Next
‘सोलापूर विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक निधी दिला जाईल’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
प्रेस रिलीज
Friday, July 12, 2019 | 11:47 AM
15 0 0
Share this article:


सोलापूर : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्याच्या मागणीला राज्य शासन निश्चित परवानगी देईल आणि त्यासाठीचा निधीही उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक आराखड्याला टप्प्याटप्याने आवश्यक निधीही दिला जाईल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रत्येक विद्यापीठांनी विस्तारीकरणाबरोबरच गुणवत्ता विकासाकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ ११ जुलैला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राज्याचे सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक आरोग्य, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘विद्यापीठाच्या भव्य व सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन करताना आनंद होत आहे. कारण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित असले, तरी या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव दिले आहे. त्यांचे कार्य देशभरात आणि विविध क्षेत्रांत होते. कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे विद्यापीठाने अध्यासन सुरू करावे, त्यास आवश्यक तो निधी निश्चितपणे देऊ.’

‘विद्यापीठाने विस्तारीकरणासाठी आखलेल्या आराखड्यास टप्प्याटप्प्याने निश्चितपणे अर्थसंकल्पातून निधी दिला जाईल. सध्या सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत आहेत. हे क्षेत्र विस्तारत असताना त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ विद्यापीठाने तयार केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी फाइव्ह ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेची कल्पना मांडली आहे. येत्या पाच वर्षांत त्या दिशेने काम होऊन अधिकाधिक गुंतवणूक देशात होईल, असा विश्वास आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम आता सुरू आहे. विद्यापीठांनी हा बदल ओळखून त्यासाठीचे आवश्यक अभ्यासक्रम समाविष्ट केले पाहिजेत,’ असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 

‘आपल्या देशातील ज्ञान कधी सुविधांमध्ये अडकले नाही. नालंदा व तक्षशीलासारखी विद्यापीठे त्याकाळी आपल्या देशात होती. शल्यचिकित्सा, खगोलशास्त्र अशा विषयांचा अभ्यास त्याकाळी केला गेल्याचे दिसते. विद्यापीठांनी आता डॉक्टरेट मिळवणाऱ्या संशोधन प्रकल्पांचा खरोखरच किती फायदा विद्यार्थ्यांना होतो, हे तपासले पाहिजे, त्यामुळेच आता विद्यापीठांची जबाबदारी वाढली आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी प्रास्ताविक करताना विद्यापीठामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठाने १४ वर्षे पूर्ण करून १५व्या वर्षात पदार्पण केले आहे. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्यापीठात येणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख त्यांनी केला.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. तत्पूर्वी  विद्यापीठाच्या विस्तीर्ण ४८२ एकर परिसरात नवीन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला.   कार्यक्रमाचे आभार कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search