Next
वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या पुणेकरांना पोलीस देणार डिस्काउंट कुपन
‘आभार’ योजना जाहीर
BOI
Saturday, June 15, 2019 | 01:08 PM
15 0 0
Share this article:

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करून दंड केला जातो. आता वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या पुणेकरांना वाहतुकीच्या पोलिसांकडून डिस्काउंट कुपन दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना शहरातील विविध दुकानांमधील खरेदीवर कमीत कमी १०० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. 

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे नाव ‘आभार’ असे असून, त्याद्वारे वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व नागरिकांना आपोआपच कळेल आणि नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांना आहे. वाहतूक पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि उपायुक्त पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविली जात आहे. पुणे वाहतूक पोलिस शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत या योजनेची सविस्तर माहिती दिली. 

‘नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जातेच; पण पुण्यासारख्या शहरात नियम पाळणाऱ्या व्यक्तींची संख्याही मोठी आहे. त्यांचे कौतुक करण्यासाठी आम्ही ‘आभार’ ही योजना सुरू केली आहे. हेल्मेट वापरणाऱ्या, परवाना जवळ बाळगणाऱ्या नागरिकांसह ज्या व्यक्तीवर वाहतुकीचा कोणत्याही प्रकारचा नियमभंग केल्याचे ई-चलन नसेल, अशा व्यक्तींना पुणे वाहतूक पोलिसांतर्फे अॅपद्वारे एक एसएमएस दिला जाणार आहे. त्यात एक कुपन कोड असेल. तो कुपन कोड शहरातील १००हून अधिक दुकानांमध्ये चालणार आहे. त्यात हॉटेल्स, कापड दुकाने, ज्वेलरी यांपासून शूजपर्यंत विविध प्रकारच्या दुकानांचा समावेश आहे. तेथे खरेदी केल्यावर किमान १०० रुपयांचा डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे. काही ठिकाणी खरेदी रकमेच्या १० ते १५ टक्के इतकाही डिस्काउंट दिला जाणार आहे. अॅपआधारित योजना असल्याने किती लोकांनी याचा लाभ घेतला, याची आकडेवारी आम्हाला दर दिवशी मिळणार आहे,’ असे पंकज देशमुख यांनी सांगितले. 

‘या योजनेत सहभागी होण्यासाठी आम्ही दुकाने/आस्थापनांना आवाहन केले होते. १००हून अधिक दुकाने यात सहभागी झाली असून, आणखीही काही जण यात येण्यास उत्सुक आहेत,’ असेही त्यांनी सांगितले. 

‘झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे, पादचाऱ्यांना रस्ता न देणे, फुटपाथवरून गाड्या चालविणे, चुकीच्या दिशेने गाड्या चालविणे, सिग्नल न पाळणे, लेन कटिंग अशा प्रकारे वाहतुकीचे नियमभंग पुण्यात होताना दिसतात,’ असेही देशमुख यांनी नमूद केले. 

नियमांचे पालन करणाऱ्यांचे कौतुक केल्यावर नियमभंग करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल आणि अधिकाधिक नागरिक नियम पाळू लागतील, अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांना आहे. 

(वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिलेली या योजनेची माहिती पाहा सोबतच्या व्हिडिओत.. )

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search