Next
आता रत्नागिरीतही लुटा स्कूबा डायव्हिंगचा आनंद
कोमल कुळकर्णी-कळंबटे
Thursday, December 21, 2017 | 06:41 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या कोकणातील रत्नागिरी हे एक निसर्गरम्य शहर. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना आता निसर्गसौंदर्यासोबतच समुद्रातील सौंदर्यही अगदी जवळून न्याहाळता येणार आहे. कारण रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या जाकीमिऱ्या-अलावा येथे १९ डिसेंबरपासून स्कूबा डायव्हिंगची सुविधा सुरू झाली आहे.

रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेले वर्षभर पाठपुरावा करून येथे स्कूबा डायव्हिंग सुरू करण्यात यश मिळविले आहे. अथांग पसरलेल्या सागराच्या पोटात नेमके काय दडले आहे, समुद्रातील जीवसृष्टी कशी असते, याचे कुतूहल आता रत्नागिरीतही शमवता येणार आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी मालवण तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) तारकर्ली या सुंदर समुद्रकिनारी स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग यांसारखे साहसी समुद्री खेळ सुरू झाले. त्याला पर्यटकांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे; मात्र रत्नागिरीत अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अशा खेळांचा थरार अनुभवण्यासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांना तारकर्लीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. ही बाब हेरून येथील कौस्तुभ सावंत यांनी रत्नागिरीत ही सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.

ते म्हणाले, ‘गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात माझ्यासह महेश शिंदे, सुहास ठाकूरदेसाई आणि कांचन आठल्ये असे आम्ही चौघे मुंबई येथे भरवण्यात आलेल्या टूर एक्झिबिशनला गेलो होतो. तिथे कोकणाची टूर चालवणारे कोणीही नव्हते, याचे वाईट वाटले. त्यामुळे रत्नागिरी हेच ‘डेस्टिनेशन’ व्हावे, असे ध्येय मनाशी बाळगून आम्ही चौघांनी हर्ष हॉलिडेज नावाने टूर कंपनी सुरू केली. पर्यटक येथे आले पाहिजेत आणि थांबले पाहिजेत यासाठी आम्ही रत्नागिरीच्या संस्कृतीची ओळख पर्यटकांना करून देणाऱ्या काही योजना आखल्या.’

कौस्तुभ सावंत‘गणेशोत्सवादरम्यान केरळ येथून काही पर्यटक आले होते. त्यांना येथील काही घरी नेऊन आरती, नैवेद्य, अन्न यांची माहिती दिली. या सहलीचा त्यांनी खूप आनंद लुटला; मात्र हे सर्व करत असताना अजूनही काहीतरी कमी आहे हे प्रकर्षाने जाणवत होते. काही अनुभवी सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर येथे समुद्र असूनही, संबंधित साहसी खेळांची सुविधा नसल्याने आलेले पर्यटक येथे थांबत नाहीत, ही बाब समोर आली. त्यातूनच हर्षा स्कूबा डायव्हिंग प्रकल्पाला सुरुवात झाली. त्यासाठी तारकर्ली येथील सारंग कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. स्कूबा डायव्हिंगसाठी नेमकी ठिकाणे शोधण्यासाठी गेल्या वर्षी दिवाळीच्या दिवशी आम्ही पहिली पाहणी केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आम्ही कुर्लीपासून ते गणपतीपुळे-तिवरी बंदरपर्यंत सर्व ठिकाणे तपासली आणि हवी तशी जागा जाकीमिऱ्या-अलावा येथे सापडली,’ असे सावंत यांनी सांगितले.

महेश शिंदे म्हणाले, ‘सध्या आमच्याकडे तारकर्ली येथून प्रशिक्षण घेतलेले आणि पॅडी संस्थेकडून ‘सर्टिफाइड’ असलेले सहा डायव्हर्स आहेत. प्रत्येक पर्यटकासोबत एक डायव्हर असतो. हे डायव्हर्स आपत्कालीन वैद्यकीय सेवाही देऊ शकतात.’

या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचे, जाकीमिऱ्या ग्रामपंचायतीचे विशेष प्रोत्साहन मिळाल्याचे सांगून, स्कूबा डायव्हिंगमुळे रत्नागिरीच्या पर्यटन विकासाला हातभार लागेल आणि जाकीमिऱ्या गावाचा विकास होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

रत्नागिरीत येणारे अनेक पर्यटक गणपतीपुळे, पावस ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे पाहून पुढे जातात; मात्र येथे थांबत नाहीत, असा अनुभव आहे. ती परिस्थिती सुधारण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले. त्यात आता या नव्या प्रयत्नाची भर पडली असून, त्याचा पर्यटनवाढीसाठी नक्कीच उपयोग होईल, अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link