Next
‘समाजाला जोडणारा बंधुतेचा विचार रुजावा’
ज्येष्ठ साहित्यिक, विधिज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांचे मत
प्रेस रिलीज
Monday, April 15, 2019 | 12:35 PM
15 0 0
Share this article:

सत्कार समारंभावेळी डावीकडून शंकर आथरे, अॅड. भास्करराव आव्हाड, डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. अरुण आंधळे, प्रकाश रोकडे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, विनोद गलांडे पाटील.

पुणे : ‘आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत संवेदना, सहवेदना याची आवश्यकता असून, माणसांचे संघटन व्हायला हवे. समाजाचे ज्ञान वाढले आहे; परंतु ‘शहाणपण’ हरवले आहे. अशावेळी समाजाला शहाणे करणाऱ्या आणि एकमेकांशी जोडणाऱ्या बंधुतेच्या विचारांची रुजवण होणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक विधिज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘त्रिवेणी संगम’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, नवी दिल्ली येथे होणाऱ्या २१ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया व सहाव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्रा. अरुण आंधळे यांचा सत्कार आणि कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘काळी आई’ काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन असे ‘त्रिवेणी संगम’ या कार्य्क्रमचे स्वरूप होते. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी भूषविले. परिषदेचे सरचिटणीस शंकर आथरे, स्वागताध्यक्ष उद्योजक विनोद गलांडे पाटील, बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत रोकडे उपस्थित होते.

‘काळी आई’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन करताना मान्यवर.

अॅड. आव्हाड म्हणाले, ‘गाडगेबाबा, बहिणाबाई हे अशिक्षित, तरीही प्रज्ञावंत होते. समाजाला जोडण्याचे आणि शहाणे करण्याचे काम त्यांनी आपल्या साहित्यातून केले. आज बौद्धिक दिवाळखोरी असलेले लोक नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे विचारवंतांनी पुढे येत बंधुतेचा, सामाजिक न्यायाचा विचार जनसामान्यात रुजवला पाहिजे. त्यातून समाज एकसंध ठेवण्यास मदत होईल.’

डॉ. पगारिया म्हणाले, ‘भगवान महावीर, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश दिला. हाच संदेश सर्वत्र पोहोचवून भेद आणि संघर्षमुक्त जीवन यासाठी बंधुता साहित्य संमेलन प्रयत्नशील आहे. बंधुतेचा विचार दिल्लीच्या व्यासपीठावरून मांडण्याची संधी २१व्या साहित्य संमेलनामुळे मिळाली आहे.’

डॉ. आंधळे म्हणाले, ‘बाबासाहेबांचे विचार आणि बंधुतेचे मूल्य जपले, तर विधायक जनशक्ती निर्माण होईल. कवी, लेखक विद्यार्थ्यांसमोर आणून त्यांच्यात वाचनाची चळवळ आणखी व्यापक करण्यासाठी विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन उपयुक्त ठरेल.’

रोकडे म्हणाले, ‘गेल्या ३० वर्षांपासून आम्ही सगळे एकत्र आहोत. बंधुता साहित्य संमेलनाचे हे २१ वे वर्षे आहे. बंधुता या जागतिक मूल्याचा विसर पडता कामा नये. यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. बंधुतेच्या व्यासपीठावर कोणत्याही विचारांचा, जाती-धर्माचा भेदभाव न करता काम केले जाते.’

कार्यक्रमाची सुरुवात भीम गायकवाड व संगीता झिंजुरके यांच्या गायनाने झाली. गलांडे पाटील यांनी स्वागत केले. कवी चंद्रकांत वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. झिंझुरके यांनी सूत्रसंचालन केले. आथरे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search