Next
‘त्यांची धडपड रोबॉटिक्सच्या प्रसारासाठी’
प्राची गावस्कर
Thursday, March 08, 2018 | 05:09 PM
15 0 0
Share this article:

अलीकडेच भारतात येऊन गेलेल्या ‘सोफिया’ या रोबोटमुळे ‘रोबॉटिक्स’ हे नाव सर्वसामान्य जनतेच्या परिचयाचे झाले आहे. परदेशांमध्ये झपाट्याने विकसित झालेले हे आधुनिक तंत्रज्ञान भारतात अद्याप बाल्यावस्थेत आहे; मात्र देशातील मुलांना हे आधुनिक ज्ञान अगदी बालवयापासूनच मिळावे, या उद्देशाने झपाटलेल्या प्रकल्पा भिडे आणि त्यांचे पती ख्रिस बॅस्टियन पिल्लई हे दाम्पत्य पुण्यात गेली पाच वर्षे ‘रोबोमाइंड्स’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून काम करत आहे. त्यांच्या संस्थेतील मुलांनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. आजच्या महिला दिनानिमित्त, वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रकल्पा भिडे यांची मुलाखत... 
........
‘रोबॉटिक्स’चे प्रशिक्षण देणारी संस्था पुण्यात सुरू करण्याचा निर्णय का घेतला? 
- मुळात मी पुण्याची. कमिन्स कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. तिथे शिक्षण झाल्यानंतर लगेचच नोकरी मिळाली. १७-१८ वर्षे तिथे नोकरी केल्यानंतर, आम्ही परत भारतात यायचे ठरवले. माझे पती ख्रिस बॅस्टियनपिल्लई हेही अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. तिथे असताना आम्ही अमेरिकेत होणारी रोबॉटिक्समधील वेगवान वाटचाल पाहत होतो. तिथल्या शिक्षण पद्धतीत प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. अत्यंत प्रगत तंत्रज्ञान शिकण्याची सोय शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना मिळते. आपल्या देशात गणित, विज्ञान क्षेत्रातील असे विषय प्रत्यक्ष आयुष्यातील वापराच्या आधारे शिकता येत नाहीत. पुस्तकी ज्ञानावर भर अधिक आहे. मुलांच्या बौद्धिक क्षमतेला खतपाणी घालणाऱ्या वेगळ्या कौशल्य प्रशिक्षणाची सोय नाही. आपला देश प्रगतिपथावर नेण्याचे काम ही युवा पिढीच करणार आहे. त्यांना प्रगत शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे. ती देण्याच्या उद्देशाने आणि आपल्या देशातील मुलांना प्रगत तंत्रज्ञान शिकवता यावे, यासाठी आम्ही रोबॉटिक्सचे प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करायचे ठरवले आणि पाच वर्षांपूर्वी ‘रोबोमाइंड्स’ ही संस्था सुरू केली. 

या संस्थेच्या कामाबद्दल थोडे सांगा.
- आम्ही पाच वर्षांपासून १६ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना ‘रोबॉटिक्स’चे प्रशिक्षण देतो. दहा विविध पातळ्या असतात. अगदी पाच वर्षांची मुले स्वयंचलित पक्षी, प्राणी, छोट्या वस्तू बनवतात. आज शाळेत विज्ञान शिकणारी मुले पुस्तकातील ज्ञानापेक्षा कितीतरी पुढचे ज्ञान घेत आहेत. म्हणजे ही अभियांत्रिकी महाविद्यालयात जातील, तेव्हा काय शिकतील, त्यांच्या बुद्धीला पुरेल इतके ज्ञान आपण देऊ शकतो का, असा प्रश्न मला पडतो. आमच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या १४ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांनी नुकतेच ‘एफएलएल २०१८ अजिंक्यपद स्पर्धे’त विजेतेपद पटकावले आहे. आता ही मुले एफएलएल जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. दुसरा गट ओपन युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होईल. या अत्यंत दर्जेदार, मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तयार केलेल्या रोबोटची संकल्पना, डिझाइन, कार्यान्वयन हे सर्व ही मुलेच करतात. या स्पर्धांमध्ये जिंकण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना, प्रचंड अचूकता आवश्यक असते. एवढेच नव्हे, तर एक गट म्हणून मुलांचे वर्तन परस्परांशी, दुसऱ्या गटांशी कसे आहे, याचेही मूल्यमापन केले जाते. अशा सर्व पातळ्यांवर ही मुले यशस्वी झाली आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझे पती ख्रिस बॅस्टियनपिल्लई २४ तास कार्यरत असतात. मी नोकरी करून उरलेला सर्व वेळ या संस्थेसाठी देते. आता आमची पुण्यात तीन केंद्रे आहेत. त्यापैकी दोन महात्मा सोसायटीमध्ये, तर एक कोरेगाव पार्कमध्ये आहे. आतापर्यंत १३०० मुले आमच्या संस्थेत शिकून गेली आहेत. आपल्या देशात अशा प्रकारच्या, रोबॉटिक्सचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था मोजक्याच आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात केवळ दिल्ली, अहमदाबाद या ठिकाणी अशा संस्था होत्या. आता १४ शहरांमध्ये अशा संस्था आहेत. महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात या संस्था आहेत; पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. 

- तुमच्या मते या क्षेत्रात कोणती आव्हाने आहेत? 

- ग्लोबलायझेशनच्या जमान्यात रोबॉटिक्स भारतात पोहोचून बराच कालावधी झाला असला, तरी ही संकल्पना सर्वव्यापी झालेली नाही. अलीकडे आयआयटी किंवा उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये याचे शिक्षण मिळू लागले आहे. खर्चिक विषय आणि त्यातील तज्ज्ञांचा अभाव हेही यामागचे मोठे कारण आहे. आज आम्हाला अनेक लोक सांगतात, की आम्ही जागा देतो, तुम्ही तुमचे केंद्र येथे सुरू करा; पण आमच्याकडे प्रशिक्षण देण्यासाठी माणसेच नाहीत. आर्थिक पाठबळ हेही मोठे आव्हान आहे. आम्ही या संस्थेमध्ये जी किट्स वापरतो, ती ‘नासा’मध्ये रोबॉटिक्सचे प्रशिक्षण देण्यासाठी वापरतात त्याच दर्जाची असतात. एकेका किटची किंमत पन्नास हजार रुपये इतकी आहे. अन्य खर्च वेगळेच. स्पर्धेला जाण्यासाठी आम्हाला आमचा खर्च करावा लागतो. काही प्रमाणात खासगी कंपन्यांकडून मदत मिळते; पण त्याची खात्री नाही. गेल्या वर्षी आम्हाला टाटा मोटर्सने मदत केली होती; पण यंदा अद्याप कोणत्याही कंपनीचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. सरकारी पातळीवरून तर कोणतीही मदत मिळत नाही. खरे तर अत्यंत आधुनिक क्षेत्रात आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहोत. तरीही, याबाबत खूपच अनास्था आहे. यापुढचे भविष्य रोबॉटिक्समध्येच आहे. वैद्यकीय क्षेत्रात रोबॉटिक्सचे योगदान लक्षणीय आहे. आपल्याकडे आतापर्यंत उत्पादन क्षेत्रात रोबोट वापरले जातात इतकी माहिती लोकांना होती; पण आता अनेक क्षेत्रांत रोबोटचा वापर केला जात आहे. मानवी शक्तीला जिथे मर्यादा येतात, तिथे रोबोट काम करू शकतो. अचूकता आणि वेग या वैशिष्ट्यांमुळे रोबोटचा वापर अगदी दैनंदिन जीवनात होणार आहे, यात शंका नाही. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात प्रचंड संधी आहे; मात्र त्याकरिता आपल्याकडे याचे शिक्षण सर्वदूर उपलब्ध होण्याची गरज आहे. 

हे शिक्षण दूरपर्यंत जाण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करता?
- आपल्याकडे प्रचंड बौद्धिक संपदा आहे. आमच्याकडे येणाऱ्या मुलांची आर्थिक क्षमता चांगली असल्याने ती याचे शिक्षण घेऊ शकतात; पण देशात अगदी खेड्यापाड्यांतही प्रचंड बुद्धिमत्ता असलेली मुले आहेत. त्यांना संधी कशी मिळणार? आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. शाळांमध्ये जाऊन आम्ही काही शिबिरे घेतो. गरीब मुलांना शिकवतो. काही कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम असतात, त्याअंतर्गत शाळांमध्ये वर्ग घेतो; पण त्याला मर्यादा आहेत. आपल्याकडे असलेल्या बौद्धिक संपदेचा पुरेपूर उपयोग देशासाठी व्हावा या उद्देशाने आम्ही मुलांना या नवीन क्षेत्राचे उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची नक्कीच गरज आहे.  
..................
रोबॉटिक्समध्ये आपण जगापेक्षा खूप मागे : ख्रिस बॅस्टियनपिल्लई

‘रोबॉटिक्स हे भविष्य आहे. विकसित देशांमध्ये या क्षेत्रात प्रचंड प्रगती झालेली आहे. विकसित देशांच्या तुलनेत आपण या क्षेत्रात दहा ते पंधरा वर्षे मागे आहोत. ही दरी वेगाने दूर केली नाही, तर आपण या क्षेत्रात खूप मागे फेकले जाऊ,’ अशी खंत रोबोमाइंड्स या संस्थेचे प्रमुख ख्रिस बॅस्टियनपिल्लई यांनी व्यक्त केली. अभियांत्रिकी क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या ख्रिस यांनी रोबोमाइंड्स संस्थेच्या माध्यमातून ‘रोबॉटिक्स’चे अत्याधुनिक प्रशिक्षण उपलब्ध केले आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी ‘रोबोमाइंड्स’ ही संस्था सुरू केली. या संस्थेत आम्ही पाच ते सोळा, सतरा वर्षांपर्यंतच्या मुलांना ‘रोबॉटिक्स’चे प्रशिक्षण देतो. आपल्याकडे या क्षेत्राचे शिक्षण शाळा, कॉलेजांमध्ये सहजपणे मिळण्याची सोय नाही. वेगवेगळ्या कामांसाठी प्रायोगिक तत्त्वावरील रोबोट तयार करण्याचे काम ही मुले करतात. आमच्या संस्थेतर्फे आम्ही मुलांना दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये उतरवतो. यामध्ये आपल्या मुलांची क्षमता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निकषांवर जोखली जाते. यंदा आमचे दोन संघ अमेरिका आणि युरोपमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भाग घेणार आहेत. ६० देशांचे स्पर्धक या स्पर्धांमध्ये सहभागी होतात. लहान वयात मुलांना या क्षेत्राची ओळख झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर यात काय घडामोडी घडत आहेत, याचे त्यांना भान असते. भविष्यात या क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी ते उद्युक्त होतात. आपल्या देशाला या क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज आहे. आतापासून ही पायाभरणी केली, तर आपण जगाबरोबर धावू शकू. मुले केवळ परीक्षार्थी न राहता त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.’ 

‘रोबॉटिक्स क्षेत्राची क्षमता प्रचंड आहे. अंतराळयानापासून ते सेवा, वैद्यकीय, उत्पादन या क्षेत्रांत याची उपयुक्तता आहे. रोबोट्स थकत नाहीत, अधिक पगाराची मागणी करत नाहीत, संप करत नाहीत. त्यामुळे आपल्या देशात उत्पादनवाढ, अचूक जलद सेवा देण्यासाठी ‘रोबॉटिक्स’ची मोठी मदत होईल. त्यासाठी जलद गतीने आणि सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

(‘रोबोमाइंड्स’च्या संस्थापिका प्रकल्पा भिडे आणि त्यांचे पती ख्रिस बॅस्टियन पिल्लई यांच्या मुलाखतीचा आणि मुलांच्या रोबॉटिक्सबद्दलच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
(महिला दिनाबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील सर्व विशेष लेख https://goo.gl/zuvB57 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rakesh About 182 Days ago
I am 48 years male want to learn robotics
0
0

Select Language
Share Link
 
Search