Next
पुण्याच्या संदीप सिन्हांनी काढले जगातील सर्वांत मोठे तैलचित्र
४८.७८ चौरस मीटर आकाराचे तैलचित्राची गिनीज बुकमध्ये नोंद
BOI
Tuesday, May 07, 2019 | 11:58 AM
15 0 0
Share this article:

संदीप सिन्हा आपल्या विक्रमी तैलचित्रासह

पुणे : पुण्यातील चित्रकार संदीप सिन्हा यांनी काढलेल्या हिमालयाच्या चित्राची जगातील सर्वांत मोठे व्यावसायिक तैलचित्र म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (जीडब्ल्यूआर) नोंद झाली आहे. त्यांनी ४८.७८ चौरस मीटर आकाराचे चित्र रेखाटून आधी अमेरिकेच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे. त्यामुळे पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 


याबाबत बोलताना संदीप सिन्हा म्हणाले, ‘एकाच चित्रकाराने रेखाटलेल्या जगातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक तैलचित्रासाठी विजेता म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने भारताच्या नावाची घोषणा केली, तो माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता. हा विक्रम यापूर्वी २२.४६ चौरस मीटर आकाराच्या चित्रासाठी अमेरिकेच्या नावावर जवळपास चार वर्षे होता. मी ४८.७८ चौरस मीटर आकाराचे चित्र काढून तो विक्रम मोडला आहे.’


संदीप यांनी आपले हे चित्र ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलांना समर्पित केले आहे. ‘हिमालय हा सर्व आव्हानांना तोंड देऊन खंबीर उभा असतो, तशाच या महिलाही निर्धाराने जीवनात उभ्या आहेत. या चित्राचे शीर्षक ‘हिमाखन’ आहे. त्याचा अर्थ हिमालयासारखा खंबीर मनाचा आणि लोण्यासारखा (माखन) मृदू अंतःकरणाचा असा आहे. माखन हे माझ्या वडिलांचेही नाव असल्याने मी चित्राला ते शीर्षक दिले. हे तैलचित्र पूर्ण करायला मला अडीच महिने लागले. जागतिक विक्रमाच्या नियमांनुसार असे चित्र एकच देखावा रेखाटलेले (सिंगल सीन) असावे लागते. त्यामुळे मी निसर्गाची प्रतिकात्मकता आणि भव्यता रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने हिमालय पर्वतरांगा ही संकल्पना निवडली,’ असे संदीप सिन्हा यांनी स्पष्ट केले. 

‘माझ्या या यशात माझे कुटुंब, मित्र आणि हितचिंतकांचे मोलाचे योगदान आहे, असेही संदीप यांनी नमूद केले.


संदीप हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक असून, ते टेक महिंद्रा कंपनीत काम करतात. अमूर्त चित्रशैली ही त्यांची खासियत असून, याआधी त्यांनी २०१५मध्ये आपल्या लघुचित्रांद्वारे (मिनिएचर पेंटिंग्ज) एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याअंतर्गत त्यांनी ‘जीवन आणि जागतिक तापमानवाढ’ (लाइफ अँड ग्लोबल वॉर्मिंग) या संकल्पनेवर आधारित असलेली एक सेंटिमीटर लांबी-रुंदीच्या आकाराची ९४५ लघुचित्रे, १४ इंच बाय ११ इंच आकाराच्या कॅनव्हासवर साकारली होती. संदीप यांनी साकारलेले सर्वाधिक मोठे तैलचित्र गेल्या वर्षी २५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या ‘आवाहन - अवेकनिंग दी गॉडेस विदीन’ या चित्रप्रदर्शनात प्रथम प्रदर्शित करण्यात आले होते. 

(संदीप सिन्हा यांचे चित्र आणि त्यांचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search