Next
महाराष्ट्राशी नाते सांगणारे तंजावर
BOI
Wednesday, May 16, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

ब्रहदीश्वर मंदिर
‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या काही भागांमध्ये आपण विदर्भातील विविध प्रकारच्या पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या महाराष्ट्राशी तमिळनाडूच्या असलेल्या नात्यातील दुवा असलेल्या तंजावरमधील पर्यटनस्थळांची...
..................
तमिळनाडूमधील तंजावरचा इसवी सन ८००पूर्वीचा इतिहास फारसा ज्ञात नाही; पण चोला राजवटीपासून हे गाव जगाच्या नकाशावर गेले. तंजावर हे नाव तंजन नावाच्या दैत्यावरून पडले असावे. नीलमेघ पेरुमल या विष्णूच्या अवताराने त्याचा नाश केला, अशी आख्यायिका सांगितली जाते. ‘Thancheiur’ या शब्दापैकी Than म्हणजे थंड, Chei म्हणजे शेतजमीन आणि Ur म्हणजे गाव, त्यापासून Thanjavur (तंजावूर) असे नाव तयार झाल्याचेही सांगितले जाते. तंजावूर असे त्याचे नाव असले, तरी तंजावर असे नाव सर्वत्र वापरले जाते. चोला घराण्यातील राजांनी येथे ४०० वर्षे राज्य केले.

‘युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेले येथील विशाल आणि देखणे ब्रहदीश्वर (बृहदेश्वर) मंदिर इसवी सन १००२ ते १०१२ या कालावधीत चोला राजवटीतच बांधले गेले. राजराजे चोला या राजाने चालुक्य, राष्ट्रकूट, पंड्या, राजवटींच्या राजाबरोबर युद्ध करून त्यांना जिंकले. तसेच मालदीव, श्रीलंका, ब्रह्मदेश या भारताबाहेरील प्रदेशावरही त्याने विजय मिळविला होता. आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने ब्रहदीश्वर मंदिराची उभारणी केली. हे मंदिर आता जागतिक वारसा म्हणून प्रसिद्ध आहे. इ. स. १२००मध्ये तंजावर पंड्या राजांच्या ताब्यात आले. इ. स. १३००मध्ये अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कफूर याने तंजावरवर कब्जा केला. १३७८मध्ये विजयनगर राज्यात तंजावर समाविष्ट झाले. त्यानंतर ते बहामनी राजांच्या ताब्यात गेले. सन १६७४पासून हा भाग आदिलशहाने व्यंकोजीराजे भोसले यांच्याकडे सोपविला. ब्रिटिश येईपर्यंत म्हणजेच १८५५पर्यंत हे शहर भोसल्यांकडेच होते. महाराष्ट्राबाहेर असलेल्या बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर, देवास व इतर मराठा संस्थानिकांनी स्थानिक भाषा आत्मसात करून त्यांचे राज्य राखलेच; पण तेथील प्रजेशी प्रेमाचे संबंध ठेवले व संस्कृती जपली. तंजावर हेदेखील याचेच उत्तम उदाहरण.

तंजावर आणि मराठे :
इ. स. १६७६मध्ये विजापूरच्या सुलतानाने व्यंकोजीराजे भोसले यांना तंजावर ताब्यात घेण्यासाठी पाठविले आणि मराठ्यांचा तमिळनाडूशी संबंध आला. व्यंकोजीराजे हे शिवाजीराजांचे सावत्रभाऊ म्हणजेच शहाजीराजे भोसले व त्यांची पत्नी तुकाबाई यांचे पुत्र होते. शाहूजी (प्रथम), सरफोजी (प्रथम), तुकोजी, प्रतापसिंह, सरफोजी (द्वितीय), शिवाजी (द्वितीय) यांच्यानंतर तंजावरचे संस्थान ब्रिटिशांनी खालसा केले. बाबाजीराजे भोसले हे सध्या तंजावरचे वारस राजे आहेत. तंजावर हे सध्या एक सांस्कृतिक केंद्र व प्रेक्षणीय स्थळ म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. येथे पूर्वी ७४ मंदिरे होती. त्यातील ३५ मंदिरे अजूनही उभी आहेत.
(तंजावरमधील मराठी मंडळींनी मोठ्या निगुतीने शतकानुशतके जपलेली आपली भाषासंपदा ‘दक्षिणी मराठी’ या यू-ट्यूब चॅनेलच्या रूपात जगासमोर आणली आहे. त्याबद्दलचा‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ब्रहदीश्वर मंदिरबृहदीश्वर मंदिर :
ऐतिहासिक आणि धार्मिक, तसेच दाक्षिणात्य चोल स्थापत्याचे उदाहरण म्हणजेच बृहदीश्वर मंदिर. २०० फूट उंच अशा या मंदिराला ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला आहे. विविध राजवटींच्या कालावधीतील सुमारे ७०० शिलालेख येथे आहेत. चोल घराण्यातील राजा अरुलमोशीवर्म अथवा प्रथम राजराजे चोल याने याची निर्मिती केली आहे. म्हणून या मंदिराला राजराजेश्वर मंदिर असेही संबोधले जाते. वास्तुकला, पाषाण व ताम्रपटावरील शिलालेख, प्रतिमा विज्ञान, चित्रांकन, नृत्य, संगीत, आभूषणे यांचा येथे खजिना आहे. या मंदिराचे एक अचंबित करणारे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला ८० टन वजनाचा, एकाच ग्रॅनाइट पाषाणातील घुमट (कलशाधार) आहे. एवढी प्रचंड शिळा कोणतीही यंत्रसामग्री नसताना १८० फूट उंचीवर कशी नेली असेल, याचा विचार करण्यासारखा आहे. त्या वेळचे स्थापत्य अलीकडील स्थापत्यापेक्षा खूपच सरस होते, असे यावरून म्हणता येऊ शकेल.

गोपुरामधील नंदीगोपुरामधील सुमारे २० फूट लांब, आठ फूट रुंद व ११ फूट उंच नंदी हेदेखील येथील वैशिष्ट्य आहे. संपूर्ण मंदिरासाठी एक लाख ३० हजार टन ग्रॅनाइटचा वापर करण्यात आला आहे. ८० टनी घुमट मंदिरावर चढविताना व मंदिर बांधताना सुमारे दोन-तीन किलोमीटर लांबीचा मातीचा रॅम्प करण्यात आला होता, असे उल्लेख आढळतात. विशेष म्हणजे दुपारी या देवळाच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही, अशी त्याची रचना आहे. भव्य, कलात्मक आणि दाक्षिणात्य पद्धतीची उत्तुंग गोपुरे हे मंदिराचे आणखी वैशिष्ट्य.

नृत्यमुद्राशिव ही संगीत, नृत्य यांची देवता असल्याने शैवांच्या अनेक प्रकारातील नृत्यमुद्रा येथे बघण्यास मिळतात. कटिसम, चतुर, ललित, तलसस्फोटित, भुजंगत्रसित ऊर्ध्वजानू, ललाटतिलकनादांत अशा अनेक प्रकारच्या मुद्रा येथे पाहायला मिळतात. पूर्वी ४०० नर्तिका मंदिराबाहेरील प्रागंणात नृत्य करून राजाला मानवंदना देत असत. हे दृश्य किती मनोहर दिसत असेल, याची कल्पना करता येईल. पूर्वीचे राजे कलासक्त होते, याचेही हे एक उदाहरण म्हणता येईल.

तंजावरचे संकेतस्थळ : महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतामध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीची पताका डौलाने फडकावत ठेवणारे तंजावर येथील राजघराणे आता आधुनिकतेची कास धरून माहितीच्या मायाजालात प्रवेश करत आहे. तंजावर राजघराण्याचे संकेतस्थळ (वेबसाइट) विकसित करण्यात आली असून, दोन जून रोजी या वेबसाइटचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. त्यामुळे तंजावर राजघराण्याची माहिती जगभरातील लोकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

सरस्वती महाल पुस्तक संग्रहालयसरस्वती महाल पुस्तक संग्रहालय : येथे ३० हजार पुस्तके आहेत. त्यात जुने संस्कृत ग्रंथ, ताम्रपट, ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. ज्यावरून शिवचरित्र सर्वच इतिहासकारांनी मान्य केले, त्या परमानंदकृत ‘शिवभारत’ या दुर्मीळ ग्रंथाची मूळ प्रत येथे सापडली. हा ग्रंथ शिवचरित्राचा आधार मानला जातो. सदाशिव महादेव दिवेकर यांनी १९२१मध्ये ते प्रथम प्रकाशित केले. त्या वेळची सहा रुपये किमतीची प्रत माझ्या वैयक्तिक संग्रहात आहे. शिवभारताचा शोध घेतानाची एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी आहे. दिवेकर जुन्या संदर्भ ग्रंथांचा शोध घेत होते, त्या वेळी हा ग्रंथ तंजावर येथील ग्रंथालयात असल्याची माहिती त्यांना लिपझिग येथील जर्मन ओरिएन्टल सोसायटी या पौर्वात्य ग्रंथ ठेवणाऱ्या संस्थेने दिली. यावरून या ग्रंथालयाची माहिती पाश्चिमात्य राष्ट्रांतील विद्वानांना होती, हे दिसून येते.

शिवभारतातील पुस्तकाचे एक पानशिवभारतातील एका पानाचा फोटोही मुद्दाम सोबत देत आहे. या ग्रंथालयात संस्कृत, तमिळ, मराठी व तेलुगू या भाषांतील अनेक विषयांवरील ग्रंथ असून, त्यामध्ये ज्योतिष, आयुर्वेद, अभियांत्रिकी आदी विषयांचा समावेश आहे. दुर्मीळ असे, पर्णपत्रावरील जीर्ण झालेले सात ते आठ हजार ग्रंथही येथे जतन करून ठेवण्यात आले आहेत.

कलादालनकलादालन : चोल, पल्लव, नायक कालीन वस्तूंचा जणू खजिनाच येथील कलादालनात आहे. तेथे सुंदर अशी पाषाणातील, तसेच कांस्यशिल्पे पाहण्यास मिळतात. सरफोजीराजे भोसले यांचा पुतळा, नटराजांच्या विविध राजवटीतील मूर्ती, तसेच अनेक देवदेवतांच्या मूर्ती येथे पाहायला मिळतात.

शिवगंगा गार्डनशिवगंगा गार्डन : येथे छोटे प्राणिसंग्रहालय आहे, तसेच बोटिंगचीही व्यवस्था आहे. तेथे छोटी केबलकारही आहे.


श्वार्टझ् चर्च : हे चर्च सरफोजीराजे भोसले यांनी रेव्हरंड सी. व्ही. श्वार्टझ् यांच्या स्मरणार्थ उभारले,

श्वार्टझ् चर्चत्यांनी सरफोजीराजेंना राज्य परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.

तंजावरची अन्य वैशिष्ट्ये : तंजावर हे रेशीम उद्योगाचे प्रमुख ठिकाण आहे. तंजावरला तांदळाचे कोठारही समजले जाते. येथील कुंभकोणमचे नारळही प्रसिद्ध आहेत. तंबोरा, वीणा, व्हायोलिन अशा अनेक वाद्यांची निर्मिती येथे होते. तसेच, संगीत, नृत्य महोत्सवही आयोजित केले जातात. तंजावरची चित्रशैली कला क्षेत्रात खूपच प्रसिद्ध आहे. येथील चित्रांचा दर्जा उत्तम असल्यामुळे पर्यटकांची पसंती असते. येथे पंचधातूंच्या मूर्ती, तसेच पूजासाहित्यही मिळते.

तंजावरच्या आसपासची ठिकाणे :
मनोरामनोरा : हे ठिकाण तंजावर जिल्ह्यात दक्षिणेकडे समुद्रकिनारी आहे. सरफोजीराजे भोसले यांनी ब्रिटिशांच्या नेपोलियनवरील वॉटर्लूच्या विजयाप्रीत्यर्थ सन १८१४मध्ये येथे किल्ला बांधला असून, आठमजली मनोराही बांधला आहे. हे सहलीचे एक ठिकाण झाले आहे. २००४मध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये त्याचे थोडे नुकसान झाले होते. हे ठिकाण तंजावरपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे.

कुंभकोणम : कुंभकोणम हे नारळासांठी तर प्रसिद्ध आहेच, पण ते नागेश्वरस्वामी मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. चोला राजा आदित्य याने नवव्या शतकात ते बांधले. कुंभकोणम येथे १८८ देवळे आहेत. त्यामुळे त्याला ‘सिटी ऑफ टेम्पल्स’ असे म्हटले जाते. हे ठिकाण तंजावरपासून ३६ किलोमीटर अंतरावर आहे.

दारासुरमदारासुरम : कुंभकोणमजवळ असणारे हे गाव रेशीम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तसेच राजेंद्र चोला याने बांधलेले ऐरावतेश्वर मंदिरही बघण्यासारखे आहे. हे ठिकाण तंजावरपासून ३२ किलोमीटर अंतरावर आहे.

अतिरपट्टणम बंदर :
हे इस्लाम धर्माचे पवित्र ठिकाण असून, येथे अल्लाउद्दीनसाहेब दर्गा आहे. हे ठिकाण तंजावरपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे.

कसे जायचे?
तंजावरला जवळचा असलेला विमानतळ त्रिची येथे असून, त्याचे तंजावरपासूनचे अंतर ५८ किलोमीटर आहे. तंजावर हे रेल्वेने चेन्नई व मदुराई या ठिकाणांना जोडलेले आहे. तसेच, तमिळनाडूतील प्रमुख शहरांनाही तंजावर रस्त्याने जोडलेले आहे. या शहरात राहण्याची चांगली सोय होऊ शकते.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

कुंभकोणम

(तमिळनाडूमधील तंजावर तसेच काही आसपासच्या ठिकाणांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
MAK About 224 Days ago
अतिशय सुंदर माहीती, मराठ्यांनी दक्षिणेत झेंडा रोवला ही आपल्या साठी फार अभिमान स्पद गोष्ट आहे
0
0
Mrs Shilpa Soman About 276 Days ago
Video ani mahiti farach sundar.
0
0

Select Language
Share Link