Next
साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे
संमेलनाध्यक्ष होणाऱ्या पाचव्या महिला साहित्यिक
BOI
Monday, October 29, 2018 | 02:23 PM
15 0 0
Share this story

डॉ. अरुणा ढेरेपुणे : आशयगर्भ, भावपूर्ण कविता, ललित लेखन, कथा, समीक्षा अशा विविधांगी लेखनाने मराठी साहित्यविश्व समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तब्बल १७ वर्षांनंतर संमेलनाध्यक्षपद महिलेला लाभले असून, हे पद भूषविणाऱ्या त्या पाचव्या महिला साहित्यिक आहेत. यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी २०१९ या कालावधीत हे संमेलन होणार आहे. 

संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता ज्येष्ठ साहित्यिकाची निवड करावी, अशी घटनादुरुस्ती साहित्य महामंडळाने अलीकडेच केली आहे. तिची अंमलबजावणी या निवडीपासून करण्यात आली. यवतमाळमध्ये झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर, डॉ. अरुणा ढेरे आणि प्रेमानंद गज्वी या तीन नावांवर चर्चा झाली. अखेर बहुमताने डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी रविवारी, २८ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारनंतर ही निवड जाहीर केली. 

तत्पूर्वी, डॉ. अरुणा ढेरे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे नाव संमेलनाध्यक्ष पदासाठी निश्चित झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारण्यासाठी संकोच वाटत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारण्यास होकार दिल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. 

या आधी ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष यांनी २००१मध्ये इंदूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्याआधी १९६१मध्ये कुसुमावती देशपांडे, १९७५मध्ये दुर्गा भागवत, १९९६मध्ये शांता शेळके यांनी हे पद भूषविले होते. 

लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या अरुणा ढेरे या संवेदनशील कवयित्री, लेखिका म्हणून परिचित आहेतच. त्याचबरोबर संशोधनात्मक लेखनाचा वारसाही त्यांनी समर्थपणे जोपासला आहे. अज्ञात झऱ्यावर, कृष्णकिनारा, काळोख आणि पाणी यांसारखे कथासंग्रह, तसेच, निरंजन, प्रारंभ, मंत्राक्षर, यक्षरात्र असे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध असून, दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य, स्त्री लिखित मराठी कविता, आदी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले आहे. ‘विस्मृतिचित्रे’ हा त्यांचा ग्रंथ विशेष गाजला. याशिवाय विपुल वैचारिक लेखन त्यांनी केले असून, त्यांनी मराठी साहित्यविश्वात दिलेल्या मौल्यवान योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. मराठी साहित्यात पीएच.डी. केलेल्या डॉ. अरुणा ढेरे यांनी पुणे विद्यापीठात १९८३ ते ८८ या काळात प्राध्यापिका म्हणून काम केले आहे.  

संवेदनशील आणि मृदू स्वभावाच्या डॉ. अरुणा ढेरे यांच्यासारख्या व्यासंगी, बहुआयामी व्यक्तीची या पदावर निवड झाल्याने साहित्यक्षेत्रासह अन्य क्षेत्रातूनही आनंद व्यक्त होत आहे. 

(डॉ. अरुणा ढेरे यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
प्रा,डी,एस.कुलकर्णी.माजी मुख्याध्यपक.चंपावती विद्यालय बीड About 144 Days ago
हार्दिक हार्दिक अभिनंदन.
0
0

Select Language
Share Link