Next
अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवणे आवश्यक
शिक्षक,पालकांची भूमिका महत्त्वाची
BOI
Monday, October 29, 2018 | 04:37 PM
15 0 0
Share this article:

कावेरी कौन्सेलिंग सेंटरतर्फे आयोजित ‘डिस्लेक्सिया’विषयक जाणीव जागृती कार्यक्रमात बोलताना (डावीकडून) प्रीती ब्रोकर, दिया बासू, मनाली काँट्रॅक्टर आणि मेधा मराठे.

पुणे : ज्या मुलांना आकलन, वाचन, लेखन आणि अभ्यासात अडचणी येतात अशा ‘लर्निंग डिसएबिलिटी’ असलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वास आणि स्वाभिमान निर्माण करणे शक्य आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ही मुले चांगली प्रगती करतात, परंतु त्यासाठी पालक, शिक्षक आणि शाळेच्या मदतीची गरजेची आहे, असे मत या  क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. ‘कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या ‘कावेरी कौन्सेलिंग सेंटर’तर्फे ‘डिस्लेक्सिया’विषयी जाणीव जागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात ‘स्लो लर्नर’ मुलांसाठीच्या ‘विद्या ज्योती’ शाळेच्या प्राचार्य मेधा मराठे, ‘महाराष्ट्र डिस्लेक्सिया असोसिएशन’च्या दिया बासू, सायकॅट्रिक सोशल वर्कर प्रीती ब्रोकर आणि ससून रुग्णालयातील सायकॉलॉजिस्ट मनाली काँट्रॅक्टर यांनी आपले विचार मांडले.

कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी, मॅनेजमेंट फॅसिलिटेटर कामिनी सक्सेना, प्रो. पी. एन. एन. अय्यर, अंजली मॉरिस फाउंडेशनच्या पर्यवेक्षक मुग्धा सफई, तसेच शिक्षक, विशेष मुलांचे प्रशिक्षक व पालक या वेळी उपस्थित होते.

मेधा मराठे म्हणाल्या, ‘अटेन्शन डेफिसिट हायपरऍक्टिव्हिटी डिसऑर्डर’ (एडीएचडी) किंवा ‘लर्निंग डिसऍबिलिटी’ची (एलडी) समस्या असलेली मुले इतर सामान्य मुलांसारखीच दिसत असल्यामुळे त्यांना शालेय वयात बराच त्रास सहन करावा लागतो; परंतु त्यांची समस्या समजून घेऊन उपाय योजले, तर त्यांच्यात स्वाभिमान व आत्मविश्वास जागवणे निश्चित शक्य आहे. ‘एडीएचडी’, ‘एलडी’, ‘स्लो लर्नर’, ‘ऑटिझम’ किंवा ‘एपिलेप्सी’ अशा विविध समस्या असलेल्या मुलांसाठी हाताने कामे करणे अर्थात ‘व्होकेशनल’ प्रशिक्षणाचा उत्तम फायदा होतो. कागदाच्या वस्तू बनवणे, दागिने बनवणे अशी कामे करताना त्यांची एकाग्रता, डोळे व हातांच्या हालचालींमधील समन्वय, एका जागी बसण्याची वृत्ती वाढीस लागते.’ 

दिया बासू म्हणाल्या, ‘डिस्लेक्सिया’ असलेल्या मुलांना अक्षरे उलटी दिसतात किंवा अक्षरे डोळ्यांसमोर नाचत असल्यामुळे त्यांना लिहिणे वाचणे कठीण होते. असे म्हटले जाते. यातील बहुसंख्य मुलांची समस्या भाषेच्या उच्चारांशी जोडलेली असते. लर्निंग डिसऍबिलिटी असलेल्या मुलांना आळशी ठरवणे चुकीचे आहे. सामान्य मुलांपेक्षा ही मुले आकलन करून घेण्यासाठी खूप जास्त कष्ट घेत असतात.’

मनाली कॉन्ट्रॅक्टर यांनी लर्निंग डिसऍबिलिटी असलेल्या मुलांना दहावी व बारावीच्या परीक्षेत मिळणाऱ्या सवलती व त्यासाठी लागणारी सरकारी प्रमाणपत्रे याविषयी माहिती दिली. 

‘या मुलांना आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणारे कुणीतरी आहे, या भावनेचा कसा फायदा होतो हे सांगितले. अगदी घरातील पाळीव प्राणीही या मुलांच्या प्रगतीत योगदान देतात’, असे प्रीती ब्रोकर यांनी सांगितले.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search