजी ही रूपगर्विता त्याला फटकारून सांगते -

जरा सोच लो दिल लगाने से पहले 
की खोना भी पडता है पाने से पहले 
इजाजत तो लो जमाने से पहले 
की तुम हुस्न को पूजना चाहते हो

एखाद्यावर मन जडवण्याआधी, अर्थात प्रेम करण्याआधी जरा विचार करा, की काही मिळविण्याआधी काही गमवावे लागते आणि तुम्ही सौंदर्याचे पूजक बनू इच्छिता म्हणून या जगाची, दुनियेची त्यासाठी आधी परवानगी घ्या!
(मग बघा काय होते ते!)

असे सांगणाऱ्या प्रेयसीला तो म्हणतो, ते ठीक आहे पण...

कहाँ तक जिए तेरे उल्फत के मारे 
गुजरती नही जिंदगी बिन सहारे 
बहुत हो चुके दूर रहकर इशारे 
तुझे पाससे देखना चाहता हूँ

तुझ्या प्रेमाने घायाळ झालेला मी तुझ्याशिवाय किती काळ जगू शकेन? तुझ्या सहाऱ्याशिवाय माझे जीवन व्यतीत होऊ शकत नाही. तू फक्त दुरून खाणाखुणा करायच्या, हे आता खूप झाले. आता मात्र मी तुला माझ्या समीपच बघू इच्छित आहे. 

प्रियकराचे हे सरळ सरळ धाडसी विचार ऐकल्यावर ती त्याला या गोष्टीची जाणीव करून देते, की -

मोहब्बत की दुश्मन है सारी खुदाई 
मोहब्बत की तकदीर में है जुदाई 
जो सुनते नहीं है दिलों की दुहाई 
उन्ही से मुझे मांगना चाहते हो

परमेश्वराने निर्माण केलेले हे जग प्रेमाचे वैरी आहे आणि तशातच प्रीतीच्या भाळी विरहाचा शाप लिहिलेला असतो. जे लोक प्रेमिकांच्या हृदयाची हाक/स्पंदने ऐकत नाहीत, अशा लोकांकडून (जमान्याकडून) तू माझी मागणी करतोस? 

एवढी वास्तवता ऐकूनही तो दिवाणा तिला म्हणतो -

दुपट्टे के कोनों को मूँह में दबा के 
जरा देख लो इस तरफ मुस्कुराके 
मुझी से मुझे छीन लो पास आ के 
की मैं मौत से खेलना चाहता हूँ

(जमान्याची वागण्याची ही पद्धत मला माहीत आहे गं; पण तू एकदा तरी) तुझ्या खांद्यावरील ओढणीचे एक टोक तोंडात पकडून, जरा माझ्याकडे बघून मंद स्मित कर! तुझ्या एका कटाक्षाने माझ्याजवळ येऊन मला माझ्यापासून लुटून ने (म्हणजे मी माझा राहणार नाही) आणि असे घडले, तर मग मी मृत्यूशी द्धा खेळायला तयार आहे (कोणतेही संकट झेलायला तयार आहे.)

आपल्या अदाकारीचे गुणगान व आपल्याकडून त्याच्या या अपेक्षा ऐकल्यावर ती त्याला अजूनही सावध करण्यासाठी म्हणते -

गलत सारे दावे, गलत सारी कसमें 
निभेंगी यहाँ कैसे उल्फत की रस्में
यहाँ जिंदगी है रिवाजों की बस में 
रिवाजों को तुम तोडना चाहते हो

साऱ्या आणाभाका, शपथा, वचने सारे फोल आहे. येथे प्रेमाच्या रिवाजाचा, परिपाठाचा निभाव तू कसा लावणार? येथे जीवन एका विशिष्ट रिवाजाने चालते. तू काय त्या रिवाजांना तोडू इच्छितोस?
या तिच्या प्रश्नावर तो सांगतो -

रिवाजों की परवाह ना रस्मों का डर है 
तेरी आँख के फैसले पे नजर है 
बला से अगर रास्ता पुरखतर है 
मै इस हाथ को थामना चाहता हूँ

मला रिवाजांची फिकीर नाही आणि परिपाठाची भीती नाही. माझी नजर फक्त तुझ्या अपेक्षित कटाक्षावर लागून राहिली आहे. आणि एकदा तू निर्णय दिलास, अर्थात संमती दर्शवलीस, तर जरी हा प्रीतीचा मार्ग संकटांनी खडतर (पुरखतर) असला, तरी मला त्याची पर्वा नाही. मी फक्त तुझा हात हातात धरू इच्छित आहे. तुझी साथ मला हवी आहे. 

दोन प्रेमिकांचा हा संवाद साहीर यांनी शब्दात उतरवला; पण तो संगीतात बांधताना त्या चित्रपटाच्या वेळी म्हणजे १९५८-५९च्या सुमारास संगीतकार रवी यांचा बी. आर. फिल्म्समध्ये प्रवेश झाला नव्हता. त्यामुळे संगीताची जबाबदारी एन. दत्ता यांनी सांभाळली होती. ‘धूल का फूल’ची आठही गीते त्यांनी मधुर बनवली होती. या गीतातही प्रत्येक काव्यातील शेवटच्या ओळीतील पहिले एक-दोन शब्द वेगळ्या पद्धतीने गायला लावून, तसेच लता मंगेशकर यांच्या कडव्यानंतर ‘बडे नासमझ हो...’ या ओळीची रचना करून, तर महेंद्र कपूर यांच्या कडव्यानंतर ‘वफा कर रहा हूँ...’ या ओळीची रचना करून हे गीत एन. दत्तांनी रंगतदार बनवले आहे. ‘हसीनो सें अहदे’ या ओळीतील सौंदर्यवती हे विशेषण पडद्यावरची माला सिन्हा सार्थ ठरवते. जोडीला राजेंद्रकुमारचा देखणा चेहरा! महेंद्र कपूर व लता दीदींचे साजेसे स्वर! सारेच सुनहरे, सुनहरे! 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search