Next
मुंबईत ‘सायबर सुरक्षा’ पुस्तिकेचे प्रकाशन
निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त मार्गदर्शन
प्रेस रिलीज
Wednesday, April 10, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this article:मुंबई : महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘सायबर सुरक्षा’ पुस्तिकेचे प्रकाशन मुख्य निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव अश्वनी कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. ही पुस्तिका राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सायबर कार्यालयाने तयार केली आहे.

या वेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, संचालक (माहिती) सुरेश वांदिले, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक डॉ. बाळसिंग राजपूत आणि सचिन पांडकर, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत आयोगासह उमेदवार आणि विविध राजकीय पक्ष सायबर जगताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. निवडणूकविषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ई-मेल्स, समाज माध्यम वापरताना घ्यावयाची काळजी, फेक न्यूजसह खोडसाळ प्रचार मोहीम राबविण्यासाठी ‘स्पिअर फिशिंग स्कॅम्स’ करणाऱ्यांपासून बचावासाठी कोणत्या दक्षता घ्याव्यात याच्या सूचना महाराष्ट्र सायबर कार्यालयाने ‘सायबर सुरक्षा’ या पुस्तिकेद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठी आयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा, नव्या ॲप्सचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही प्रचारासाठी समाज माध्यमांचा वापर सुरू केला आहे. समाज माध्यमांचा गैरवापर होऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित रहावी यासाठी ‘महाराष्ट्र सायबर’ने पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणेला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि ऊर्दू या भाषेतून प्रकाशित केलेल्या ‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

या पुस्तिकेत समाजमाध्यमांवरील बातम्या, ट्रोलिंग, प्रायोजित मजकूर याबाबतीत जनजागृती करण्याच्या सूचना, फेक ॲप्स आणि संकेतस्थळांबद्दल जागृती करण्याबरोबरच व्यक्तिगत आणि बाह्य उपकरणांच्या वापराविषयी दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

समाज माध्यमांवरील फेक न्यूजची पडताळणी करण्यासाठी उपयुक्त टिप्स दिल्या आहेत. फेसबुक पोस्टच्या वर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात ‘ही फेक न्यूज स्टोरी आहे’ हा पर्याय, तर व्हॉट्सअॅपवर अफवा अथवा माहिती खातरजमा करण्यासाठी ‘व्हॉट्सअॅप चेकपॉइंट टीपलाइन’वर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्हॉट्सअॅपवर निवडणुकीच्या संदर्भातील खोट्या बातम्या, अफवा, प्रक्षोभक मजकूर, चित्रांबद्दल सतर्क राहण्यासह त्याविषयी महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रिया राबविताना कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे हे स्पष्ट करतानाच भारत सरकारने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४२ ॲप्सची यादी प्रसिद्ध केली आहे. निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’सह इतर अधिकृत ॲप्स, संकेतस्थळे, तसेच तक्रारींसाठी महत्त्वाच्या नोडल्स संस्थांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. हॅक अथवा हायजॅक झालेल्या सोशल मीडिया खात्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सायबरशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search