Next
दिवाळीच्या आठवणी जागवणारी चित्रपटगीते
BOI
Sunday, November 04, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘सुनहरे गीत’ या सदरात दर वेळी आपण एखाद्या कलावंताबद्दलची माहिती घेऊन त्याच्या एखाद्या गीताचा आस्वाद घेतो. आजचा लेख मात्र वेगळा आहे. उद्यापासून दिवाळी सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सदरलेखक पद्माकर पाठकजी यांनी स्मरणरंजनपर लेख लिहिला आहे. त्यांच्या लहानपणी किंवा तरुणपणात दिवाळीच्या काळात रेडिओवर ऐकल्या जाणाऱ्या ‘सुनहऱ्या’ चित्रपटगीतांच्या आठवणी त्यांनी या लेखात जागवल्या आहेत. वाचकांनाही त्या आठवणींत रमण्यास मदत करतील... 
.......
पहाटेच्या साखरझोपेतून उठावेसे वाटत नसते. हवेतील थंडपणा उबदार अंथरुणाची साथ सोडू देत नाही. त्याच वेळी दूरवरून फटाक्यांचा माळेचा आवाज कानावर येतो. माझ्या वडिलांच्या आंघोळीवेळी मी फटाके उडवणार नाही का, असे प्रश्न विचारून आई मला जागे करत असते. आकाशकंदील त्या पहाटेच्या धुंद वातावरणात ‘आज दिवाळी आहे’ हे सांगत असतो. आईने दारात लावलेल्या पणत्या सुखद दृश्य पाहण्याचा आनंद देत असतात. तांब्याच्या मोठ्या बंबात जाळ पेटलेला असतो आणि तांब्याच्या घंगाळ्यात कढत पाणी माझी वाट बघत असते. 

फटाक्यांचा विशिष्ट वास मिसळलेला स्पेशल उदबत्तीचा वास, अंगणातील शेणसड्याचा गंध अशा सगळ्याची भेळ-मिसळ झालेली असते. कानावर येणारा घंटेचा निनाद, आरतीचा आवाज, आईची व बहिणीची सूर्योदयाच्या आत करावयाच्या अभ्यंगस्नानाची लगबग, या साऱ्या गोष्टी सांगत असतात... आज दिवाळी आहे. 

पन्नास वर्षांपूर्वीची माझी ही दिवाळीची आठवण एवढ्यावर संपत नाही. मी चित्रपटप्रेमी म्हणून घडलो, त्यात दिवाळीचाही सहभाग होता. सकाळी सकाळी लवकर आवरून सात वाजता ‘नॅशनल एको’च्या रेडिओवरून कानावर शब्द यायचे! रेडिओ सिलोन इमानेइतबारे सेवा बजावत असायचे! 

सकाळी सात वाजता ‘एकही फिल्मसे संगीत’ कार्यक्रमात ‘नजराना’ची गीते ऐकवली जायची! दिवाळीची दखल तेही घ्यायचे आणि लता मंगेशकर मधुर आवाजात गायच्या...  ‘मेले है चिरागों के रंगीन दिवाली है...’ आम्हा बहीण-भावांची चित्रपटगीतांची दिवाळी अशी सुरू होत असे! साडेसात वाजता ‘पुरानी फिल्मोंका संगीत’ हा कार्यक्रम सुरू होत असे आणि आमच्या रेडिओ चालूच राहत असे! आई-वडिलांची त्याला आडकाठी नसायची. त्याला कारणे दोन होती. एक म्हणजे पहाटे साडेपाच वाजल्यापासून पुणे आकाशवाणीवरून सनई, भक्तिगीते, कीर्तन असे कार्यक्रम ऐकवले जात असत आणि त्या भक्तिमय श्रवणाच्या दीड तासानंतर आम्हाला ‘सिलोन’ लावायला परवानगी मिळायची! 

साडेसातचे ‘पुरानी फिल्मों का संगीत’ ऐकण्यात अडथळा नसण्याचे दुसरे कारण म्हणजे दिवाळीच्या दिवशी आई-वडिलांच्या जमान्यातील जोहराबाई अंबालावाली १९४४च्या ‘रतन’मधील गाणे गायची.... ‘आयी दिवाली, आयी दिवाली...!’ आणि मग हे गाणे ऐकता ऐकता वडील १९४३च्या ‘किस्मत’ची आठवण सांगायचे! अशोककुमार त्यांच्या पिढीचा आवडता हिरो होता ना! त्याच्या ‘किस्मत’ चित्रपटाने तीन वर्षे एका चित्रपटगृहात मुक्काम ठोकण्याचा विक्रम केला होता. त्या चित्रपटाची नायिका मुमताज शांती दिवाळीचा उल्लेख करून पडद्यावर गाणे गाते. अमीरबाई कर्नाटकींच्या स्वरातील ते गीत म्हणजे ‘घर घर में दिवाली है, मेरे घर में अंधेरा...’ ते दुःखी आशयाचे गीत होते. मी भारावून जाऊन ‘किस्मत’च्या त्या हकीकती ऐकायचो! 

तलत मेहमूदचे गाणे कधी लागते, याची उत्सुकता माझ्या मोठ्या बहिणीला असायची. ते गीत लागण्याआधी १९५१ च्या ‘स्टेज’ चित्रपटातील ‘जगमगाती दिवाली की रात आ गयी’ हे आशा भोसलेंच्या आवाजातील गाणे, तसेच ‘कंचन’ चित्रपटातील सुरैयाच्या आवाजातील ‘दिवाली की रात पिया घर आनेवाले है...’ हे गीत, त्याचप्रमाणे १९५६च्या ‘ताज’ चित्रटातील ‘जहाँ में आयी दिवाली’ अशी अशी दिवाळीचा उल्लेख असलेली गाणी लागून जायची. आम्हाला ती फार फार आवडत असत, असे नाही; पण आम्ही ‘चित्रपट संगीत’ या प्रेमापोटी ते ऐकायचो. आणि मग ते माझ्या मोठ्या बहिणीच्या आवडीचे (व ओघानेच माझ्या आवडीचे) ‘दिवाली की रात’ या चित्रपटातील तलतचे गाणे लागायचे. ‘ये खुशी का समा... जिंदगी है जवाँ...’ असे त्या गीताचे शब्द आहेत. वास्तविक पाहता त्यामध्ये दिवाळीचा उल्लेख नाही. ते गीत ज्या चित्रपटात आहे, त्याच्या नावात दिवाळीचा उल्लेख आहे. तरीही ते गीत आम्हाला आवडायचे. कारण अनेक दर्दभरी गाणी गाणारा तलत येथे चक्क आनंदाचे गीत गात असायचा! आणि दिवाळीच्या आनंदी वातावरणात ‘ये खुशी का समा...’ हे शब्द व त्या गीताच्या संगीतातील वाद्यमेळ किती सुयोग्य ठरतो, नाही का? अर्थात त्यासाठी ते गीत एकदा तरी ऐकायला हवे! 

‘घर घर में दिवाली’ (१९५५) ‘दिवाली की रात’ (१९५६) या नावाचे चित्रपट निघाले होते, ही माहिती मोठ्या बहिणीकडून त्या वयात ऐकताना मला अप्रूप वाटायचे! मग त्यात दिवाळीचे एखादे गाणे असेल ना, या माझ्या प्रश्नावर मला ‘दीप जले घर में आयी दिवाली...’ हे लता मंगेशकर व शमिंदर यांनी गायलेले गीत, अगर ‘अहाहा दिवाली दिवाली...’ हे आशा भोसले यांनी गायलेले आणि स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेले गीत, अशा काही गीतांची माहिती दिली जात असे; पण ही गाणी कधी ऐकल्याचे मला आठवत नाही. 

‘पुरानी फिल्मों का संगीत’ या रेडिओच्या कार्यक्रमाची सांगता सैगल यांच्या गीताने होत असते. दिवाळीचे वातावरण बघून दिवाळीचा उल्लेख नसला, तरी ‘दिवा प्रज्ज्वलित करा’ असा संदेश देणाऱ्या, तानसेन चित्रपटाकरिता सैगल यांनी गायलेल्या ‘जगमग जगमग दिया जलाओ...’ या गीताने आठ वाजता कार्यक्रमाची सांगता होत असे आणि आमच्यापुढील फराळाचीही! 

अशी गाणी ऐकत ऐकत बालपण भुर्रकन उडून गेले. आम्ही तारुण्यात पदार्पण केले. पाणी तापवायचा बंब मोडीत निघाला. गॅसवर पाणी तापवले जाऊ लागले. कपड्यांमध्ये नवीन फॅशन आल्या! या सगळ्या बदलांबरोबर चित्रपटगीतांवरचे प्रेम वाढतच गेले. आज ‘सैगल लागला का’ असे विचारायला वडील नाहीत; पण मी निष्ठेने ‘पुरानी फिल्मों का संगीत’ ऐकतो. वडिलांची आठवण ताजी होते. 

नव्या काळानुसार बदललेल्या चित्रपटांनीही दिवाळीची काही गाणी दिली. १९७०मधील ‘जुगनू’ चित्रपटात धर्मेंद्र ‘छोटे छोटे नन्हे मुन्हे...’ हे गाणे गात दिवाळीचा आनंद लुटताना पडद्यावर पाहिला. ‘कैसे मनाए दिवाली हम लाला...’ हे १९५९च्या ‘पैगाम’मधील गीत माझ्या नजरेस आणून देण्याचे काम माझा मित्र मुकुंद ढवळेने केले. त्या वेळी त्याला मी ‘हरियाली और रास्ता’ चित्रपटातील शंकर-जयकिशनच्या संगीताचा चमत्कार सांगण्यासाठी दिवाळीचा उल्लेख असलेले ‘लाखो तारे आसमान में...’ हे गीत सांगितले. अशी माहितीची देवाणघेवाण दिवाळीच्या फराळाच्या वेळी चालायची. 

१९७७! कॉलेजचे शेवटचे वर्ष - यापेक्षा ते वर्ष लक्षात राहते ते ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटामुळे! ‘दीपावली मनायी सुहानी’ हे गीत दिवाळीच्या गीतांत भर घालणारे गीत म्हणून याच वर्षात कानावर आले. ते ‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपटातील होते. पांडुरंग दीक्षित यांनी लिहिलेल्या आणि आशा भोसले यांनी गायलेल्या या गीतातून साईबाबांची महती जाणवते. म्हणजे दिवाळीच्या संदर्भातील हिंदी चित्रपटगीते भक्तिरसही देऊन जायची. 

चित्रपटगीते ऐकत दिवाळी साजरी केल्याच्या या आठवणींमध्ये ‘गाइड’ आणि ‘लीडर’ या चित्रपटांचाही उल्लेख आवर्जून केलाच पाहिजे. या चित्रपटांमध्ये दिवाळीच्या संदर्भातील स्वतंत्र गीते नव्हती. तथापि ‘गाइड’मधील ‘पिया तो से नैना लागे रे...’ आणि ‘लीडर’मधील ‘दैया रे दैया लाज मोहे आए...’ या गीतांच्या वेळी दिवाळीची आतषबाजी बघायला मिळाली, तेव्हा केवढा आनंद झाला होता!

दिवाळीची सुट्टी कधी ‘नवरंग’ बघून, तर कधी ‘धूल का फूल’ बघून साजरी केली. १९६४-६५च्या सुमारास तर दिवाळीत एका टॉकीजला ‘संगम’ व एका टॉकीजला ‘जब जब फूल खिले’ लागला होता. घरातून फक्त एक सिनेमा बघायला परवानगी होती. आता यातील कोणता चित्रपट बघायचा? दोन्हीकडे कपूरच होते. दोन्ही चित्रपट बघावेसे वाटत होते, अन एकाच बघायचा होता! केवढा गहन प्रश्न होता तो त्या वेळी!

दिवाळीच्या या अशा चित्रपटगीतांच्या व चित्रपटांच्या आठवणी मागे ठेवून काळ झपाट्याने पुढे गेला. दिवाळीचे जुने वातावरण संपले, नातेसंबंध बदलले, गाणी बदलली. आता दिवाळीवरचे नवीन गाणे ऐकायला मिळत नाही. दिवाळीच्या दृश्याचा आधार घेऊन खलनायक खून करताना दिसतो. (जंजीर) नाही म्हणायला मौसमी चॅटर्जी-विनोद मेहरा यांच्या ‘अनुराग’ चित्रपटातील ‘असली दिवाली ये नही है’ हे वाक्य आणि नकली दिवाळीचा हृद्य प्रसंग मन हेलावून सोडणारा होता, हे अजूनही आठवते. 

आता पुन्हा एकदा दिवाळी आहे. आठवणींच्या पणत्या उजळवून स्मृतींचा आनंद घ्यायचा! दिवाळी अंकातील चित्रपटविषयक लेखांमधून गतकाळ डोळ्यांपुढे उभा राहतो. मी त्यामुळे सुखावतो. ‘आता पूर्वीसारखे राहिले नाही,’ असे म्हणून मुलाच्या, सुनेच्या नातवंडांच्या आनंदात मिठाचा खडा टाकायचा नाही. ‘मेले है चिरागों के रंगीन दिवाली है’ ही ओळ ठीक असते, छान असते; पण पुढे ‘हसता हुआ गुलशन है, रोता हुआ माली है’ ही ओळ मनातच ठेवून सर्वांना हसऱ्या चेहऱ्याने सांगायचे... ‘शुभ दीपावली’... ‘हॅपी दिवाली’!!!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

(‘रंगीन दिवाली है’ या गीतावरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search