Next
नादमधुर विरासतीची बरसात!
BOI
Friday, February 16 | 05:07 PM
15 0 0
Share this story


पुणे : तबलानवाज़ उस्ताद झाकीर हुसेन, त्यांचे बंधू आणि तालवादक तौफिक कुरेशी, ज्येष्ठ घटमवादक विक्कू विनायकरामजी, त्यांचे पुत्र सेल्वा गणेशन, ज्येष्ठ पियानोवादक लुई बँक्स, त्यांचे पुत्र ड्रमवादक जिनो बँक्स आणि प्रसिद्ध व्हायोलीनवादक बंधूद्वय गणेश राजगोपालन आणि कुमरेश राजगोपालन.... असे एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ दिग्गज वादक मंचावर.... या सर्वांनी एकत्रितपणे जे वादन सादर केले ते निव्वळ अविस्मरणीय आणि शब्दातीत. अशा प्रकारे गुरू-शिष्यांच्या चार जोड्या प्रथमच एकत्र मंचावर आल्या. निमित्त होते, ‘मिराज क्रिएशन्स’ निर्मित आणि राहुल रानडे प्रस्तुत, रक्ताच्या नात्यातील गुरू-शिष्यांच्या ‘विरासत’ या पुण्यात झालेल्या संगीत मैफलीचे.

शनिवारवाड्याची भव्य पार्श्वभूमी असलेला रंगमंच, आल्हाददायक हवा आणि समोर कानात प्राण साठवून बसलेल्या रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत या कलाकारांनी सादर केलेल्या अनोख्या सांगीतिक कलाविष्कारातून भारतीय संगीताची समृद्ध ‘विरासत’ उलगडली. मैफलीची सुरुवात सर्व कलाकारांनी सादर केलेल्या एका मधुर रचनेने झाली. ही रचना लुई बँक्स यांनी बांधली होती. आठही वाद्यांचा समावेश असलेली ही रचना रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली. 

त्यानंतर दक्षिणात्य व्हायोलिनवादक गणेश आणि कुमरेश यांनी ‘अधुभूत’ ही पल्लवी सादर केली. ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबल्यावर त्यांना साथ करूतन, वातावरण खुलवायला सुरुवात केली. ज्येष्ठ घटमवादक पद्मविभूषण विक्कू विनायकराम यांनी आपल्या खास शैलीत वादन करून प्रेक्षकांनाही टाळ्यांच्या रूपाने वादनात सामील करवून घेतले. विक्कूजींनी आपले सुपुत्र सेल्वा गणेश यांच्यासोबत खास कर्नाटक शैलीत तालवादन सदर केले. सेल्वा गणेश यांचे एकल खंजिरी वादनही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले. झाकीर हुसेन यांचे बंधू आणि तालवादक तौफिक कुरेशी यांनी झेंबेवादनाने मैफिलीला रंगत आणली. गणेश राजगोपालन आणि कुमरेश राजगोपालन यांनी व्हायोलीनवर राग चारुकेशी सादर करून रसिकांची मने जिंकली. 

लुई बँक्स यांची पियानोवरील हुकुमत आणि जिनो बँक्स यांचे ड्रमवरील प्रभुत्व रसिकांना खिळवून ठेवणारे होते. जिनो बँक्स, झाकीर हुसेन आणि तौफिक कुरेशी यांचे पाश्चिमात्य शैलीतील सादरीकरण मैफलीचे विशेष आकर्षण ठरले. ‘डोअर ऑफ डिझायर्स’ ही रचनाही अफलातून होती. मैफलीच्या समारोपाला सर्व कलाकारांनी मिळून ‘पीस कॉल’ ही पारंपरिक आणि पाश्चिमात्य संगीताचे मिश्रण असलेली रचना सादर केली. पारंपारिक वाद्यांबरोबर पाश्चिमात्त्य वाद्यांचा हा मेळ अवर्णनीय होता.

हे वादन संपूच नये, असे प्रत्येक रसिकाला वाटत होते. मैफल सुरू झाल्यापासून संपेपर्यंत वादन उत्तरोत्तर रंगतच गेले. एका क्षणी वादनाने अत्युच्च पातळी गाठली, की आता संपणार हे सारे अशी हुरहूर लागत असतानाच पुन्हा नवीन आवर्तन सुरू होत असे आणि नवीन सादरीकरण आणखी एका नव्या उंचीवर जात असे. ताल-सुरांचे हे अद्भुत नर्तन पुणेकरांच्या कायम स्मरणात राहण्यासारखे होते. 

झाकीर हुसेन यांच्या मिश्कील आणि उमद्या स्वभावाचे दर्शनही मैफलीत घडत होते. सुरुवातीला सर्व कलाकारांचा पुणेरी पगडी आणि उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांनी अगदी झुकून ती पगडी मस्तकावर धारण केली. विक्कू विनायकारामजी यांना मंचावर पाचारण करताना ते दरवेळी त्यांचे दाक्षिणात्य शैलीनुसार असलेले संपूर्ण नाव घेत होते. 

या मैफलीच्या सुरुवातीला पुण्याच्या ‘विरासत’मध्ये मानाचे स्थान असलेले पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती व त्यांची धुरा पुढे चालवणारे त्यांचे सुपुत्र डॉ. पराग संचेती आणि कन्या मनीषा संचेती-संघवी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि केतन गाडगीळ या पिता–पुत्र जोडीने केले. या मैफलीला प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, आनंद भाटे, अभिनेते सचिन खेडेकर, सुनील बर्वे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आदींसह मान्यवर उपस्थित होते. मैफलीच्या व्यवस्थापनात श्याम भुतकर यांनी रंगमंच, हर्षवर्धन पाठक यांनी लाइट्स, मुजीब दादरकर यांनी ध्वनिसंयोजन, सचिन नाईक यांनी ध्वनियंत्रणा, तर मिलिंद मटकर यांनी जाहिरात डिझाइनची जबाबदारी सांभाळली. इव्हेंट मॅनेजमेंट ‘ए फिल्ड प्रा. लि.’ यांनी केले होते,  तर ‘पीआर’ची जबाबदारी ‘लीड मिडिया’ने सांभाळली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयआरबी, विलास जावडेकर असोसिएट्स हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पु. ना. गाडगीळ, केसरी टूर्स, गिरिकंद हॉलिडेज, धीरेंद्र आउटडोअर मीडिया सर्व्हिसेस व रेडिओ सिटी हे या कार्यक्रमाचे पार्टनर्स होते.  
(विरासत या मैफलीची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत....)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Maneesha Lele About 303 Days ago
Avarnaniy Anand!
0
0
Maneesha Lele About 303 Days ago
Avarniya Anandachi Maiphil
0
0
बापू रोकडे About 303 Days ago
नादमधुर विरासतीची बससात खूपच छान !
0
0

Select Language
Share Link