Next
अचानक...
BOI
Friday, November 16, 2018 | 05:44 PM
15 0 0
Share this story

५८व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीची सुरुवात १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी सात वाजता सादर झालेल्या ‘अचानक’ या नाटकाने झाली. योगेश सोमण यांनी लिहिलेलं हे नाटक गणेशगुळे इथल्या ‘अजिंक्यतारा थिएटर्स’नं रंगभूमीवर आणलं होतं. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेले या नाटकाचे हे परीक्षण...
...........
योगेश सोमण यांनी लिहिलेलं ‘अचानक’ हे नाटक गणेशगुळे इथल्या ‘अजिंक्यतारा थिएटर्स’नं रंगभूमीवर आणलं होतं. दशरथ रांगणकर दिग्दर्शित ‘अचानक’ ही राज आणि राधा या आंतरधर्मीय विवाह केलेल्या पती-पत्नीच्या जीवनातील एका अकल्पित प्रसंगाची कहाणी. परस्परांच्या धर्मकल्पनांचा मनःपूर्वक आदर राखत वीस-बावीस वर्षं संसार केलेल्या या जोडप्याला सरीन नावाची मुलगी आहे. एके दिवशी पवित्र महिन्याच्या पूर्वसंध्येला दोन अनोळखी पुरुष त्यांच्याकडे येतात, थेट मुक्काम ठोकतात. त्यातला अर्ध्या वयाचा मनुष्य राजला बऱ्याच वर्षांपूर्वीची कॉलेजमधली ओळख सांगतो. 

पदवी घेतल्यानंतर त्याचा एका मूलतत्त्ववादी विचारांच्या विद्यार्थी संघटनेशी संबंध आला होता. त्यानंतर तो कट्टर दहशतवादी बनतो. ते दोघे बघता बघता राजच्या घराचा ताबा घेतात. एवढंच नव्हे, तर शहरातल्या एका उदारमतवादी आणि धर्मसमन्वयवादी धर्मगुरूंची हत्या करण्याचं काम तो दहशतवादी राजवर सोपवतो. त्याच्यासोबत असणारा त्याचा भाचा सरीनला घरातच किडनॅप करून ठेवतो. 

बँकेत नोकरी करणारा सरळमार्गी राज दहशतवाद्याच्या दबावाला बळी पडून पिस्तुलाचा सराव करतो. टप्प्याटप्प्यानं पावणेसात लाख रुपयांच्या बनावट नोटा बँकेतून बदलून आणतो. एकीकडे अपराधीपणाची भावना राजच्या मनात व्यापून राहत असतानाच ‘दहशत तुमच्या दाराशी’ हे मिशन मानणारा तो दहशतवादी धर्मगुरूच्या हत्येसाठी राजला मनानं तयार करत असतो. 

दरम्यान, संसदेवर दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न फसल्याची बातमी येते. पाठोपाठ त्या दोन दहशतवाद्यांपैकी भाच्याचं छायाचित्र माध्यमांतून प्रसारित होतं. मोठा दहशतवादी एकाएकी थंड डोक्यानं अनपेक्षितपणे भाच्याला गोळी घालून ठार करतो. त्याचं प्रेत आतल्या खोलीत ठेवून राजच्या कुटुंबाला अशा वातावरणाची सवय लावण्याची धडपड करतो.

यातून सुटण्याच्या प्रयत्नात सरीनवर पिस्तुल रोखणाऱ्या दहशतवाद्याला अखेर राज गोळी घालतो. पापभीरू राजला आपल्या हातून खून झाल्याची जाणीव होते. आता धर्मगुरूला मारण्याचा प्रश्नच उरलेला नसतो. राजमधला विवेक जागा असतो. आपल्या हातून झालेल्या नोटाबदलाच्या आणि मनुष्यहत्येच्या अपराधांबद्दल न्यायासनासमोर हजर होण्यासाठी तो सज्ज होतो. ‘मला तुझा अभिमान वाटतो’ या राधाच्या उद्गारांबरोबर पडदा पडतो.

एका संवेदनशील विषयावर प्रत्ययकारी शब्दांत लिहिलेलं हे नाटक ‘अजिंक्यतारा’च्या कलावंतांनी समर्थ अभिनयानं जिवंत केलंय. राजचा पापभीरूपणा, राधाच्या मनातली चीड आणि सरीनच्या मनातली भीतियुक्त अस्वस्थता प्रभावी वाटते. ध्वनिक्षेपकाच्या आवाजाच्या पातळीत थोडी वाढ केली असती, तर संवाद सुस्पष्ट ऐकता आले असते. गतिमानतेचा काहीसा अभाव दूर केला, तर एकूणच सादरीकरण प्रभावी ठरू शकेल.

संपर्क : राजेंद्रप्रसाद मसुरकर : ९९६०२ ४५६०१

(नाट्य स्पर्धेतील नाटकांचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link