Next
‘पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना प्राधान्याने सोई-सुविधा द्याव्यात’
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचना
प्रेस रिलीज
Friday, May 31, 2019 | 05:30 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘आषाढी वारीच्यानिमित्ताने पालखी सोहळ्याच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात,’ अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या. 

‘पालखी सोहळा २०१९’च्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अमर माने, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग एस. एम. कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, बारामतीचे उप विभागीय अधिकारी हेमंत निकम, दौंड-पुरंदरचे उप विभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर, पुणे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, तहसीलदार हवेली, बारामती, इंदापूर, पुरंदर तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहूचे पालखी सोहळा प्रमुख, दोन्ही संस्थानचे प्रमुख विश्वस्त, शासकीय अधिकारी उपस्थ‍ित होते.

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २४ जूनला, तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे २५ जूनला श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या काळात पुणे जिल्ह्यातील पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी, तसेच पालखी मार्गावर मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट, कत्तलखाने व दारूची दुकाने बंद ठेवावीत. या सोहळ्यात सामील असणाऱ्या वाहनांची तपासणी करणे व त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देणे, वाहतुकीचे नियोजन, सुरळीत विद्युत व्यवस्था, सपाटीकरण, निर्माल्य व्यवस्था आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा, शासकीय दरामध्ये रॉकेल, धान्य, अखंडीत वीज पुरवठा करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आले.

या वेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पुरवठा विभागाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच अग्निशमन यंत्रणा यांचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या कालावधीत पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजनाबाबत संस्थानप्रमुखांशी चर्चा केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वारीच्या काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी, पालखीतळांवरील खड्डे मुरुम भराई करून व्यवस्थ‍ित करणे, आवश्यक त्या ठिकाणी रोलिंग करणे, पालखीतळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुकानदारांकडून होणाऱ्या अतिक्रमणाबाबत, तसेच पालखीमध्ये सामील वाहनांच्या पार्किंगबाबत चर्चा करण्यात आली आणि या संदर्भात संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या. या वेळी संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 81 Days ago
Of course . It is a matter of public health . Co - operation among different organisations is absolutely necessary . This must not become a matter of politics .
0
0

Select Language
Share Link
 
Search