Next
क्या खिलाते हैं इन बच्चों को प्रबोधिनी में?
Social Media Forwards
Monday, September 24 | 04:48 PM
15 0 0
Share this storyपुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक एकंदरच वैशिष्ट्यपूर्ण असते. कारण प्रत्येक पथकाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य असतं. ज्ञानप्रबोधिनीचं पथकही त्यापैकीच एक. सादरीकरण, उत्साह आणि शिस्त या सगळ्याच बाबतींत त्या पथकाची वैशिष्ट्यं दिसून येतात. त्या पथकाचा अनुभव शब्दबद्ध करणारी ही सोशल मीडियावर फॉरवर्ड झालेली पोस्ट. 
.........
काल आठवीच्या मुलांनी राहुलनगर गणेश विसर्जन मिरवणुकीत बरचीचे प्रात्यक्षिक सादर केले. सायंकाळी साडेसात ते ११ अशी सुमारे तीन तासांपेक्षा जास्त वेळ ही मिरवणूक चालली. यात आठवीच्या मुलांबरोबर युवक विभागाचे ढोलताशा पथक होते.

या पूर्ण मिरवणुकीसह आम्ही काही पालकही चालत होतो. तेव्हा अनुभवलेल्या काही खास गोष्टी :
मुलं आली तीच खूप उत्साहाने आणि चैतन्याने सळसळत होती. मोठ्या टेम्पोत ढोल, बरच्या आदी सामान येऊन पोहोचले होते. राहुलनगरचे रहिवासी खूप उत्सुकतेने गुलाबी कुडते आणि पांढरे पायजमे हा गणवेष घातलेली छोटी मुले आणि तरुण यांची लगबग बघत होते. एकदा तर गणराय स्वतःच कौतुकाने गालातल्या गालात हसल्याचा मला भास झाला! 

शिट्टी वाजली आणि ढोलपथकाचा इशारा झाला. गणरायाला वंदन करून मिरवणूक सुरू झाली. अतिशय सुरेख पद्धतीने ढोल-ताशा आणि बरची यांचा समन्वय साधून मुले एक एक प्रकार सादर करत होती. स्वरूप आणि त्याचे साथीदार मुलांमध्ये फिरून त्यांचे कुठे काही चुकत नाही ना हे बघत होते. ढोलताशा आणि बरची या दोन्ही पथकाचे सराव वेगवेगळे झालेले असले तरी प्रत्यक्षात त्यांचा सुरेख मेळ होत होता. दोन्ही पथकं एकमेकांचा वेग ओळखत होती, ताल सांभाळत होती.
 
पुढच्या चौकात एक मोठे रिंगण झाले. वाढत वाढत गेलेल्या ढोलताशांच्या तालावर बरची करणाऱ्या मुलांचे पाय त्याच वेगाने थिरकत होते, बरच्या असलेले हात हवेत एकत्र उंचावले जात होते. 

सुमारे दीड तास मुले सलग नाचत होती. हळूहळू मिरवणूक पुढे सरकली. थोडे सोपे हात झाल्यावर पुन्हा पुढे तीन रिंगणे होणार होती! आता आजूबाजूच्या प्रेक्षकांनाही जोश चढला होता. त्यातील बरेच जण न राहवून बरचीवाल्या मुलांबरोबर मिरवणुकीत सहभागी झाले. एकदोघे तर ऑफिसमधून परस्पर येऊन ऑफिसच्या बॅग्स बाजूला टाकून आणि तसेच फॉर्मल शर्ट-टाय-ट्राउझर्स अशा कपड्यांतच सहभागी झाले होते! त्यातले काही प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी होते.

शिवाय सोसायटीतील जवळजवळ सगळी लहानमोठी मुले तर कधीचीच आठवीच्या मुलांसोबत नाचत होती. एका ठिकाणी तर ढोल-ताशांचे आवाज आणि नाचणारी मुलं यामुळे तयार झालेल्या व्हायब्रेशन्समुळे आजूबाजूच्या काही गाड्यांचे व्हायब्रेशन अलार्म वाजू लागले होते!

दरम्यान मला त्या सोसायटीत राहणारी माझी एक मैत्रीण भेटली. आम्हाला प्रबोधिनीचंच पथक हवं होतं असं तिने सांगितलं. तिने तिच्या बरोबर असणाऱ्या सर्व महिलांनी मुलांचं खूप कौतुक केलं. 

बघता बघता तीन तास उलटले. मिरवणुकीचं शेवटचं पर्व सुरू झालं. सगळी मुलं घामाने चिंब झाली होती, गणवेश अंगाला चिकटले होते. मुलं दमली होती; पण ज्या उत्साहाने सुरुवात केली शेवटही त्याच उत्साहाने करायचा हे त्यांना माहीत होतं. 

आता स्वरूप आणि साथीदारांनी सगळ्यांना शेवटच्या टप्प्याच्या सूचना दिल्या. मुलं रिंगणाला तयार झाली. ढोलावर थाप पडली, ताशावर टिपरी वाजली आणि मुलांचे पाय थिरकले! त्यांनी अंगात उरलेल्या राखीव शक्तीचे साठे उघडले. जिथे कमी पडेल तिथे स्वरूप आणि इतर दादा स्वतः कमी भरून काढत होते. ताल-सूर आणि जोश टिपेला पोचला. मुलं आणि प्रेक्षक सगळेच बेभान झाले होते. बेभान होणं मराठी मातीतच असतं! 
हा जल्लोष सर्वोच्च बिंदूला पोहोचला आणि शेवटच्या आवर्तनाला पूर्ण होऊन थांबला! जणू क्षणच थांबले!! सगळ्यांची मनं केवळ नादमय झाली होती. हा आनंदाचा कल्लोळ पाहून श्रीगणेशाचे मनही आनंदविभोर झाले असेल नक्की. 

प्रेक्षकांनी मुलांना कडाडून टाळ्या वाजवून मनःपूर्वक दाद दिली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषाचे सूर हवेत भरून राहिले!

आम्ही पालक आपलीच झपाटल्यासारखी बरची नृत्य करणारी मुलं पाहून स्तिमित झालो होतो. कसा तयार झाला हा स्टॅमिना? कशी, कधी लागली ही शिस्त? कसं आलं हे साडेतीन तास सलग नाचण्याचं बळ? 

शिटी वाजली, भान हरपून नाचणारी मुलं काही क्षणातच रांगेत उभी राहिली. शांत सुरेल आवाजात प्रार्थना झाली आणि भारलेली मनं घेऊन प्रेक्षक निघाले. गणराय स्वलोकी परत गेले.

माझा एक मित्र म्हणाला, ‘क्या खिलाते है बच्चोंको प्रबोधिनीमें, के ये बच्चे कभी इसे भूलते नहीं?’

काय सांगू?

सगळं श्रेय त्यांच्या दादांचं आणि त्यांना घडवणाऱ्या प्रबोधिनीचं!

- विक्रमची आई

(हा मेसेज सोशल मीडियावरील फॉरवर्डेड आणि लेखिका अज्ञात आहे.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Aparna Joshi About 77 Days ago
Thank you for posting my message on your site!
1
0

Select Language
Share Link