Next
‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...
BOI
Wednesday, November 14, 2018 | 11:23 AM
15 1 0
Share this story

‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्या निमित्ताने, डॉ. काशिनाथ घाणेकर यांची कलेवर असणारी निष्ठा दर्शविणारी एक हृद्य आठवण सांगत आहेत रत्नागिरीचे अॅड. धनंजय भावे. 
..........
सन १९६७-६८चा काळ. दहावीत शिकत होतो. रत्नागिरीमधील श्रीराम नाट्यमंदिरचा जमाना जाऊन खुल्या नाट्यगृहाचा जमाना येऊ घातलेला. जुन्या माळनाक्याजवळच्या देसाई हायस्कूलच्या छोटेखानी पटांगणावरील चौथरा आणि त्यावर पत्र्याने कसेबसे उभे केलेले स्टेज. रत्नागिरीकर प्रेक्षकांना अनभिज्ञ असलेल्या ‘सरकत्या रंगमंचावरील’ सादर होणारे पहिलेच नाटक ‘अश्रूंची झाली फुले.’ या नाटकाची जाहिरात त्या वेळचे ‘रत्नागिरीचे अमीन सयानी’ म्हणजेच बापू आगाशे यांच्या गोड आवाजात रोज ऐकत होतो. घरातील त्या काळच्या वातावरणानुसार आमची मजल सिनेमापर्यंतच. त्यालाही कारण तसेच. सिनेमा थिएटर घराला लागूनच आणि थिएटरचे मॅनेजर राजाभाऊ कुलकर्णी घरातलेच! आई नाटकाला जायची होतीच आणि तिचे तिकीटही पर्शराम केळकर म्हणजेच माझ्या परसुकाकांनी काढले होते. नाटकाच्या दिवशीच अहो भाग्यम्! काका म्हणाला, ‘एक तिकीट जादा आहे वहिनी. नंदूला (म्हणजे मला) नेऊया का?’ माऊलीला प्रेम होतेच; पण ‘मुख्यालयाकडून आवश्यक तो ‘ना हरकत दाखला’ मिळाल्याशिवाय माझा चान्स लागणे अवघडच होते; पण काका आणि आईच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि नाट्यगृहात जाऊन नाटक बघण्याचा योग आला! 

सर्व तयारी करून थोरा-मोठ्यांसह देसाई हायस्कूलच्या प्रांगणातील रंगमंचावर दाखल झालो, ठीक सव्वानऊला! (त्या वेळी नाटक साडेनऊला सुरू करण्याची परंपरा होती बरे) त्या वेळच्या खुर्च्या लाकडी फोल्डिंगच्या. मागे पाठीवर ऑइलपेंटने ‘आ’ अक्षर लिहिलेले. कारण त्याही बापू आगाशे यांच्याच मालकीच्या आणि ओल्या पांढऱ्या खडूने घातलेले आसन क्रमांक! काहीसा वेळ गेला. नाटक काही उभे राहीना! मग बराच वेळ गेला. ११ वाजून गेले, तरीही नाटक सुरू होईना. प्रांगणात वारा मात्र प्रचंड होता. नाटकाचा पडदाही खूपच जोरात हलत होता. मागाहून कळले, की त्या सुसाट वाऱ्यामुळे सरकते सेट्स स्थिर राहतच नव्हते. शेवटी साडेअकराच्या सुमारास नाटक सुरू झाले. पहिल्या प्रवेशातच ‘लाल्या’ची एंट्री झाली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. डॉ. काशिनाथ यांना पहिल्यांदाच रंगमंचावर पाहून आताच्या शब्दात वर्णन करायचे झाल्यास ‘माझ्यात हा कलाकार घुसलाच!’ अस्सल मवाली (त्या काळचा फेमस शब्द. कारण केसांचा कोंबडा काढला की काय मवाल्यासारखा अवतार केलायस – इति शिक्षकवर्ग) काशिनाथ घाणेकर म्हणजे नाटकातला ‘लाल्या’ आणि त्याला सहज, सोप्या सुंदर भाषेत अलगद हाताळणारा प्राध्यापक विद्यानंद म्हणजे थोर कलाकार प्रभाकर पणशीकर आणि त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत डॉ. सुधा करमरकर एकदम अवर्णनीय जोडी. त्यातच वसंतराव कानेटकरांचे जीवनमूल्यांचा अलगदपणे उलगडा करणारे संवाद. लाल्याचा ‘कॅ-डॅ-क’ हा डायलॉग - पहिल्याच प्रवेशात आणि त्यातच पैसे वसूल! अंक कधी संपला कळलेच नाही. त्यानंतर जे मी पाहिले त्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही.

त्याचे असे झाले होते - डॉ. काशिनाथ घाणेकर हे चिपळूणचे. आमच्या शेजारी त्यांचे मित्र रामभाऊ पोंक्षे राहायचे. साहजिकच त्यांच्या ओळखीच्या कलाकाराला जवळून पाहायची दुर्मीळ संधी आयतीच चालून आलेली. अंक संपताच डॉ. काशिनाथ घाणेकर यांना भेटायला काकांची पाठ धरून मी विंगेत गेलो. पाहतो तर काय, पोटदुखीने हैराण झालेले डॉ. काशिनाथ घाणेकर लोळतच होते आणि आणखी म्हणजे या दौऱ्यात ही पोटदुखी त्यांची पाठ सोडत नव्हती. त्याही अवस्थेत त्या पोटदुखीचे दु:ख चेहऱ्यावर कोठेही दिसू न देता डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी पहिल्या अंकातील ‘लाल्या’ केवळ आमच्यासारख्या नाट्यरसिकांसाठी अप्रतिमपणे सादर केला होता. हाच खरा जबरदस्त नाट्यवेडा कलाकार! डॉक्टरांच्या भोवती रत्नागिरीमधील काही प्रथितयश डॉक्टरांचा गराडा होता. त्यातीलच नाट्यवेडे डॉक्टर बेंजामिन यांनी त्यांना वेदनाशामक इंजेक्शन दिल्याचे मला आठवते. त्याच्या जोरावर डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी शेवटच्या अंकातील अभिनयाची कस लागणारी अदाकारी प्रभाकर पणशीकर यांच्या तोडीस तोड सादर केली आणि शाळकरी असलेला मी दुसऱ्या दिवशी त्यांचा ‘कॅ-डॅ-क’ हा शब्द वर्गात फेकण्याच्या नादात नाट्यगृहातून तृप्त होऊन बाहेर पडलो. 

सुबोध भावेंना ‘कट्यार’मध्ये पाहिलं. त्यानंतर त्यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विनंती केली होती, की ‘अश्रूंची झाली फुले’चा सिनेमा मराठीत करा. कारण ते नाटक पडद्याआड होऊ नये. त्यातील लाल्या आणि त्याचे सर विद्यानंदही आजच्या पिढीने पाहिलेच पाहिजेत, अशी एक प्रामाणिक इच्छा! लाल्याच्या भूमिकेला आताच्या सिनेसृष्टीत केवळ सुबोध भावेच पूर्ण न्याय देऊ शकतात, असा विश्वास मला होता. ‘अश्रूंची झाली फुले’ यावर बेतलेला हिंदीमधील ‘आसू बन गये फूल’ हा सिनेमा वठलाच नव्हता. माझ्या विनंतीवर ‘पाहू या’ असे काहीसे त्यांचे उत्तर होते. त्यानंतर सुमारे दोन वर्षे गेली. मनातल्या मनात मी नाराज झालो होतो; पण आता सुबोध यांनी अख्खे डॉ. काशिनाथ घाणेकरच आपल्यासमोर ठेवले आहेत. क्या बात है! सोने पे सुहागा! सुबोध आणि त्याच्या टीमला धन्यवाद... ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला हार्दिक शुभेच्छा!

संपर्क : अॅड. धनंजय जगन्नाथ भावे – ९४२२० ५२३३० 

(‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचे समीक्षण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link