Next
‘प्रत्येक संधीचे सोने करण्याचा जिद्दीने प्रयत्न करा’
BOI
Tuesday, October 09, 2018 | 11:55 AM
15 0 0
Share this story

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे आयोजित ‘मी अधिकारी होणारच’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डाएट कॉलेजचे प्राचार्य सुशील शिवलकर. शेजारी मान्यवर.

रत्नागिरी : ‘प्रत्येक बी झाड होऊ शकते, पण प्रत्येक बीचे महाकाय झाड होतेच असे नाही. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून आयुष्यात वाटचाल केली, तर यश नक्कीच आपले असणार. ९२ टक्के मार्क मिळूनही नैराश्यापोटी आत्महत्या करण्यापेक्षा आयुष्यात पुढे येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचा प्रयत्न जिद्दीने करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन येथील डाएट कॉलेजचे प्राचार्य सुशील शिवलकर यांनी केले.

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे ‘मी अधिकारी होणारच’ या स्पर्धा परीक्षेसंदर्भात मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सात ऑक्टोबर २०१८ रोजी करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, राज्य उत्पादन शुल्क उप अधीक्षक संकेत देवळेकर, अधिव्याख्याता राहुल बर्वे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भंडारी समाज संघाचे जिल्हाध्यक्ष शरद बोरकर यांनी भूषविले.

डाएट कॉलेजचे प्राचार्य शिवलकर यांनी उपस्थित युवक–युवतींशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला आणि युवकांमधील नैराश्य दूर करण्यासाठी काही उदाहरणे व स्वानुभव कथन केले.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता रमेश कोरे म्हणाले, ‘दहावी झाल्यानंतर आपण स्पर्धा परीक्षेचा भाग होऊ शकतो. एकदा आपण याचा भाग झालो की आपोआप आपल्याला स्पर्धा परीक्षेचे जणू व्यसनच लागते. पाण्यात पडल्याशिवाय जसे पोहता येत नाही, तसेच कुणाच्या तरी सांगण्याने घाबरून स्पर्धा परीक्षेपासून लांब राहण्यापेक्षा त्याचा भाग होणे खूप गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी  परीक्षेत खूप मार्क्स हवेत, असेही नाही. फक्त सचोटीने व जिद्दीने अभ्यास करणे गरजेचे आहे.’

या वेळी कोरे यांनी उपस्थितांना स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमके काय, रत्नागिरीत राहून कोणतेही क्लास न लावता कशाप्रकारे आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करता येते, त्यासाठी कशाप्रकारे तयारी करायची, अभ्यासक्रम काय असतो, पुस्तके नसल्यास ऑनलाइन कशा प्रकारे ती उपलब्ध होतात आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे.पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी त्यांच्या वाटचालीतील अनुभव सांगतानाच एकदा आलेल्या अपयशाने थकून न जाता यश मिळवण्याची जिद्द प्रत्येकाने मनाशी बाळगणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

प्रास्ताविक करताना रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर म्हणाले, ‘भरकटलेली नाव किनारी लावण्यासाठी जशी कुशल नावाड्याची गरज असते, तसेच युवकांना आयुष्यात पुढील उज्ज्वल वाटचाल करण्यासाठी सुयोग्य व अनुभवी, कर्तृत्ववान व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज असते व ती संधी आज संघाने सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे. युवकांच्या मनातील स्पर्धा परीक्षेची भीती दूर करून भविष्यातील अधिकारी घडविणे हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे.’

कार्यक्रमाला उपस्थित नागरिक.

भंडारी समाज संघातर्फे शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी भंडारी युवा ब्रिगेड अध्यक्ष सुधीर भरडकर, मुंबई युवा संपर्क प्रमुख विनायक भाटकर, रत्नागिरी जिल्हा भंडारी महिला संपर्क प्रमुख प्रतिभा पाटील, उपाध्यक्षा विनया भाटकर, युवा अध्यक्ष परीस पाटील, उपाध्यक्ष कौस्तुभ नागवेकर, महिला मंडळ प्रभारी अध्यक्षा आदिती भाटकर, नगरसेविका अस्मिता चवंडे, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी अध्यक्ष प्रफुल्ल केळसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sunil Harichandra Shivalkar About 134 Days ago
Its true. Very exciting topic for these days need for youth generation...good
0
0

Select Language
Share Link