Next
‘एकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये’
‘वंचित विकास’तर्फे आयोजित कार्यशाळेत डॉ. सुरेखा पंडित यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, July 23, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘आपल्याकडे लग्न हा फार प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. लग्न न करणाऱ्या, घटस्फोटित अथवा विधवा अशा एकट्या राहणाऱ्या स्त्रियांकडे समाजात वेगळ्या नजरेने पहिले जाते. त्यांना नानाविध समस्यांचा सामनाही करावा लागतो; पण महिलांनी आपल्या एकटेपणाचा न्यूनगंड न बाळगता मानसिकदृष्ट्या खंबीर राहून या आव्हानांचा सामना करायला हवा,’ असे मत समुपदेशिका आणि मानसशास्त्र अध्यापिका डॉ. सुरेखा पंडित यांनी व्यक्त केले.

वंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटातर्फे ‘एकटेपणा पेलताना’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते. या कार्यशाळेत मीना कुर्लेकर यांनी ‘एकटेपणा समजून घेताना’ हे सत्र घेतले. या वेळी डॉ. पंडित यांच्यासह उद्योजिका सिंधू महाडिक, डॉ. सागर पाठक यांनी मार्गदर्शन केले. महाडिक यांनी अनुभव कथन केले. एकटेपणा घालविण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमितपणे संस्थेच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे कुर्लेकर यांनी सांगितले.


डॉ. पंडित म्हणाल्या, ‘एकटे आहोत म्हणून खचून जाऊ नका. वस्तुस्थितीचा स्वीकार करून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. दैनंदिनी लिहायला सुरवात करून त्या माध्यमातून व्यक्त व्हायला शिका. आपल्याला ज्यामध्ये समाधान वाटते, त्या गोष्टी शोधा आणि त्या करा. एकटेपणावर मात करण्यासाठी स्वतःला ओळखायला शिकणे आवश्यक आहे; तसेच तुमच्या क्षमता ओळखूण नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.’

‘एकट्या स्त्रिया आणि लैंगिकता’ या विषयावर बोलताना डॉ. पाठक म्हणाले, ‘एकट्या असणाऱ्या आणि लैंगिक समस्या जाणवणाऱ्या व्यक्तींचा गट मोठा आहे. लैंगिकता ही इतर भावनासारखी एक सर्वसामान्य भावना आहे. एकट्या व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्तीशी या भावनेबद्दल बोलणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या आदर्श प्रतिमेचा बागुलबुवा करू नये. एकट्या महिलांनी सोशल सर्कल निर्माण करण्यासह सामाजिक नाते निर्माण करणे आणि या विषयावर त्या व्यक्तीशी बोलणे गरजेचे आहे. लैंगिक भावना दडपल्याने त्रास होतो.’


कार्यशाळेचा समारोप करताना ‘वंचित विकास’चे संस्थापक विलास चाफेकर म्हणाले, ‘आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच मरतो. त्यामुळे एकटेपणाचे ओझे मानू नये. स्वतःला ज्या गोष्टीत आनंद वाटतो, त्या गोष्टी कराव्यात. आपले स्वतःचे आयुष्य आपणच सुखी केले पाहिजे. स्वतःवर प्रेम करायला शिकावे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search