Next
‘वेडिंगचा शिनेमा’ म्हणजे सुखाच्या नव्या संकल्पना गवसण्याचा प्रवास
आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल डॉ. सलील कुलकर्णी यांची रत्नागिरीतील कार्यक्रमात माहिती
प्रेस रिलीज
Monday, March 11, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
‘काही वेळा कलाकार म्हणून स्वतःचा शोध घेणे थांबवले जाते. अशीच एक पुरस्कारप्राप्त दिग्दर्शिका असते. ती संवेदनशील आहे; पण काहीच संधी मिळत नाही. लग्न होण्यापूर्वी दोन्ही कुटुंबांवर प्री-वेडिंग फिल्म तयार करण्याची संधी तिला मिळते. ही फिल्म तयार करताना तिला अनेक अनुभव येतात. आयुष्याबद्दलचे तिचे विचार बदलत जातात आणि सुखाच्या नव्या संकल्पना गवसतात,’ अशा शब्दांत डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाची गोष्ट उलगडली. १२ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन डॉ. कुलकर्णी यांचे आहे. 

रत्नागिरीत हॉटेल विवेक येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सलील यांनी अतिशय ओघवत्या भाषेत चित्रपटाची कथा मांडली. गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाचे काम सुरू होते, अशी माहिती त्यांनी दिली. गेली जवळजवळ वीस वर्षे गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक, ‘मधली सुट्टी’सारख्या कार्यक्रमाचे संकल्पनाकार अशा विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारे डॉ. सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमघर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांबरोबर शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी झळकणार आहे. हा एक निखळ आनंद देणारा एक प्रसन्न अनुभव असेल, असे डॉ. सलील यांनी सांगितले. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाफ हल्ली भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर आणि दोन गाणी नुकतीच प्रदर्शित झाली आहेत आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. 

‘वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून, निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबी यांची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई पुणे मुंबई-२, मुंबई पुणे मुंबई-३. बॉईज-२, बापजन्म, आम्ही दोघी, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरंच काही आणि टाइम प्लीज या चित्रपटांचा त्यांमध्ये समावेश आहे.डॉ. सलील कुलकर्णी यांच्याविषयी... 
डॉ. सलील कुलकर्णी रंगमंचावरून गायला लागले आणि ‘चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’ म्हणत त्यांनी सर्वांची मने जिंकली. संगीतकार म्हणून त्यांनी पस्तीसहून अधिक चित्रपटांची गाणी केली आणि ‘डिपाडी डिपांग‌’ किंवा ‘देही‌ वणवा ‌पिसाटला’पासून ते ‘एकटी एकटी घाबरलीस ना’पर्यंत विविध प्रकारची गाणी त्यांनी केली. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ऐकून आपले डोळे पाणावले आणि विंदा करंदीकर यांच्या ‘एका माकडाने काढले दुकान’पासून ‘अग्गोबाई ढग्गोबाई’पर्यंतच्या विविध गाण्यांवर लहान मुले हसली, नाचली. त्यांच्या बालगीतांवर प्रत्येक शाळेत बालगोपाळ रमले.

बा. भ. बोरकर, आरती प्रभू, कुसुमाग्रज यांच्या कवितांची त्यांनी गाणी केली आणि तरुणांना ‘तव नयनांचे दल हलले गं..’सारखी गाणी त्यांची वाटली. परीक्षक म्हणून ‘सारेगम’ किंवा ‘गौरव महाराष्ट्राचा’मधून अनेक नवीन गायकांना घडवताना त्यांच्या चपखल कमेंट्स ऐकता आल्या. ‘मधली सुट्टी’मध्ये लहान मुलांचा सगळ्यात जवळचा मित्र होताना त्यांना पाहता आले.

‘हे गजवदन..’ ते‌ ‘गाये जा..’ आणि आनंद शिंदेंच्या ‘मला उडू उडू झालंय’पासून आनंद भाटे यांच्या ‘येई गा विठ्ठला पर्यंत’ची त्यांची रेंज थक्क करणारी आहे. लपवलेल्या काचा, शहाण्या माणसांची फॅक्टरी यांसारखी लोकप्रिय पुस्तकेसुद्धा डॉ. सलील यांनी लिहिली आहेत. आता ते चित्रपट घेऊन येत आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vasanti Joshi About 8 Days ago
Wonderful!!!, असेच वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र काबिज करुन सदैव आघाडीवर रहा. अभिनंदन आणि शुभेच्छा. आता पुढील चित्रपटासाठी शुभेच्छा आहेतच त्यात नवं काहीतरी करण्याची मनिषा असेलच
0
0
Vasant Deshpande About 8 Days ago
Dr.Saleel Both Songs are Super Hit. .Story also Very intertening.All the Best.
0
0

Select Language
Share Link