Next
सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला पीएसआय
हिमायतनगरमधील महेंद्र मोपलवार याचे यश
नागेश शिंदे
Monday, March 18, 2019 | 02:38 PM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : जिद्द आणि चिकाटी हे दोन गुणधर्म असले, की प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम यश मिळवता येते, याची उदाहरणे तशी दुर्मीळच. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी येथील महेंद्र पोपलवार याचा त्या दुर्मीळ उदाहरणांत समावेश झाला आहे. एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या महेंद्र याने पीएसआय परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचे यश ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा देणारे आहे. 

‘ध्येय निश्चित असेल आणि दृढ इच्छाशक्ती असेल, तर प्रतिकूल परिस्थितीतही चांगले यश मिळविता येते,’ असे महेंद्र याने सांगितले. त्याच्या यशाचे गमकच जणू त्याने सांगितले. काही महिन्यांपूर्वीच एका स्पर्धा परीक्षेत त्याने यश मिळवले होते. सध्या तो मंत्रालयात जलसंधारण विभागात कार्यरत आहे. आता या परीक्षेतील यशामुळे तो पोलीस उपनिरीक्षक बनला आहे.

श्यामराव दाऊजी पोपलवार यांचा महेंद्र हा मुलगा. महेंद्रचे आई-वडील वडिलोपार्जित शेती करतात. महेंद्रला चार बहिणी आहेत. एवढे मोठे कुटुंब चालवणे अवघड असूनही श्यामराव यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या सर्व मुलांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले, पोटाला चिमटा घेऊन आणि मुलगा-मुलगी भेदभाव न करता सर्वांना शिकविले. त्यांची एक मुलगी आज ‘आदर्श शिक्षिका’ म्हणून ओळखली जाते, तर एक मुलगी शासकीय सेवेत आहे. कधी कर्ज काढून, तर कधी काळजाचा तुकडा असलेली जमीन विकूनही त्यांनी मुलांना शिकविले. याचेच संस्कार महेंद्र आणि त्याच्या सर्व बहिणींवर झाले.

महेंद्र पीएसआय झाल्याचे कळताच त्याच्या जन्मगावी मौजे टेंभी येथे फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. पेढे वाटून सर्व गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्याने यशाचे श्रेय आई शांताबाई व वडील श्यामराव यांना दिले आहे.

त्याच्या यशातून ग्रामीण भागातील अन्य मुलांनी काय संदेश घ्यावा, असे विचारले असता तो म्हणाला, ‘जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिेत करणे गरजेचे आहे. तसे असेल, तर कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर यश संपादन करता येते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search