पुणे : ‘आताच्या डिजिटल युगात सायबर हल्ल्यांमुळे कार्पोरेट क्षेत्राचे दरवर्षी अब्जावधींचे नुकसान होत आहे. हे सायबर हल्ले थोपविण्यासाठी चांगले काम करणाऱ्या एथिकल हॅकर्सची गरज उद्योग क्षेत्राला भासत आहे. अजूनही ७८ टक्के आस्थापना आणि उद्योगांकडे सायबर हल्ल्याविरुद्ध करण्याच्या उपाययोजनासाठी नियोजन तयार नाही. त्यामुळे इथिकल हॅकर्सना इथून पुढे मोठी मागणी असणार आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी केले.
भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगतर्फे ‘एथिकल हॅकिंग आणि सुरक्षितता’ याविषयावर तीन ते पाच डिसेंबर २०१८ या कालावधीत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. भारती विद्यापीठाच्या कात्रज कॅंपसमध्ये झालेल्या या चर्चासत्राचे उद्घाटन प्राचार्य डॉ. भालेराव यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. संदीप वांजळे यांनी स्वागत केले. पाच विद्यापीठांतील २१ इन्स्टिट्यूटचे ३८ प्राध्यापक, संशोधक या चर्चासत्रात सहभागी झाले. एकूण सहा प्रशिक्षण सत्रांमध्ये सायबर हल्ले आणि ‘एथिकल हॅकिंग’विषयी सर्वंकष माहिती देण्यात आली.

डॉ. भालेराव म्हणाले, ‘६५ हजार प्रशिक्षित हॅकर्स या क्षेत्रात कमी आहेत. आताच्या डिजिटल युगात सायबर हल्ल्यांमुळे कार्पोरेट क्षेत्राचे दरवर्षी अब्जावधींचे नुकसान होत आहे. हे सायबर हल्ले थोपविण्यासाठी चांगले काम करणाऱ्या एथिकल हॅकर्सची गरज उद्योग क्षेत्राला भासत आहे. अजूनही ७८ टक्के आस्थापना आणि उद्योगांकडे सायबर हल्ल्याविरुद्ध करण्याच्या उपाययोजनासाठी नियोजन तयार नाही. त्यामुळे इथिकल हॅकर्स इथून पुढे मोठी मागणी असणार आहे. उद्योग जगात सायबर हल्ल्याबद्दलचे प्रशिक्षण, उपाययोजनांसाठी मोठी गुंतवणूक करण्याच्या मनःस्थितीत आहे.’
‘नॅसकॉम’च्या अभ्यासानुसार भारतात ८० हजार एथिकल हॅकर्सची आवश्यकता भासणार आहे; मात्र आज केवळ १५ हजार प्रशिक्षित हॅकर्स उपलब्ध आहेत. या धोक्याविषयी जागृती घडवून आणण्याच्या हेतूने या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते.
‘एथिकल हॅकिंग’ क्षेत्रातील तज्ज्ञांनी सायबर हल्ले परतवून लावण्याच्या उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन केले.