Next
पुण्यात जूनमध्ये स्पर्धा परीक्षा राज्यस्तरीय महोत्सव
सृजन फाउंडेशन आणि एमपीएससी स्टुडंट्स राइट्सतर्फे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, May 07, 2019 | 06:06 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत बोलताना डावीकडून विजय मते, महेश बडे, रोहित पवार, किरण निंभोरे, साईनाथ डहाळे.

पुणे : ‘महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, दर वर्षी त्यामध्ये लक्षणीय वाढ होत आहे; परंतु या परीक्षेची तयारी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय, स्पर्धा मोठी असल्याने यश-अपयशालाही सामोरे जावे लागते. अशावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनाही या स्पर्धा परीक्षेचे वास्तव उलगडून दाखविण्यासाठी स्पर्धा परीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष व बारामती अ‍ॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार व एमपीएससी स्टुडंट्स राइट्सचे (एमएसआर) महेश बडे व किरण निंभोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

वास्तव, भवितव्य व दिशा या संकल्पनेवर आधारित हा स्पर्धा परीक्षा महोत्सव १८ ते २० जून २०१९ या दरम्यान सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडामंच येथे होणार आहे. पत्रकार परिषदेला साई डहाळे, श्रीकांत कदम, प्रतीक धुमाळ, विजय मते आदी उपस्थित होते. या वेळी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कॉम्पिटेटिव्ह अॅस्पिरेन्ट्स नेव्हीगेटर’ या अॅपचे व संकेतस्थळाचेही अनावरण करण्यात आले.

‘कॉम्पिटेटिव्ह अॅस्पिरेन्ट्स नेव्हीगेटर’ या अॅपचे व संकेतस्थळाचेही अनावरण करताना

या विषयी अधिक माहिती देताना रोहित पवार म्हणाले, ‘आजच्या तरुणाईला प्रशासनात काम करण्याची आवड आहे. प्रशासनात जाऊन जनसेवा करण्याची इच्छा मनाशी बाळगून तरुण स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत. या तरुणाईला स्पर्धा परीक्षेविषयी योग्य मार्गदर्शन मिळणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे अशा स्पर्धा परीक्षांविषयी माहिती उपलब्ध करून विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्यात मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा महोत्सव २०१९ (वास्तव, भवितव्य व दिशा) पर्याय आहे.’

‘तीन दिवसांच्या या महोत्सावात प्रत्येक दिवशी चार सत्रे होतील. यात लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, शैक्षणिक, उद्योग, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरुणांनी सुरू केलेल्या अशा उपक्रमाला बळ देण्यासाठी सृजन फाउंडेशन पुढाकार घेत असते. पाच-सात वर्षे सतत अभ्यास करूनही हाती यश येत नसल्याने आणि वय वाढत असल्याने नैराश्य येते. त्यातून वाढणारी व्यसनाधिनता, खचलेला आत्मविश्वास हा त्या उमेदवारांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, राज्याच्या हितासाठी घातक आहे. मोठ्या संख्येने तरुणवर्ग स्पर्धा परीक्षेच्या मृगजळात अडकलेला आहे. अशावेळी त्याला वास्तवाची जाण करुन देत योग्य दिशा देऊन त्याचे भवितव्य सुकर करण्यासाठी हा महोत्सव निश्चित उपयुक्त ठरणार आहे. ज्यांना स्पर्धा परीक्षेत अपयश आले, त्यांना व्यवसाय मार्गदर्शन केले जाणार आहे. हा महोत्सव सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित करण्यात आला आहे. यातून उभ्या राहणार्‍या निधीचा उपयोग आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी केला जाणार आहे,’ असे पवार यांनी सांगितले.

महेश बडे म्हणाले, ‘‘सृजन’च्या रोहित पवार यांच्या पुढाकारातून आणि ‘एमएसआर’च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी या भव्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. राज्यातील लाखोंच्या संख्येने असलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या समस्या लोकसेवा आयोग व राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी मदतकेंद्रही उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमात क्लासेस, ऑनलाइन अभ्यास पोर्टल्स, व्यवसाय मार्गदर्शन, प्रकाशने असे विविध स्टॉल्स असणार आहेत.’ 

‘नैराश्यग्रस्त, आत्मविश्वासाने खचलेल्या उमेदवारांसाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी स्पर्धा परीक्षेच्या अ‍ॅपचे अनावरण होणार आहे. त्यावर २० प्रश्नांची परीक्षा घेऊन प्रथम, द्वितीय व तृतीय येणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत क्लासला बसण्याची संधी मिळणार आहे. राज्यभरात एकाच दिवशी ही परीक्षा घेतली जाणार आहे. हा महोत्सव विद्यार्थी व पालकांसाठी दिशादर्शक असणार आहे. राज्यातील सरकारी नोकरीबाबतची सद्यस्थिती दरवर्षी विविध पदांसाठी सरासरी आठ-दहा हजार पदांची आहे. मात्र, यासाठी राज्यातून १२-१३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी तयारी करत असतात. दहावी, बारावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली जात आहे. नोकरी करणारा वर्ग, निवृत्त लष्करी जवान, गृहिणी, सरकारी सेवेतील व्यक्ती स्पर्धा परीक्षेसाठी झगडत आहे. पण यातील वास्तव खूप जणांना माहिती नाही. दर वर्षी किती जागा निघतात, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, मार्गदर्शन, या सर्व विषयांची जाण नसते,’ असे बडे यांनी सांगितले.

महोत्सवाविषयी : 
दिवस : १८ ते २० जून २०१९ 
वेळ : सकाळी १० ते रात्री आठ 
स्थळ : गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट, पुणे. 
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी : महेश बडे-  ९१५८२ ७८४८४, किरण निंभोरे- ८४८४० ८६०६१ 
वेबसाइट : www.spardhaparikshamahotsav.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search