Next
पिडीत महिला झाल्या ‘स्वयंसिद्धा’
प्रेस रिलीज
Saturday, January 27 | 05:39 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘मी जेव्हा माझ्या खटल्यासाठी कौटुंबिक न्यायालयात आले तेव्हा मला खूप भीती वाटत होती. अगदी समुपदेशकांसमोरही मी माझी व्यथा सांगू शकत नव्हते; पण ‘स्वयंसिद्धा’ योजनेतून मी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेऊ लागले आणि तिथे मला माझ्यासारख्याच इतर मैत्रिणी भेटल्या. आता एकत्र येऊन व्यवसाय सुरू करायचा आमचा विचार आहे....’, हे बोल आहेत आधी दुःखाने खचलेल्या; पण आता प्रशिक्षणातून आत्मविश्वास मिळवून ताकदीने उभ्या राहिलेल्या एका ‘स्वयंसिद्धे’चे.

पुणे कौटुंबिक न्यायालयाने पिडीत महिलांना आधार देण्यासाठी सुरू केलेल्या ‘स्वयंसिद्धा’ या उपक्रमास ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१’अंतर्गत ‘रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी’तर्फे आर्थिक सहाय्य लाभले असून, त्यातून पहिल्या दहा लाभार्थी महिलांनी विविध व्यवसायपूरक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. ‘रोटरी’तर्फे कौटुंबिक न्यायालयात नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात या महिलांचा सत्कार करण्यात आला.

पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश एस. एस. सावंत, न्यायाधीश स्वाती चौहान, ‘रोटरी’चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभय गाडगीळ, ‘फर्स्ट लेडी’ दीपा गाडगीळ, ‘रोटरी इंटरनॅशनल’चे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी, रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष पल्लवी देशपांडे, रो. अॅड. वैशाली भागवत, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कावडे, विवाह समुपदेशक सुदाम गायके, समुपदेशिका स्मिता जोशी आदी या वेळी उपस्थित होते.

‘स्वयंसिद्धा’ या उपक्रमात कौटुंबिक न्यायालयात खटले सुरू असलेल्या स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी त्यांना ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, नर्सिंग अटेंडंट, टीचर्स ट्रेनिंग अशा व्यवसायपूरक अभ्यासक्रमांसाठी प्रोत्साहन दिले जात असून, ‘रोटरी’मार्फत त्यांना अर्थसाहाय्य पुरवले जाते. या उपक्रमाचा प्रवास मांडणाऱ्या अहवालाचे या वेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
​​
‘या उपक्रमासाठी ‘रोटरी’ केवळ पैसा पुरवत नसून आम्ही रोटरियन्स मनापासून या कामासाठी तयार आहोत. कल्याण बॅनर्जी यांच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही ‘रोटरी’च्या ‘ग्लोबल ग्रँटस्’मधूनही यासाठी निधी मिळवण्यास प्रयत्नशील राहू,’ असे अभय गाडगीळ यांनी सांगितले.

हा उपक्रम सुरू करताना आलेली आव्हाने आणि पीडित महिलांच्या दैनंदिन प्रश्नांबद्दल न्या. चौहान यांनी सांगितले. ‘आगामी काळात पुण्याबरोबरच महाराष्ट्रात इतरही कौटुंबिक न्यायालयांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल अशी आशा वाटते,’ असे न्या. एस. एस. सावंत म्हणाल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link