Next
व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पाळायची पथ्यं!
BOI
Monday, April 09, 2018 | 04:49 PM
15 0 0
Share this article:

‘बिझनेस करण्याची ‘अनिवार’ इच्छा असणाऱ्यांनी यशस्वी होण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वात आणि वागणुकीत काय बदल केले पाहिजेत आणि त्यायोगे ‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन’ इतका आत्मविश्वास कसा मिळवता येईल ते अतिशय समर्पक आणि विविध उदाहरणांनी समजावून सांगणारं स्फूर्तिदायक पुस्तक म्हणजे ‘मला बिझनेस करायचाय.’ दिलीप गोडबोले यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हा परिचय...
.............. 
सर्वसाधारणपणे १८ ते २८ वयोगटातल्या तरुण-तरुणींना बिझनेस करण्याचं आकर्षण असतं. आपणही लाखो-करोडोंचे व्यवहार करावेत, घरच्यांना खूप पैसे द्यावेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहावा, अशी स्वप्नं ते पाहात असतात; पण बिझनेस करताना काय काय अडचणी येऊ शकतात, आपलं बोलणं, वागणं, चालणं कसं असायला हवं, कुठले शिष्टाचार पाळायला हवेत, गुणवत्ता कशी राखायला हवी, पैशाचं नियोजन, वेळेचं महत्त्व, अचूक जजमेंट अशा कितीतरी गोष्टी एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून मित्रत्वाच्या नात्याने समजून घेता आल्या, तर बिझनेस करण्यातला उत्साह आणि जोम टिकू शकतो, वाढू शकतो आणि यशस्वी होण्याच्या शक्यताही वाढू शकतात. त्यासाठी दिलीप गोडबोले यांच्यासारख्या ३०-३५ वर्षं यशस्वी बिझनेस करणाऱ्या अनुभवी व्यक्तीने जणू खांद्यावर हात ठेवून गप्पा मारत, समजावत या क्षेत्राची दिलेली माहिती आपला उत्साह द्विगुणित करते हे ‘मला बिझनेस करायचाय’ या त्यांच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य!

एकदा आपण बिझनेस करायचा ठरवलं, की मग आपल्याला काही पथ्यं पाळावी लागतील. काही गोष्टी अंगी बाणवाव्या लागतील, हे ठामपणे सांगत गोडबोले यांनी सुरुवातीलाच सांगून टाकलंय, की तुमचा बिझनेस म्हणजे ‘तुमची भाषा आणि तुमचे बोलणे.’ अनेक रखडलेली कामं केवळ तुमच्या भाषेनं पुढे सरकू शकतात. नवीन विश्वास निर्माण होऊ शकतो. नवीन पूल बांधले जाऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ‘तुमच्याबरोबर काम करताना इतरांना सेफ वाटायला हवं. तुमची सेवा बोलली पाहिजे.’ गोडबोले म्हणतात, ‘‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असं पूर्वजांनी का म्हटलं आहे, ते बिझनेसमध्ये चांगलं समजतं.’ 

गोडबोले यांनी १७६ पानांच्या पुस्तकांत जे अतिशय सोप्या शब्दांत आणि छोटी छोटी उदाहरणं देऊन सांगितलंय ते केवळ अप्रतिम असंच आहे. त्यांची काही काही वाक्यं बिझनेस करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींनी सुभाषितासारखी पाठ करून आचरणात आणण्यासारखीच आहेत. –

-काम आज करा; पण नजर उद्यावर हवी.
-गॅरंटी हा शब्द लक्षात ठेवा. 
-‘फर्स्ट इम्प्रेशन’ अतिशय महत्त्वाचे.
-आजूबाजूच्या घटनांचे नीट निरीक्षण करा. १०० नवीन बिझनेस मिळतील. 
-जीवनात टायमिंगला जे महत्त्व आहे, ते कशालाही नाही.
-बिझनेसमध्ये क्षमाशील असावेच लागते.
-समोरच्या टेबलावरील कागदपत्रे उलटीकडून वाचू नका. 
-सतत नवीन वाचन म्हणजे भरपूर नफा. 
-माणसे जिंका; बाकी सर्व आपोआप घडेल.
-शरीर असो की बिझनेस, जास्त जाडी हे ओझेच.
-बिझनेस मॅनर्स लक्षात ठेवा. 
-केव्हा थांबायचे, निघायचे, उठायचे ते समजले पाहिजे. 
   
याशिवाय, उद्योग उत्तम चालण्यासाठी वाढती विक्री आणि पैशाचे व्यवस्थापन याबद्दल गोडबोले यांनी या पुस्तकातून सखोल मार्गदर्शन केलं आहे. उद्योजकाला वित्तपुरवठा करणाऱ्या बँकेच्या व्यवहारांबद्दल ‘तुम्ही आणि तुमची बँक’च्या पाच छोट्या लेखांतून फार सुरेख विवेचन केलं आहे. त्याचा वाचकाला नक्कीच फायदा होईल.

थोडक्यात म्हणजे व्यवसायात यांत्रिकपणा न आणता, मानवी गुणदोषांसह व्यवसायाची भरभराट अधिकाधिक कशी होऊ शकेल, हे त्यांनी सुंदर प्रकारे समजवून दिलं आहे. कोणताही बिझनेस करू इच्छिणाऱ्या वाचकांना एक सोपं गाइड म्हणून या पुस्तकाकडे जरूर बघता येईल.

पुस्तक : मला बिझनेस करायचाय 
अनुवादक : दिलीप गोडबोले     
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, नागपूर ४४००१५     
संपर्क :  ९८२२८ ३०९१४   
पृष्ठे : १७६     
मूल्य : २५० ₹ 

(‘मला बिझनेस करायचाय’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search