Next
दिलीप माजगावकर यांना ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार
मसापतर्फे देण्यात येणाऱ्या इतर पुरस्कारांचीही घोषणा
BOI
Friday, May 17, 2019 | 03:36 PM
15 0 0
Share this article:

दिलीप माजगावकरपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे. याशिवाय मसापतर्फे देण्यात येणाऱ्या ‘मसाप कार्यकर्ता’, ‘उत्कृष्ट शाखा’, ‘विशेष ग्रंथकार’ अशा अन्य पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून २७ मे ला परिषदेच्या वर्धापनदिन समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

नोहा मस्सीलजीवनगौरव पुरस्काराबरोबरच वाङमयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ नोहा मस्सील (इस्राईल) यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या दोन्हीं पुरस्कारांचे स्वरूप आहे. २७ मे रोजी सायंकाळी सहा वाजता नवी पेठेतील निवारा सभागृह येथे परिषदेच्या ११३व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

‘महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी साहित्य विश्वाची श्रीमंती आपल्या कार्यातून वाढविणाऱ्या व्यक्तीस ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. लेखक, संपादक आणि प्रकाशक म्हणून दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल या पुरस्काराने दिलीप माजगावकर यांना सन्मानित करताना परिषदेला आनंद व समाधान वाटत आहे’, असे मत प्रा. जोशी यांनी व्यक्त केले. 

पुढे बोलताना प्रा. जोशी म्हणाले, ‘मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी इस्राईल येथील नोहा मस्सील गेली चाळीस वर्षे कार्यरत आहेत. सातासमुद्रापार असणाऱ्या मराठी कुटुंबात मराठी भाषा आणि संस्कृती टिकून राहावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथमच हा पुरस्कार भारताबाहेर दिला जात आहे.’ 

विशेष ग्रंथकार पुरस्कार 
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष ग्रंथकार पुरस्कार दिले जातात. या वर्षी हे पुरस्कार डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (केशवराव विचारे स्मृती पुरस्कार), आरती कदम (रा. अ. कुंभोजकर स्मृती पुरस्कार), डॉ. विजया वाड (ग. ह. पाटील पुरस्कार), किसन महाराज साखरे (डॉ. शं. दा. पेंडसे स्मृती पुरस्कार), दीपा भंडारे (कृष्णराव फुलंब्रीकर स्मृती पुरस्कार), मुकुंदराज कुलकर्णी (भा. रा. तांबे  पुरस्कार), जितेंद्र जोशी (ना. घ. देशपांडे पुरस्कार), मनीषा मंगल उज्जैनकर (प्रा. गो. रा. परांजपे स्मृती पुरस्कार), प्रा. डॉ. राजा दीक्षित (श्रीपाद जोशी पुरस्कार), यतिन माझिरे (कमलाकर सारंग पुरस्कार), छाया महाजन (कै. ज्योत्स्ना देवधर लेखिका पुरस्कार), सदा डुंबरे (आशा प्रभाकर संत पुरस्कार), राजीव तांबे आणि कविता मेहंदळे (कै. शांतादेवी आणि बाबुराव शिरोळे पुरस्कार), डॉ. विद्या सुर्वे-बोरसे (ताईसाहेब कदम पुरस्कार) यांना देण्यात येणार आहेत.


२६ मे रोजी सायंकाळी साडे पाच वाजता निवारा सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात सरस्वती सन्मानप्राप्त प्रसिद्ध गुजराती साहित्यिक सितांशु यशश्चंद्र यांच्या हस्ते आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

रावसाहेब पवारराबसाहेब पवार आणि नरेंद्र फिरोदिया यांना मसाप कार्यकर्ता पुरस्कार
परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी वर्धापनदिन समारंभात राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक देण्यात येतो. या करंडकाचे या वर्षीचे मानकरी आहेत ‘मसाप’ची मावळ शाखा (जिल्हा पुणे). राजन लाखे पुरस्कृत बाबुराव लाखे स्मृतिप्रीत्यर्थ वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसाप शाखा नाशिक रोड (नाशिक) यांना देण्यात येणार आहे. तसेच रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता पुरस्कार रावसाहेब पवार (मसाप शाखा सासवड ता. पुरंदर जिल्हा पुणे) आणि नरेंद्र फिरोदिया (सावेडी उपनगर शाखा अहमदनगर) यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

नरेंद्र फिरोदियाया पुरस्कारांचे वितरणदेखील २७ मे रोजी होणाऱ्या वर्धापनदिन समारंभात डॉ. रसाळ यांच्या हस्ते होणार आहे. तसेच परिषदेतर्फे दर वर्षी वर्धापन दिनाच्या निमित्ताने विशेष वार्षिक ग्रंथ पारितोषिकेही दिली जातात. डॉ. गणेश देवी, श्रीराम पवार, डॉ. नीलिमा गुंडी, न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉ. द. ता. भोसले, डॉ. अश्विनी धोंगडे, वर्षा गजेंद्रगडकर, रेखा बैजल यांना यंदाचे विशेष ग्रंथ पारितोषिक दिले जाणार आहे. अशी माहिती प्रा. जोशी यांनी दिली. या वेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे उपस्थित होते.

(पुरस्कारांची माहिती देताना प्रा. मिलिंद जोशी यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search