Next
टुनटुन, नाशाद, यूल ब्रिनर, थॉमस मिचल
BOI
Wednesday, July 11, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

प्रसिद्ध गायिका आणि हास्यअभिनेत्री उमादेवी ऊर्फ टुनटुन, संगीतकार नाशाद, ऑस्कर विजेता अभिनेता यूल ब्रायनर आणि ‘ट्रिपल क्राउन ऑफ अॅक्टिंग’ मिळवणारा अभिनेता थॉमस मिचल यांचा ११ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.... 
टुनटुन 
११ जुलै १९२३ रोजी उत्तर प्रदेशात जन्मलेली उमादेवी खत्री ही चाळीसच्या दशकाच्या अखेरच्या काळातली प्रसिद्ध गायिका. उमादेवी या नावाने तिने ‘दर्द’ आणि ‘अनोखी अदा’ यांसारख्या १९४७-४८ सालातल्या काही हिट सिनेमांत, नौशाद यांचं संगीत दिग्दर्शन असलेल्या ‘आज मची है धूम’, ‘अफसाना लिख रही हूँ’ यांसारखी गाणी गायली. ती त्या काळी प्रचंड लोकप्रिय झाली. तिने जवळपास ४५ गाणी रेकॉर्ड केली. तिची गाणी ऐकून पाकिस्तानातून भारतात येऊन अख्तर अब्बास काझीने तिच्याशी लग्न केलं; पण लग्नानंतर बाळंतपणांत ती स्थूल होत गेली आणि पुढे त्याच जाड्या देहयष्टीचा वापर करून तिने ‘टुनटुन’ हे मजेशीर नाव धारण करून १००हून अधिक हिंदी सिनेमांत धुमाकूळ घातला. हिंदी चित्रपटसृष्टीतली ती पहिली ‘महिला कॉमेडियन’ असं म्हणता येईल. आपल्या जाडजूड देहाचा वापर करून गिरकी घेणे, ओठांच्या कडेने तर्जनी दातांत चावत लाजत खिदळणे, धडकन पलंगावर उडी मारून तो धडामकन मोडणे, प्रेमाने लाडात येऊन आपल्या जोडीदाराच्या पाठीत धपाटा घालत त्याला जमिनीवर लोळवणे अशा धमाल हरकती करत तिने सुंदर, मुक्री, धुमाळ, आगा, मेहमूदबरोबर अनेक सिनेमांमधून लोकांना हसवलं. २४ नोव्हेंबर २००३ रोजी तिचा मृत्यू झाला. 
....
नाशाद 

११ जुलै १९२३ रोजी दिल्लीमध्ये जन्मलेले नाशाद उर्फ शौकत हैदरी हे संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. १९४० आणि ५०च्या दशकात शौकत देहलवी, शौकत अली आणि नाशाद अशा विविध नावांनी त्यांनी काही हिंदी सिनेमांना संगीत दिलं होतं. पुढे १९६०च्या दशकात ते कायमचे पाकिस्तानांत निघून गेले. १९४७च्या ‘दिलदार’पासून १९६५च्या ‘फ्लाइंग मॅन’पर्यंत त्यांनी तीसेक सिनेमांना संगीत दिलं; पण त्यांची गाजलेली गाणी होती १९५५च्या ‘बारादरी’ सिनेमातली! अजित आणि गीता बालीच्या या सिनेमातली ‘भूला नही देना जी भूला नही देना’, ‘तस्वीर बनाता हूँ तस्वीर नही बनती’, ‘अब के बरस बडा जुलम हुआ’ यांसारखी गाणी कमालीची गाजली होती. १४ जानेवारी १९८४ रोजी पाकिस्तानात त्यांचा मृत्यू झाला.
.......

यूल ब्रिनर 
११ जुलै १९२० रोजी व्लाडिव्होस्तोकमध्ये (रशिया) जन्मलेला युरी बॉरीसॉव्हीच ब्रिनर हा रशियन आई आणि स्विस वडिलांचा मुलगा असलेला प्रसिद्ध अभिनेता. तो सुरुवातीला ट्रॅपिझ आर्टिस्ट म्हणून काम करत होता. नंतर त्याने गिटारिस्ट आणि गायक म्हणूनही नाव मिळवलं होतं; पण तो गाजला ‘दी किंग अँड आय’ या नाटकातल्या सयामी राजाच्या भूमिकेमुळे! सुरुवातीला थोडी कमी लांबीची असणारी ही भूमिका प्रत्यक्ष रिहर्सलदरम्यान ब्रिनरच्या जबरदस्त अदाकारीमुळे वाढवण्यात आली. हे नाटक अफाट चाललं आणि त्याचे ४६२५ शोज झाले. त्यावर आधारित त्याच नावाच्या सिनेमातल्या भूमिकेसाठी त्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. सिनेमात सेसिल बी डिमेलने त्याला हेरून ‘टेन कमांडमेंट्स’मधली इजिप्शियन राजा रामेसिसची भूमिका दिली. पूर्णपणे गुळगुळीत टक्कल ठेवून काम करूनही हॉलिवूड सिनेमांत यशस्वी आणि लोकप्रिय झालेला तो बहुधा पहिलाच अभिनेता होता. अनास्ताशिया, मॅग्निफिशंट सेव्हन, वेस्टवर्ल्ड, दी ब्रदर्स कार्माझोव्ह, दी जर्नी, दी साउंड अँड दी फ्युरी, सॉलोमन अँड शेबा, वन्स मोअर विथ फिलिंग्ज, सरप्राइज पॅकेज, तारस बुल्बा, हे त्याचे सिनेमे गाजले होते. दहा ऑक्टोबर १९८५ रोजी त्याचा न्यूयॉर्कमध्ये मृत्यू झाला.
.......

थॉमस मिचल 
११ जुलै १८९२ रोजी न्यू जर्सीमध्ये जन्मलेला थॉमस मिचल हा अमेरिकन अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार आणि पटकथालेखक म्हणून प्रसिद्ध होता. अमेरिकेत ज्याला ‘ट्रिपल क्राउन ऑफ अॅक्टिंग’ मानलं जातं ते अभिनयासाठी मानाचे असणारे असे - ऑस्कर, एमी आणि टोनी - असे उत्कृष्ट अभिनयासाठीचे तिन्ही पुरस्कार याने मिळवले होते. दी हरिकेन, स्टेजकोच, इट्स ए वंडरफुल लाइफ, गॉन विथ दी विंड, हाय नून, हेझल फ्लाग, बफेलो बिल, मिस्टर स्मिथ गोज टू वॉशिंग्टन, दी ब्लॅक स्वॅन, असे त्याचे काही गाजलेले सिनेमे होते. १७ डिसेंबर १९६२ रोजी त्याचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला.
.....
यांचाही आज जन्मदिन :
विद्यमान केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू (जन्म : ११ जुलै १९५३) 
चित्रपट अभिनेता कुमार गौरव (जन्म : ११ जुलै १९६०) 
लेखक नारायण हरी आपटे (११ जुलै १८८९ - १४ नोव्हेंबर १९७१) 
लेखक डॉ. शंकरराव खरात (११ जुलै १९२१ - नऊ एप्रिल २००१)
साहित्यिक ई. बी. व्हाइट (११ जुलै १८९९ - एक ऑक्टोबर १९८५)
(ना. ह. आपटे, डॉ. खरात आणि ई. बी. व्हाइट यांच्याबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)  

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Parashuram Babar About 221 Days ago
Thanks Marvin mahiti milali Pharch Chan
0
0

Select Language
Share Link