Next
वैभवी वाटचाल... ११० वर्षांची
BOI
Saturday, May 27, 2017 | 05:57 PM
15 0 0
Share this article:

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेची इमारत

आद्य साहित्य संस्था अशी ओळख असलेल्या पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने २६ मे रोजी १११व्या वर्षात पदार्पण केले आहे. साहित्य, संस्कृती, समीक्षा, मराठी, भाषा यांच्या संवर्धनासाठी ही साहित्य परिषद गेली ११० वर्षे कार्यरत आहे. वर्धापनदिनानिमित्ताने परिषदेच्या आजवरच्या कार्याचा मांडलेला लेखाजोखा....
.............................

सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) हे एक महत्त्वाचे नाव. पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात मिळून संस्थेच्या ७६ शाखा आहेत. तेरा हजारांपेक्षा जास्त आजीव सभासद असणारी ही महाराष्ट्रातील एकमेव साहित्य संस्था आहे.
 
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकहितवादी आणि न्या. रानडे यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. १८७८मध्ये पहिले ग्रंथकार संमेलन न्या. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात भरले. दुसरे १८८५मध्ये बुधवार पेठेतील सार्वजनिक सभेच्या जोशी सभागृहामध्ये भरले. तिसरे संमेलन १९०५मध्ये सातारा येथे झाले. या संमेलनांना स्थायी संस्थेचे स्वरूप देण्याचा पहिला प्रयत्न पुण्यात झाला. येथे २६ आणि २७ मे १९०६ रोजी चौथे ग्रंथकार संमेलन विद्वान कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागनाथ पाराजवळच्या मळेकर वाड्यात झाले. लोकमान्य टिळक, न. चिं. केळकर, चिंतामणराव वैद्य, विसूभाऊ राजवाडे, पांगारकर, रेव्हरंड टिळक, आदी मान्यवर या संमेलनात सहभागी झाले होते. 

२७ मे रोजी समारोपाच्या दिवशी न. चिं. केळकर यांनी महाराष्ट्रात साहित्य परिषद स्थापन केल्याची घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी या घोषणेला पाठिंबा दिला. १९१२ साली साहित्य परिषदेला नियमबद्ध आणि घटनामंडित करण्यात आले. १९१२ ते १९३२ अशी वीस वर्षे ‘मसाप’ची कचेरी गिरगावच्या फणसवाडीतील ‘विविध ज्ञान विस्तारा’च्या कार्यालयात होती. १९३१च्या हैदराबाद संमेलनात ‘मसाप’ची कचेरी पुण्यात नेण्यात यावी असा ठराव साधारण सभेत मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात १९३३ साली परिषदेची कचेरी पुण्यात आली. प्रथम ‘मसाप’चे दप्तर कृ. पां. कुलकर्णी यांनी जपून ठेवले. नंतर टिळक रस्त्यानजीकच्या चापेकरांच्या आर्यसंस्कृती मुद्रणालयाजवळ भागवतांच्या बंगल्यात परिषदेची कचेरी होती. नानासाहेब चापेकरांच्या पुढाकाराने ‘मसाप’ला औंधचे संस्थानिक श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्याकडून टिळक रस्त्यावर जागा मिळाली. त्या जागेवर बांधलेल्या दोन गोलाकार खोल्यांचे उद्घाटन सात फेब्रुवारी १९३७ रोजी इचलकरंजीचे अधिपती बाबासाहेब घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.

केवळ पुण्यातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापर्यंत कार्यरत असणाऱ्या परिषदेच्या कार्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे वाङ्मयीन कार्यक्रमांचे आयोजन होय. परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह हे महाराष्ट्राचे वैचारिक व्यासपीठ आहे. परिषदेचे कार्यकर्ते, ज्येष्ठ कवी, आणि संमेलनाचे अध्यक्ष माधव जूलियन यांच्या स्मृती जपण्यासाठी साहित्यिक वि. दा. घाटे आणि ख्रिस्तवासी रावसाहेब रघुवेल लकुस जोशी यांच्या पुढाकाराने हे सभागृह उभे राहिले. या सभागृहात सारस्वतांचे स्मृतिदिन, व्याख्यानमाला, चर्चा, परिसंवाद, कविसंमेलन, मुलाखती, पुरस्कार वितरण, मेळावे अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परिषदेचे (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय परिषदेच्या वैभवात मोलाची भर घालत आहे. 

परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेला १०५ वर्षांची समृद्ध परंपरा आहे. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या अध्ययनाच्या प्रसारासाठी विविध स्तरांवरील परीक्षांचे आयोजन परिषदेतर्फे केले जाते. या सर्व उपक्रमांबरोबर परिषदेने साहित्यिक साह्यनिधी उभा केला आहे. अपंग, वृद्ध, निराधार अशा साहित्यिकांना या निधीतून मानधन देण्यात येते. परिषदेच्या अतिथी निवासात साहित्यिकांची अत्यल्प दरात निवासाची व्यवस्था केली जाते.

 १९६१ साली महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांच्या पुढाकाराने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. महामंडळाच्या स्थापनेवेळी अखिल भारतीय मराठी भाषकांची संमेलने भरवण्याचे काम महामंडळाने हाती घ्यावे, असे घटनेत स्पष्टपणे नमूद केले. त्यानुसार १९६५च्या सुरुवातीला संमेलनाची योजना केली. या योजनेनुसार १९६५मध्ये प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबादला साहित्य महामंडळाचे पहिले संमेलन झाले. त्यापूर्वी १९६४पर्यंतची ४५ साहित्य संमेलने भरवण्याचे महत्त्वाचे काम पुण्यातील ‘मसाप’ने केले. आपली साहित्य संमेलने उदारपणे गणनेसाठी साहित्य महामंडळाला देऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेने महामंडळासाठी मोठाच त्याग केला आहे. त्यामुळेच संमेलनाची गणना होती तशीच कायम राहिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ मोठे असले, तरी त्यात सहभागी होणाऱ्या लेखक, कवी, वक्त्यांच्या संख्येला मर्यादा येते. त्या त्या विभागातील प्रतिभावंतांना, नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या भावनेतून विभागीय साहित्य संमेलनाची कल्पना पुढे आली.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली एक एप्रिल २०१६ रोजी ‘मसाप’मध्ये परिवर्तन होऊन नवे कार्यकारी मंडळ आले. या कार्यकारी मंडळाने परिषदेच्या ऐतिहासिक माधवराव पटवर्धन सभागृहाचे नूतनीकरण केले. परिषदेचे फेसबुक पेज, ट्विटर, वेबसाइट सुरू केली. परिषदेची मराठी वाङ्मयाच्या इतिहासासारखी मौल्यवान प्रकाशने ई-बुक रूपात आणली. ‘मसाप’ने स्वतंत्र संशोधन विभाग सुरू करून त्याची धुरा डॉ. अरुणा ढेरे यांच्याकडे दिली. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाशी ‘मसाप’ने केलेला करार आणि ज्ञानमंडळ म्हणून मिळालेली मान्यता यातून महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी परिषद योगदान देत आहे. शाखांचे आर्थिक सबलीकरण हे मोठे आव्हान असले तरी परिषद यातून नक्कीच मार्ग काढेल. परंपरा आणि आधुनिकता यांच्या मिलाफातून नवे रचनात्मक काम उभे करण्याचा प्रयत्न परिषदेने यापूर्वी केलेला आहे आणि यानंतरही तो तसाच पुढे चालू राहील. 

- प्रा. मिलिंद जोशी 
ई-मेल : joshi.milind23@gmail.com

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search