Next
अध्ययन अक्षम मुलांच्या क्षमता वाढविणारी संस्था
BOI
Friday, October 05, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

अध्ययन अक्षम मुलांसाठी कार्यशाळा

‘तारे जमीं पर’ या सिनेमातील ईशानला जी समस्या आहे ना, ती म्हणजे अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसॅबिलिटी-डिस्लेक्सिया). ही समस्या एकूण मुलांपैकी १० टक्के मुलांमध्ये असते. त्यांना अन्य कोणतेही व्यंग नसल्याने ती समस्या आहे, याची जाणीव पालकांना आणि समाजाला होणे कठीण जाते. अशा अध्ययन अक्षम मुलांच्या क्षमता संवर्धनासाठी पुण्यात कार्यरत असलेली संस्था म्हणजे डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठान. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज जाणून घेऊ या त्या संस्थेच्या कार्याबद्दल... 
............
समाजात अनेक प्रकारच्या समस्या असतात आणि सर्वस्वी लक्ष देऊन त्या सोडवण्याची गरज असते. ही गरज ओळखणारे अनेक जण असतात पण त्याला सर्वस्वी वेळ देणारे क्वचितच सापडतात. अध्ययन अक्षमता (म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी - डिस्लेक्सिया) ही विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणारी अशीच एक समस्या आहे. शाळेत वाचण्यात येणाऱ्या अडचणी, त्यामुळे निर्माण होणारा अभ्यासाचा कंटाळा, परिणामी, पालक आणि समाजाकडून होणारा तिटकारा अशा समस्या झेलणाऱ्या अध्ययन अक्षम मुलांसाठी पुण्यातील डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था गेली आठ वर्षे काम करत आहे.

अध्ययन अक्षमतेबद्दल जनजागृतीचे काम

अध्ययन अक्षमता म्हणजे काय?
या मुलांमध्ये कोणतेही शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक व्यंग नसते. ही मुले विशेष मुले (Special Child) नाहीत. सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, बहुविकलांगता अशा विशेष गटांत ही मुले मोडत नाहीत. तरीही ही मुले अभ्यासात मागे पडतात. अशा मुलांसाठी क्षमता संवर्धन केंद्र म्हणून डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठान काम करते. पश्चिमेतील देशांत अनेक वर्षांपासून क्षमता संवर्धन केंद्रे चालू आहेत. भारतात तुलनेने हे काम नवीन आहे. त्यामुळे त्याबद्दल समाजामध्ये जागृती झालेली नाही.

संस्थेच्या कार्याबद्दल संस्थापक सचिव क्षिप्रा रोहित यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांची बुद्धिमत्ता सर्वसाधारण, चांगली किंवा उत्तम, तसेच अतिउत्तम या प्रकारची असते. तरीही त्यांना लेखन, वाचन आणि गणित ही शैक्षणिक कौशल्ये शिकायला अडचण येते. ही मुले वाचताना अडखळतात, आवश्यक वेगाने वाचू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अर्थ कळत नाही. आकलन क्षमता असूनही वाचता न आल्यामुळे विषयाचे आकलन होत नाही. त्यामुळे त्यांना स्वत: वाचून, समजून घेऊन अभ्यास करता येत नाही. कोणीतरी त्यांना वाचून दाखवावे लागते. म्हणजे पुस्तकातील धडा त्यांना वाचून कळणार नाही; पण शिक्षकांनी तो उत्तम पद्धतीने शिकवला तर त्यांना धडा नीट समजतो. कारण आकलन करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते.’ 

‘या मुलांचे अक्षर खूपच खराब असल्याने वाचण्याजोगे नसते. या मुलांना गणितातील पाढे, सूत्रे पाठ होत नाहीत. सामान्य गणित कळते; पण ‘ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग’ जिथे येते, तिथे या मुलांना काहीच कळत नाही. त्यामुळे ही मुले अभ्यासात मागे पडतात. आपल्याकडे शैक्षणिक प्रगती म्हणजे अभ्यासाच्या वह्या पूर्ण करणे, अशी संकल्पना रूढ आहे. शिकलेल्या गोष्टी मुलाला किती येतात हे बघितले जात नाही. अशा मुलांच्या या अक्षमता कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो,’ असे क्षिप्रा यांनी सांगितले.

मुलांसाठी उपचारात्मक प्रशिक्षण कार्यशाळा

उपचारात्मक प्रशिक्षण
संस्थेच्या वतीने या मुलांना उपचारात्मक प्रशिक्षण (Remedial Teaching) दिले जाते. यामध्ये शैक्षणिक साहित्याचा (Educational aids) वापर करून अनुभवातून शिकवण्यावर (Experiential Learning) भर दिला जातो. त्याचबरोबर समुपदेशन केले जाते. शैक्षणिक क्षमता वाढवण्याबरोबरच इतर क्षमता वाढवण्यासाठी मुलांच्या कार्यशाळा घेतल्या जातात.

पालकांसाठी कार्यशाळा

पालक-शिक्षकांच्याही कार्यशाळा
क्षिप्रा म्हणाल्या, ‘मुलांसोबत पालक आणि शिक्षकांसाठी जाणीवजागृती कार्यशाळा घेतल्या जातात. पालक व शिक्षकांना हे समजावून सांगितले जाते, की अध्ययन अक्षमता हा आजार नसून, ती समस्या आहे. त्यामुळे त्यांचा स्वीकार करणे गरजेचे आहे. त्यांना स्वीकारल्यानंतर कोणत्या पद्धतीने त्यांना शिकवले पाहिजे, हे या कार्यशाळांच्या माध्यमातून शिकवले जाते. त्याचबरोबर पालक-शिक्षकांचे समुपदेशनही संस्था करते.’ 

पालकांचे समुपदेशन

सामाजिक जागृती 
अध्ययन अक्षमतेबाबत भारतात जागृती खूपच कमी आहे. ती होणे खूप गरजेचे आहे. वर्तमानपत्रे, मासिके यांमध्ये लिखाण करून सामाजिक जागृती करण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न केला जातो. या विषयाशी संबंधित साहित्य मराठीत अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे या विषयावर लेखन करणे, त्या पुस्तकांचे वितरण करणे हे उपक्रमही प्रतिष्ठानच्या वतीने चालवले जातात. सामाजिक जागृतीसाठी परिषदा, चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित केली जातात. 

अध्ययन अक्षम मुलांनी केलेली गणपतीबाप्पाची मूर्तीअध्ययन अक्षमता असलेली मुले कुठे असतात?
महानगरपालिकेपासून इंटरनॅशनल स्कूलपर्यंत सर्व प्रकार, माध्यमे आणि सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये ही मुले आहेत. जगभरात जे प्रमाण आहे, तेच प्रमाण भारतात आहे. साधारणपणे १० टक्के मुले अध्ययन अक्षम असतात, याबद्दल भारत सरकारनेही अधिकृत भूमिका घेतली आहे. 

डॉ. अमिता गोडबोले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा असून, खजिनदार म्हणून शीतल देशपांडे काम पाहतात. भारती देशपांडे, उमा पळसुले, पल्लवी इनामदार, शुभदा पेंढारकर याही प्रतिष्ठानच्या कामात नियमित मोलाचे योगदान देतात.

क्षिप्रा म्हणाल्या, ‘२००८मध्ये डिस्लेक्सिया असलेली एक केस समोर आली, तेव्हापासून संस्थेने या विषयावर काम सुरू केले. या प्रश्नाची व्याप्ती त्या निमित्ताने लक्षात आली. २०११मध्ये स्वयंसेवी संस्था म्हणून अधिकृत नोंदणी करण्यात आली.’

‘डीएएलआय’ चाचणी विकसित

राष्ट्रीय पातळीवर निवड 
‘भारतात डिस्लेक्सिया समस्येचे निदान करण्यासाठी कोणतीही चाचणी नसल्याचे सरकारच्या २०१२मध्ये लक्षात आले. भारतीय भाषांमध्ये डिस्लेक्सिया निदान चाचणी तयार करण्यासाठी राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्थेने (National Brain Research Centre) २०१३मध्ये देशातील पाच संस्थांची निवड केली. संस्थेच्या कामाच्या आधारावर डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठानचाही यामध्ये समावेश होता. त्यामुळे सरकारची सहयोगी संस्था म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ‘डीएएलआय’ (Dyslexia Assessment of Languages in India) ही भारतीय भाषांमध्ये डिस्लेक्सिया निदान करणारी चाचणी या पाच संस्थांनी मिळून विकसित केली. पहिली चाचणी मराठी, हिंदी आणि कानडीमध्ये तयार झाली. भारतात जेवढ्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये ही चाचणी विकसित करण्याचे काम सुरू आहे,’ असेही क्षिप्रा यांनी सांगितले. 

आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, वाई या ठिकाणची मिळून ५०० मुले डिस्लेक्सियाने ग्रस्त असल्याचे संस्थेच्या लक्षात आले आहे. आतापर्यंत झालेल्या ३४ कार्यशाळांतून एक हजार शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. या कार्यशाळांमध्ये पुणे, नगर, बारामती, शिरूर, जळगाव येथील शिक्षक उपस्थित होते. पुणे शहरात सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला आहे. त्याच्या दहा टक्के म्हणजे ४० हजार विद्यार्थ्यांना डिस्लेक्सिया असू शकतो. त्यांना मदत मिळण्याची गरज आहे. यापैकी ८० टक्के विद्यार्थ्यांना मदत न मिळाल्याने मानसिक स्वास्थावर परिणाम होतो. परिणामी समाजस्वास्थ खालावते. संस्था म्हणून या विषयाकडे गांभीर्याने बघण्याची गरज क्षिप्रा रोहित यांनी व्यक्त केली. 

‘तारे जमीं पर’चे खूप मोठे योगदान
‘‘तारे जमीं पर’ हा हिंदी चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला. त्यामधील ईशान या मुलाला जी समस्या जाणवते ती म्हणजे डिस्लेक्सिया, असे सांगितले, की लोकांना पटकन कळते. आपल्या मुलाला काय झाले आहे, ते पालकांना चित्रपट पाहिल्यावर लगेच लक्षात येते. त्यामुळे या चित्रपटाने समाजासाठी खूप मोठे योगदान दिले आहे,’ असे क्षिप्रा रोहित यांनी आवर्जून नमूद केले.

डिस्लेक्सियाबाबत जनजागृती करणाऱ्या वैद्य स्मृती प्रतिष्ठानला दिलेली देणगी ८०जी कर सवलतीस पात्र ठरते. त्याचबरोबर विविध प्रकारे प्रतिष्ठानला मदत करावी, असे आवाहन सचिव क्षिप्रा यांनी केले. 

संपर्क :
डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठान
क्षिप्रा रोहित, संस्थापक सचिव : ९८५०८ ८३८७५. 
पत्ता : फ्लॅट क्रमांक सात, गौतमी अपार्टमेंट, मयूर कॉलनी, बालशिक्षण मंदिर शाळेजवळ, कोथरूड, पुणे -४११०२९.
ई-मेल : shantavaidyafoundation@gmail.com

- अमोल अशोक आगवेकर 
ई-मेल : amolsra@gmail.com

(डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठानच्या संस्थापक सचिव क्षिप्रा रोहित यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search