Next
मुंबईचा ठग : दी बॉम्बे ब्युकनर
BOI
Thursday, August 09, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘दी बॉम्बे ब्युकनर’एखाद्या समकालीन चित्रकाराच्या प्रगतीचा आलेख पहायचा झाल्यास अतुल डोडियांच्या चित्रांचे उदाहरण यथोचित ठरावे. नव्या पिढीसाठी अतुल डोडियांनी नवे पायंडे निर्माण केले आहेत. जुन्या प्रतिमा घेऊन त्यांना नव्या स्वरूपात दाखवतात आणि सराईत ठगाप्रमाणे त्या प्रतिमा चक्क नव्याच दिसतात. या अर्थाने ते चित्रकलेतील मुंबईचे ठग ठरावेत. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज अतुल डोडिया यांच्या एका चित्राचा आस्वाद...
.........
साधारणतः १९९४-९५पर्यंत मुंबईमध्ये खासगी कलादालने अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगीच होती. त्यात पंडोल कुटुंबातील काली पंडोल यांची फाउंटनच्या भागातील पंडोल आर्ट गॅलरी, केकू गांधी यांचे ‘केमोल्ड’ आणि पेडर रोडला नव्याने सुरू झालेली साक्षी गॅलरी अशी काही महत्त्वाची दालने होती. या कलादालनांमध्ये तेव्हा काही नवे प्रयोग पाहायला मिळत.

मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीच्याच वरच्या मजल्यावर आज जेथे पिरॅमल गॅलरी आहे तेथे केमोल्ड गॅलरी होती. त्यामध्ये १९९५ साली अतुल डोडियांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण शोमध्ये वैविध्यपूर्ण चित्रे होती. त्यातील बहुतेक सगळी आपण सामान्य भाषेत देखावा किंवा हुबेहूब म्हणतो त्या स्वरूपातील शैलीत काढलेली होती. अर्थातच हे प्रयोग होते. या प्रदर्शनातील अनेक चित्रांपैकी मला लक्षात राहिलेले अतुलचे चित्र म्हणजे ‘डॉन.’ हे चित्र लक्षात राहण्याची अनेक कारणे. पहिले म्हणजे त्यातील कलात्मक हिरोगिरी मला भावली. साहस आकर्षक वाटले आणि मुख्य म्हणजे प्रतिमा मजेशीर होती. चित्राचे नाव ‘दी बॉम्बे ब्युकनर’ (आपण ठग/चाचा म्हणू या). ही प्रतिमा अतुल डोडिया यांच्या चित्रप्रवासाला आणि समकालीन भारतीय कलेला वेगळा आयाम देणारी ठरली.

हे चित्र वास्तववादी आहे. त्याला ‘फोटो रिअॅलिझम’ असे म्हणतात. अतुल संपूर्ण चित्रात अवकाश व्यापून राहिले आहेत. एका अर्थाने हे त्यांच्या काळाचे आणि शहराचे प्रातिनिधिक चित्र आहे. नव्या स्वरूपातील समकालीन किंवा आपण सर्वसाधारणपणे ‘मॉडर्न’ म्हणतो तशा स्वरूपातील चित्रांमध्ये हे चित्र पाहायला एकदम सोपे आहे; पण पाहत गेले, की त्यातील खोली लक्षात येत जाते. विशेषतः प्रतिमांची निवड आणि त्याच्या चित्रांतील जागा इंटरेस्टिंग आहेत. हे चित्र अतुल यांचे आत्मचित्र आहे. आता थोडे चित्रवाचन करू या.

एकूण चित्र पाहताक्षणीच आठवतो तो हिंदी चित्रपटातील सुपरस्टार शाहरुख खान. ‘बाजीगर’मधल्या पोशाखातील नायक. शर्टाची बटणे सोडलेला आणि टाय सैलावलेला नायक. अतुल यांनी या नायकाच्या अवतारात स्वतःला चितारलंय. अतुल यांचा चष्मा आहे नंबरचा. तोच त्यांनी या चित्रात वापरलाय. नीट पाहिले, तर लक्षात येते, की चष्म्याच्या दोन्ही काचांमध्ये दोन स्वतंत्र व्यक्तिचित्रे आहेत. डाव्या काचेत ब्रिटिश चित्रकार डेव्हिड हॉकनी रेखाटला आहे. अतुल यांचा हा दूरस्थ गुरूच. अतुल यांच्या सुरुवातीच्या अनेक चित्रांत त्याचा प्रभाव दिसतोच आणि अतुलही ते खुल्या दिलाने सांगतात. हा सांगण्याचा दृश्य प्रकार.... आपल्या आवडत्या चित्रकाराची प्रतिमा अतुल यांनी त्याच्या चष्म्यात डेव्हिड हॉकनीच्या शैलीतच रेखाटलीय.

डेव्हिड हॉकनी हा प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकार चित्रकलेबरोबरच त्याच्या चित्रात दिसणाऱ्या समलिंगी संबंधासाठी गाजलेला आणि चर्चिला गेला आहे. त्याच्या चित्रांतून ते प्रतीत होते. ब्रिटिश चित्रकलेच्या पॉपीलर आर्ट (Pop Art) प्रकारातील हॉकनी हा अग्रगण्य चित्रकार. हॉकनीची ‘पूल’ नावाच्या म्हणजे पोहण्याच्या तलावांच्या चित्रांची मालिका खूप गाजलेली होती. अतुल यांच्या चित्रात असे समलिंगी वगैरे काही संदर्भ नाहीत. परंतु दृश्य रूपात मात्र शैलीसह अनेक साम्यस्थळे अतुलच्या सुरुवातीच्या चित्रांमध्ये दिसतात. हे झाले चष्म्याच्या डाव्या काचेचे.

चष्म्याच्या उजव्या काचेत भारतीय चित्रकार भूपेन खक्कर यांचे आत्मचित्र रेखाटले आहे. ते भूपेनच्या शैलीत. भूपेन अतुल यांच्या आधीच्या पिढीतला चित्रकार. परंतु त्या दोघांची मैत्री होती. मजेशीर स्वभावामुळे दोघे बराच काळ सहवासात होते. भूपेन यांनीदेखील हॉकनीप्रमाणे बडोद्यात स्वतःच्या समलिंगी संबंधांबाबत जाहीर वाच्यता केली होती. भूपेन यांच्याही अनेक चित्रांत हा समलिंगी संबंध दिसून येतो. परंतु एका अर्थाने अतुल यांनी भूपेन यांना चष्म्यात प्रतिमारूपात स्थान देऊन आपले भारतीय पॉप दृश्याचे प्रेम दर्शवले आहे, असे मानायला येथे वाव आहे. कारण पुढे अनेक वर्षे अतुल यांनी भारतीय संस्कृती व समाजातील लोकप्रिय प्रतिमा आपल्या चित्रांत रेखाटल्या आहेत. हे झाले चष्म्यात प्रतिबिंबित होणाऱ्या प्रतिकाल प्रतिबिंबाबाबत.

अतुल यांनी आपल्या उजव्या हातात पिस्तूल धरले आहे. त्यांनी पिस्तुलाच्या चापावर बोट ठेवले आहे. हातात मनगटावर घड्याळ आहे. चौकड्यांचा शर्ट परिधान केलेला आहे. हाताच्या बरोबर डाव्या बाजूला पोहण्याच्या स्थितीतील एक पुरुष व्यक्ती आहे आणि त्याची सावली पोहण्याच्या तलावात पडते तशी जमिनीवर पडलेली आहे. चित्राच्या तळाकडील भागातला गडद पॅच त्या पोहणाऱ्या व्यक्तीमुळे पाण्याचा भास निर्माण करतो. हे चित्र नव्याने चित्रे पाहू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी चित्र पाहण्याचा उत्तम धडा ठरावा. यात अनेक प्रतीके आणि प्रतिकात्मकता आहे. थट्टा-विनोद आहे. या चित्रात पार्श्वभूमीला मुंबईचा समुद्र आहे, मरीन ड्राइव्हचा... पावसाळ्यात समुद्राचे पाणी उडवणाऱ्या लाटा वाटाव्यात असे दृश्य. सूर्यास्ताच्या देखाव्यात असावेत तसे तांबूस रंग आकाशात पसरलेत. मरीन ड्राइव्हचा रस्ता ओलांडताना एक अपंग व्यक्ती.

अतुल डोडियाअतुल यांचे हे चित्र तेव्हाच्या भारतीय समकालीन दृश्यकलेत वेगळे होते. काहींना ते खूप भुरळ घालून गेले, तर काहींनी तेव्हा तरी त्याची चेष्टा केली होती. अर्थातच आता ते गप्प आहेत. अतुल तेव्हा नुकतेच फ्रान्सला जाऊन आले होते. त्यांच्या चित्रात प्रतिमांची गुंफण होती. नियम मोडण्याचे धाडस होते. आणि जगातील महत्त्वपूर्ण कलाकृती प्रत्यक्ष पाहिल्याने, अभ्यासल्याने आलेली कलात्मक समजही होती. त्या प्रदर्शनातील इतर चित्रांपेक्षा या चित्राने माझ्यावर जादू केली. मला अतुल यांची इतरही प्रदर्शने सातत्याने पाहता आली. ते नवनवीन प्रयोगांसह दर्शकांसमोर येत राहिले आहेत. अतुल स्वतःच्या चित्रकामाविषयी अगदी मोकळेपणाने बोलतात. एखाद्या समकालीन चित्रकाराच्या प्रगतीचा आलेख पहायचा झाल्यास अतुल डोडियांच्या चित्रांचे उदाहरण यथोचित ठरावे. नव्या पिढीसाठी अतुल डोडियांनी नवे पायंडे निर्माण केले आहेत. जुन्या प्रतिमा घेऊन त्यांना नव्या स्वरूपात दाखवतात आणि सराईत ठगाप्रमाणे त्या प्रतिमा चक्क नव्याच दिसतात. या अर्थाने ते चित्रकलेतील मुंबईचे ठग ठरावेत. 

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search