Next
मुख्‍यमंत्र्यांच्या हस्‍ते नाना वाड्याचे पुनरुज्जीवन
‘स्वराज्य’ क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, June 24, 2019 | 05:38 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पुण्यनगरीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम ‘स्वराज्य’ या क्रांतिकारकांच्या संग्रहालयात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पेशवेकालीन नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व ‘स्वराज्य’ क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘नाना वाड्याचे पुनरुज्जीवन करून महापौर आणि नगरसेवक यांनी अभिनंदनीय कार्य केले आहे. पुण्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंची कमी नाही. आपल्या देशाला पाच हजार वर्षांची संस्कृती आहे. आपण आपल्या देशाचा इतिहास जतन केला पाहिजे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाणीतून त्या किल्ल्यांची माहिती ऐकण्याची पर्वणी असते. राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करण्याचे काम राज्य शासनाने दोन वर्षांपासून हाती घेतले आहे. रायगड किल्ल्याचे संपूर्णपणे संवर्धन केले जात आहे, तेथे झालेल्‍या उत्खननात २५०पेक्षा अधिक साइट सापडल्या आहेत. त्यातून महाराजांचे दैदीप्यमान चित्र समाजापुढे उभे राहणार आहे.’


‘आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा समाजापुढे आला नाही, तर समाज ऊर्जावान होऊ शकत नाही, नाना वाड्याचे पुनरुज्जीवन हा या शृंखलेतील एक भाग आहे. नाना वाड्यातील संग्रहालय ‘इतिहासाचे चालते बोलते पुस्तक’ असून, या ठिकाणी दैदीप्यमान इतिहास मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. पुणे महापालिकेतर्फे अशा पद्धतीने होणाऱ्या कामास राज्य सरकार पूर्ण मदत करेल,’ असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. या वेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. 

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही थोडक्‍यात आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. मी विद्यार्थी आहे, असे नम्रपणे नमूद करून देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी हाल-अपेष्‍टा सहन करणाऱ्या एका तरी क्रांतीकारकाचे चरित्र पूर्णपणे वाचण्याचे आवाहन त्यांनी केले. 


खासदार बापट यांनी हा एक ऐतिहासिक कार्यक्रम असल्‍याचे सांगितले. पुणे शहराला सांस्‍कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, औद्योगिक वारसा असल्‍याचा उल्‍लेख करुन स्‍मार्ट सिटीच्‍या माध्‍यमातून पुणे शहराला आदर्श शहर बनविण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. नाना वाड्यातील संग्रहालयामुळे आजच्‍या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

महापौर टिळक यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकात या संग्रहालयाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, नानावाडा ही वर्ग एक दर्जाची ऐतिहासिक वास्तू असल्‍याचे सांगितले. १७४० ते १७५० या कालावधीत पेशव्यांचे मंत्री असलेल्या नाना फडणवीसांनी हा वाडा बांधून घेतला. या वाड्याचे क्षेत्रफळ सुमारे दोन हजार चौरस मीटर आहे. या वाड्यामध्ये ब्रिटीशकालीन दगडी इमारत आणि एल आकारातील मूळ पेशवाई वास्तू यांचा समावेश आहे. सागवानी लाकडात बनवलेल्या तुळ्या, दगडी खांब, दुर्मिळ मेघडंबरी, नाजूक कलाकुसर असलेले फॉलसिलिंग,  दिवाणखाना, दुर्मिळ भीत्तीचित्रे ही या वाड्याची वैशिष्ट्ये आहेत. ही सर्व वैशिष्‍ट्य जतन करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 


या वाड्यात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी क्रांतीकारकांची माहिती असणारे संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यात तळमजल्यावरील ११ खोल्यांत स्वागत कक्ष, उमाजी नाईक, वासूदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद या क्रांतिकारकांचे तसेच १८५७चे युद्ध, आदिवासींचा उठाव, नेमस्तांची चळवळ, बाळ गंगाधर टिळक, चापेकर बंधू, जोतिबा-सावित्रीबाई फुले, शाहू महाराज या समाजसुधारकांचे जीवन चरित्र यामध्ये दर्शविण्यात आले आहे.

उद्घाटनापूर्वी फडणवीस यांनी या संग्रहालयाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी स्‍थायी समिती अध्‍यक्ष सुनील कांबळे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, राजेश येनपुरे, गायत्री खडके, तसेच नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search