Next
..आणि आरा तिच्या पायावर उभी राहिली...
BOI
Friday, April 27, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


१०वी पास मुलगी आता कमावती होणार होती. तिच्या वर्गमैत्रिणी, ‘आम्हालाही हे शिकवा’, म्हणून मागे लागल्या होत्या. आराबाबापण खुश होते. माझ्या एका जबाबदारीतून मी मोकळा झालो होतो... ईशान्य भारतात कार्य केलेल्या एका स्वच्छंदी कार्यकर्त्याचे अनुभव कथन करणाऱ्या ‘ईशान्यवाटेचा वारकरी’या लेखमालिकेचा हा सहावा भाग...
....................................
छात्रावास व शाळेतील मुलांना शिकवताना, पुढे शिकून तुम्ही काय होणार, असे मी विचारत असे. त्यावर इंजिनियर, डॉक्टर, वकील, शिक्षक अशी उत्तरे मिळायची. मग मी सांगायचो, की असे व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. चांगले शिक्षण घेण्यासाठी खूप मार्क मिळवावे लागतात. खूप अभ्यास व मेहनत करावी लागते. आहे का तुमची एवढी तयारी..?  इथे मी पाहतो, की तास-दोन तास अभ्यास केल्यावर आपल्याला खूप अभ्यास केला असे वाटते. तुम्हाला ५० टक्के मार्क मिळाले, की खूप आनंद होतो; पण उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या कॉलेजात प्रवेश मिळवण्यासाठी किमान ९० टक्के मार्क मिळवावे लागतात. व यासाठी शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त आणखी अभ्यास करावा लागतो. तसेच हाफलांग सोडून गुवाहटी, सिलचर यांसारख्या ठिकाणी जाऊन राहावे लागते. आहे का तुमची तयारी..? असे मी विचारत असे. यावर, ‘मामाजी, हमारा भाईबाबा नाही भेजना है..’, असे ती म्हणायची. तुम्हारी अगर इच्छा है, तो हिंदू परिषद तुम्हारी मदत करेगा, असे सांगितल्यावर, ठीक है, कोशिश करेंगे, असे ती मुले म्हणायची. 

मुली म्हणायच्या, ‘मामा, शहर का लडकी बहुत होशियार होते है. इसलिए ज्यादा मार्क लेते है. हम लोग इतना होशियार नाही है..’, यावर मी त्यांची समजूत काढत असे. ‘होशियारीमें तुम सभी शहर की लडकियोंसे कम नही हो.. उन्हे पढाई की सुविधा और मार्गदर्शन मिलता है और वह मेहनत करती है,  इसलिये उन्हे ज्यादा मार्क मिलते है. अगर तुम लडकियोंमें से कोई पुणे आने के लिये तैयार है, तो मै दिखा दुंगा.. और तुम खुद समझोगे, की शहरकी लडकीयोंसे तुम कम नही हो...’ त्यांच्यात चुळबुळ सुरू झाली. ‘हम भाईबाबा को पुछकर बताएंगे’, असे त्या म्हणाल्या. काही दिवसांनी फक्त आशा (केहुरले) व रेदुलीच्या आई वडिलांनी त्यांना माझ्याबरोबर पुण्याला पाठवण्याचे कबूल केले. मी माझ्या खर्चानेच त्या दोघींना विमानाने पुण्याला आणायचे ठरवले. 

खरे तर त्या मुलींना पुण्याला पाठवायला खूप जणांनी विरोध केला. त्यांच्या एका शिक्षिकेने त्यांना सांगितले, ‘मामा के साथ मत जाओ. वह तुम्हे पुनेमे बेच देगा.’ या एका घटनेवरून येथील पालक आपल्या मुलांना बाहेरगावी पाठवायला का तयार नाहीत, यामागची मानसिकता समजली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना परत आणणार होतो. गुवाहाटीला आल्यावर विश्व हिंदू परिषदेच्या महिला निवासात त्यांची राहण्याची सोय केली. मी व प्रेमा मुलाकडे राहिलो. दुसऱ्या दिवशी नऊ वाजता विमानतळावर आलो. एवढी मोठी विमाने पाहून त्या मुली हरखून गेल्या. ‘मामा, हम गिरेंगे नाही ना..!’, म्हणून विचारले. मी म्हणालो, ‘यह सब लोग यहा गिरनेके लिये आये है क्या.?’ विमान प्रवासाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

पुण्यात माझ्या घरी त्या हळूहळू रुळायला लागल्या होत्या. शहरी वातावरणात फार बिचकून राहत होत्या. त्यांच्या समवयस्क मुलामुलींची त्यांच्याशी गाठ घालून द्यायची होती. पुण्यातील जोतीर्विद्या संस्थेत ओझर येथील खगोलशास्त्रीय दुर्बिणी दाखवण्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला या दोघींना नेले. तिथे त्यांना त्यांच्या समवयस्क मुलामुलींमध्ये सोडले. चीनी चेहऱ्याच्या मुली पाहून त्यांनाही कुतुहूल वाटले. पण लवकरच त्यात सगळे समरस झाले. आता या मुलींची पण भीड बरीच चेपली होती. माझी मुलगी रूपा आणि नात आयुषी यांच्याबरोबर त्या दोघींची छान गट्टी जमली होती. योगायोगाने याच सुमारास पुण्यातील विश्व हिंदू परिषदेच्या जनकल्याण समितीने येथील ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांसाठी माणगाव सिंधुदुर्ग व गोव्याची सहल आयोजित केली होती. जनकल्याण समितीच्या पूनमताई मेहता यांनी या दोघींनाही त्यात नेण्याची परवानगी दिली. 

मालवणला या दोघींनी सर्वप्रथम समुद्राचे पाणी खारट असते, हे चाखून पाहिले. अथांग समुद्राचे पाणी पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या. गोव्यातील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहिली. पॅराग्लायडिंग केले व समुद्रपाण्यात भरपूर केलले. पुण्याला घरी सत्यनारायण पूजा त्याच्या हस्ते केली. आपले सणवार, रीतीरिवाज समजावून दिले. माझ्या मित्रमंडळीच्या ग्रुपला घरी बोलावून त्यांची ओळख करून दिली. त्यांनी मुलीना भेटवस्तू दिल्या. एकूण त्या दोघी पुणे ट्रीप छान एन्जॉय करत होत्या. त्यांच्या वागणुकीतही बदल जाणवत होता. त्यांचा आत्मविश्वास जागृत होत होता. मी विचारले, ‘अब भी तुम्हे ऐसे लगता है, की तुम यहाँकी लडकियोंसे कम होशियार हो..?’  तर म्हणाल्या, ‘वही मामा, ऐसा वातावरण मिला, तब हम भी और अच्छे बन सकेंगे. मामा, हमे आपके पास रखो. हम हाफलांग नाही जाना चाहते.’ मी हसून म्हणालो, ‘नाही नाही.. तुम्हे जाना होगा. नाही तो, वहा के लोग समझेंगे, मैने तुम्हे यहा बेच दिया है.’ मग कलकत्तामार्गे त्यांना परत हाफलांगला घेऊन गेलो. 

मॅट्रिकचा रिझल्ट लागला. त्या दोघीही सेकंड क्लासमध्ये पास झाल्या. माझा जीव भांड्यात पडला. आता पुढे ११वीसाठी प्रवेश घेणार होते. मी सांगितले, ‘असे करू नका. कारण चार वर्षांनी ग्रॅज्यूएट झालात, तरी नोकरी मिळणार नाही. तुमच्याआधी कितीतरी ग्रॅज्यूएट होऊनही अजूनही बेकार आहेत. गावात मोलमजुरीची कामे करीत आहेत. त्यापेक्षा तुम्ही आयटीआय किंवा पॉलिटेक्निकला प्रवेश घ्या. त्या अभ्यासक्रमाने तुम्हांला जरूर नोकरी मिळेल. जमल्यास पुण्याला या, तिथे बरेच व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. ते करा, म्हणजे लगेच नोकरी मिळेल. मी तुमचा सगळा खर्च करेन.’ 

येथील लोकांची मानसिकता विचित्र आहे. मुलगा जर ग्रॅज्यूएट झाला तर त्याला आदिवासी कोट्यातून लगेच सरकारी नोकरी मिळेल. मुलगी कितीही हुशार असली, तरी तिला पुढे न शिकविता तिचे लग्न लाऊन दिले जाते. एकदा लग्न झाले, की दरवर्षी एक याप्रमाणे १० वर्ष मुलांना जन्म घालण्याचा कारखाना सुरू. कारण मूल म्हणजे देवाची देणगी हाच इथलाही समज. लग्न झाल्यावर मुलगा वेगळे घर करतो, मग राहिलेल्या सर्व लहान भावंडांच्या पालन-पोषणाची जबाबदारी वडिलांवर येते. वर तुटपुंजे उत्पन्न व खाणारी भरमसाट मुले. मग चिडचिड रागराग हे प्रकार होतात. आरला पण दोन भाऊ व चार बहिणी. मोठा भाऊ लग्न होऊन वेगळा झाला. गमतीची गोष्ट म्हणजे त्याला मूल झाल्यावर त्यांचे लग्न लाऊन दिले. दुसरा सिल्चारला कॉलेजमध्ये शिकत होता. तिच्यापेक्षा मोठ्या बहिणीचे लग्न झालेले व तिला चार मुली. उरलेल्या दोन धाकट्या बहिणी शिकत आहेत. वडिलांची गावी थोडी शेती, जी तिची आई करते. अराबाबा येथील डिस्ट्रीक्ट कौन्सिलमध्ये माळी म्हणून आहेत; पण त्यांना १०-१० महिने पगार मिळत नाही. मग पडेल ते काम करून घर कसेबसे चालवायचे. यात मुलींच्या शिक्षणाचे भवितव्य काय असणार, शून्य. 

आरा हुशार आहे. म्हणून तिच्या वडिलांना मी सर्व पटवून दिले, की मी पुण्यात तिचे चांगले शिक्षण करून तिला तिच्या पायावर उभे करीन. आरापन पुण्याला जाण्यासाठी अडून बसली. मग अराबाबानी तिला नेण्याची परवानगी दिली. रेहुलने मात्र हाफलांगलाच पुढे शिकायचे ठरविले. म्हणून आरला घेऊन मी परत पुण्याला आलो. आराला कोणता कोर्स द्यावा, यासंदर्भात घरी मुलगी रुपाबरोबर विचार विनिमय करीत असे. माझ्याकडे आयुशीची एक बार्बी बाहुली पडली होती. तिच्या कपड्यांची पार वाट लागली होती. एके दिवशी आराने ती बाहुली घेतली व जवळपासच्या कपड्यांच्या तुकड्यांतून बाहुलीला सुंदर कपडे शिवले. शिवाय कपडे व्यवस्थित व मापात शिवले होते. हे पाहून रूपा खूप खुश झाली. मला म्हणाली, ‘बाबा हिला आपला ‘फॅशन डिझाईनिंग’चा कोर्स देऊ. तिला कपड्यांची चांगली समज आहे. आरालाही हा कोर्स आवडला. 

चिंचवडला फॅशन अकादमीची जाहिरात पहिली व त्याची चौकशी केली. एक वर्षाचा कोर्स होता. आराला मराठी येत नाही व कोर्स मराठीत होता. मग त्यांना विनंती केली, की आराला हिंदीत शिकवा. त्यांनी ते मान्य केले. सुरवातीला तिला चिंचवडला पोहोचायला व आणायला मी जात असे; पण नंतर ती एकटीच दापोडी ते चिंचवड लोकलने जाऊ लागली. हळूहळू वर्गातील इतर मुलींबरोबरही तिचे छान जमू लागले. चित्रकला व इतर प्रक्टिकल प्रोजेक्टमध्ये तिला ‘ए’ श्रेणी मिळत असे. तिचाही आत्मविश्वास वाढत होता. वार्षिक परीक्षेतही ती ‘ए’ श्रेणीत पास झाली. 

आरा आता आपल्या पायावर उभी राहण्यासाठी सक्षम झाली होती. हाफलांगला तिच्या घरी राहून शिवणकामाचा व्यवसाय व शिवणकाम क्लासेस सुरू करायचा सल्ला दिला. म्हणजे घरबसल्या तिला कमवता येईल व घरखर्चालाही हातभार लावता येईल. मी व आरा परत हाफलांगला आलो पुण्यातील काही हितचिंतकांनी तिला शिवाणयंत्रे घेऊन देण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली होती. हाफलांगलाही एक हितचिंतक किरण राजूरकर आल्या होत्या. त्यांनीही आर्थिक मदत देऊ केली. त्यातून आराला तीन शिवणयंत्रे, एक एम्ब्रॉयडरीचे मशीन व एक इंटरलॉकिंगचे मशीन घेऊन दिले. गिऱ्हाईकांचे कपडे ठीक राहावेत म्हणून स्टीलचे एक कपाट घेतले. माझ्या एका जबाबदारीतून मी मोकळा झालो होतो. १०वी पास मुलगी आता कमावती होणार होती. तिच्या वर्गमैत्रिणी आम्हालाही हे शिकवा, म्हणून मागे लागल्या होत्या. आराबाबापण खुश होते. आपण दिलेल्या पैशाचा खरोखरच योग्य विनियोग होत आहे हे पाहून किरण राजुकरही समाधानी होत्या. त्या परत मुंबईला गेल्या.

यावेळी माझ्या निदर्शनास असे आले, की येथे दिलेले सौर कंदील कसेही वापरले जात आहेत. काही तुटले होते. त्यांची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार होत नव्हते. ते कंदील मी दुरुस्त करून दिले. यांना हे कंदील फुकट मिळालेले होते, म्हणून त्यांना त्याची किंमत नव्हती असे दिसत होते. त्यामुळे यापुढे यांना काहीही मदत करायची असेल, तर त्याची थोडी तरी किमत त्यांच्याकडून घ्यावी. फुकट अजिबात द्यायचे नाही असे ठरवले... 
(क्रमशः)
- अरुण सरस्वते, दापोडी, पुणे
मोबाइल : ९४२३० ०२२१५ 

(आरा म्हणजेच मर्सी हिच्या एक दहावी पास मुलगी ते आजची सक्षम, स्वतःच्या पायावर उभी असलेली आत्मविश्वासू मुलगी या प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.)

(‘ईशान्यवाटेचा वारकरी’ ही लेखमालिका दर मंगळवारी आणि शुक्रवारी  ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/cej71c या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search