Next
‘पिफ २०१९’मध्ये सात मराठी चित्रपटांची बाजी
चिलीतील ‘डॅम किड्स’ स्पॅनिश चित्रपटाने सुरुवात
BOI
Monday, January 07, 2019 | 05:53 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १० ते १७ जानेवारी २०१९ दरम्यान होणाऱ्या १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा सात चित्रपट निवडले गेले आहेत’, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या चित्रपटांच्या नावांसह महोत्सवात परीक्षण करणाऱ्या तज्ज्ञ परीक्षकांची नावे, ‘पिफ फोरम’ अंतर्गत होणारे कार्यक्रम, ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’, ट्रिब्युट, देश-विशेष (कंट्री फोकस), विद्यार्थी स्पर्धात्मक विभाग या अंतर्गत निवडल्या गेलेल्या चित्रपटांची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, सतीश आळेकर, अभिजित रणदिवे, फाउंडेशनच्या विश्वस्त सबिना संघवी, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, डॉ. मोहन आगाशे हे देखील या वेळी उपस्थित होते.

‘डॅम किड्स’ चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे.
‘चिलीमधील ‘डॅम किड्स’ हा गोन्जालो जस्टिनिअॅनो दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपटाने ‘पिफ’ची सुरुवात होणार आहे. या वर्षी विविध विषयांवर भाष्य करण्याबरोबरच हलके फुलके विषयदेखील समर्थपणे मांडणाऱ्या मुळशी पॅटर्न, नाळ, खटला बिटला, भोंगा, चुंबक, बोधी, दिठी या सात मराठी चित्रपटांची निवड मराठी स्पर्धात्मक विभागात झाली आहे. याशिवाय या वर्षी ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मेहबूब खान (भारतीय) यांचे ‘अमर’, ‘अंदाज’ आणि ‘मदर इंडिया’ हे चित्रपट, तर इटालियन दिग्दर्शक बर्नार्डो बर्टोलुस्सी (आंतरराष्ट्रीय) यांचे ‘द लास्ट एम्परर’, ‘लिटील बुद्धा’ आणि ‘लास्ट टॅन्गो इन पॅरिस’ हे चित्रपट दाखविले जातील,’असेही पटेल यांनी सांगितले.

‘याबरोबरच नजीकच्या काळात निधन पावलेल्या काही मान्यवर कलाकारांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ‘ट्रिब्युट’ विभागा अंतर्गत अभिनेत्री श्रीदेवी यांचा ‘इंग्लिश विंग्लिश’, दिग्दर्शिका कल्पना लाझमी यांचा ‘रुदाली’ आणि पटकथाकार शिनोबु हशीमोटो यांचा ‘टू लिव्ह’ हे चित्रपट दाखविण्यात येतील. तर ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचा ‘भुवन शोम’ हा चित्रपट दाखवून त्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे. तर देश-विशेष (कंट्री फोकस) विभागात हंगेरीचे चार, अर्जेंटीनाचे सहा, तर टर्कीमधली तीन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. विद्यार्थी विभागातील लाईव्ह अॅक्शन विभागात लिथुनिया, अमेरिका, भारत, स्वित्झर्लंड आणि मॅक्सिको या पाच देशातील सहा चित्रपट, तर अॅनिमेशन विभागात अमेरिका, इटली, झेक रिपब्लिक, इंग्लंड, भारत, स्लोव्हाकीया, फ्रान्स, स्वीडन, ब्राझील, रशिया या दहा देशातील एकूण १६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे,’असे पटेल यांनी नमूद केले. 

‘ज्या रसिकांना त्यांच्या कार्यालयीन वेळांच्या कारणामुळे ‘पिफ’मधील चित्रपटांचा आस्वाद घेता येत नाही, त्यांच्यासाठी रात्री नऊ ते ११ या वेळेत ‘एनएफएआय’मध्ये चित्रपट दाखवण्यात येणार आहेत,’ अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी या वेळी दिली. 

‘याशिवाय संग्रहालयाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त एका खास प्रदर्शनाचे आयोजन ‘पिफ फोरम’ मध्ये करण्यात येणार असून, महात्मा गांधी यांना चलचित्र आदरांजली वाहण्यात येणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' आहे. याचाच एक भाग म्हणून श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेली ‘द मेकिंग ऑफ महात्मा’ आणि रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले.

‘महोत्सवादरम्यान दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगभरातून सात देशातील एकूण आठ तज्ज्ञ परिक्षकांची निवड करण्यात आली असून, यामध्ये भारतातील प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शक बी. लेनिन, स्वीडनचे अभिनेते आणि दिग्दर्शक क्रिस्टर होमग्रेन, इटलीची वेशभूषाकार डॅनिएला सिअॅन्सिओ, फिलिपिन्सचे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माते जोसेफ इस्त्राईल लेबन, भारतातील ‘जलवा’, ‘तेजाब’, ‘खलनायक’ आणि ‘रंग दे बसंती’ या चित्रपटांचे पटकथा लेखक कमलेश पांडे, श्रीलंकेचे दिग्दर्शक प्रसन्ना विथांगे, इराणच्या प्रसिद्ध अभिनेत्री शबनम घोलीखानी, जर्मनीचे दिग्दर्शक आणि सिनॅमॅटोग्राफार थोर्सटन श्युट यांचा समावेश आहे. याबरोबरच मान्यवर व्यक्तींची व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून चित्रपटांची विविध अंगांनी माहिती या ठिकाणी मिळणार आहे,’ असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

‘पिफ फोरमच्या प्रवेशद्वारास ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके आणि ज्येष्ठ कवी व गीतकार ग. दि. माडगूळकर यांचे नाव देण्यात येणार आहे, तर या फोरमच्या व्यासपीठास ज्येष्ठ लेखक पु. ल. देशपांडे यांचे नाव दिले जाणार आहे. याबरोबरच ज्येष्ठ संगीतकार नौशाद, स्नेहल भाटकर आणि ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांच्या आठवणींनाही या ठिकाणी उजाळा देण्यात येणार आहे. या वर्षी लष्कर भागातील आयनॉक्स चित्रपटगृहाचाही महोत्सवाच्या चित्रपटगृहांमध्ये समावेश करण्यात आला आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली.

अधिक माहितीसाठी :
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search