Next
वाचाल तर...सर्वच वाचाल!
BOI
Monday, September 17, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:उद्या (१८ सप्टेंबर) रोजी आंतरराष्ट्रीय ई-बुक वाचन दिन आहे. हा वाचन दिवस जगात सर्वप्रथम २०१४मध्ये आयोजित करण्यात आला होता. वाचनाने स्वरूप बदलले असले, तरी वाचनाच्या प्रसाराची धडपड काही कमी झालेली नाही. म्हणून ई-बुकच्या वाचनाच्या प्रसारासाठी हा दिवस साजरा केला जातो. या औचित्याने विशेष लेख...
.............
तैलात् रक्षेत् जलात् रक्षेत्, रक्षेत शिथिल बंधनात्। 
मूर्खहस्ते न दातव्यं एवं वदति पुस्तकम्।।’

अशी एक संस्कृत उक्ती आहे. पुस्तकाचे रक्षण तेलापासून आणि पाण्यापासून करावे. तसेच मूर्ख म्हणजे अरसिक माणसाच्या हातीही ते देऊ नये, असे प्रत्येक पुस्तक सांगत असते, असा या सुभाषिताचा अर्थ. भूर्जपत्रांवर लिहिलेल्या आणि मुद्रणाची सोय नसलेल्या त्या काळात पुस्तकांची अशी जपणूक करणे हे वाचकांचे कर्तव्यच होते. भारतीयांच्या बाकी उणिवा काहीही असोत, त्यांचे पुस्तकप्रेम हा कौतुकाचा गुण खरा. 

भारतीय लोकांनी आपले हे पुस्तकप्रेम आजही जपून ठेवले आहे. उगाच नाही भारत ही पुस्तकांची जगातील सहाव्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. वर्ष २०१६मध्ये आलेल्या एका अहवालानुसार भारत ही जगातील पुस्तकांची सहावी मोठी बाजारपेठ तर आहेच; पण इंग्रजी भाषक देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. आपल्या देशात सुमारे १९ हजार प्रकाशन संस्था असल्याचा एक अंदाज आहे आणि दर वर्षी ९० हजारांहून अधिक पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. आकड्यांच्या दृष्टीने पाहू जाता, २०१५मध्ये भारतातील पुस्तकांची बाजारपेठ २६१ अब्ज रुपयांची होती आणि वर्ष २०२०पर्यंत ती ७३९ अब्ज रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. 

एवढेच कशाला, जगातील इतर कोणत्याही समुदायापेक्षा भारतीय वाचक अधिक वेळ पुस्तके वाचतात. दोन वर्षांपूर्वी ‘एनओपी वर्ल्ड कल्चर स्कोअर इंडेक्स’ने केलेल्या पाहणीत हा निष्कर्ष काढला होता. त्या अहवालानुसार भारतीय लोक दर आठवड्याला १०.४ तास वाचन करतात. याचाच अर्थ ते दर दिवशी सरासरी अडीच तास वाचन करतात. भारतानंतर थायलंड आणि चीन यांचा अनुक्रमे ९.२४ तास आणि आठ तासांसह दुसरा आणि तिसरा क्रमांक होता. आजच्या घडीला भारताचा साक्षरता दर ७४.०४ टक्के आहे (२०११च्या जनगणनेनुसार), तर थायलंड, चीन, फिलिपाइन्स, इजिप्त यांसारख्या देशांमध्ये साक्षरता क्रमश: ९३.५ टक्के, ९५.१ टक्के, ९५.४ टक्के आणि ७३.९ टक्के आहे. अन् तरीही वाचनाच्या बाबतीत ते मागे आहेत. उद्या भारतातही या देशांसारखी व्यापक साक्षरता निर्माण झाली तर आपण कुठल्या कुठे जाऊ, याचा अंदाज करता येऊ शकतो. परंतु एकीकडे वाचन कमी झाले आहे, तरुणांमध्ये वाचनाची प्रवृत्ती नाही, आजकाल कोणी वाचत नाही, अशी नकारवादी छापाची वाक्य ऐकू येत असताना हा चमत्कार कसा काय घडू शकतो? याचे उत्तर आहे ई-बुकमध्ये. लोकांमध्ये वाचनाची प्रवृत्ती जराही कमी झालेली नाही. फक्त त्यांची वाचनाची साधने बदलली आहेत. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठांची दोन टोके आणि त्यामध्ये ओळीने लावलेली शे-दोनशे पाने, हे झाले पुस्तकांचे जुने स्वरूप. त्याच स्वरूपात पुस्तके वाचण्याची आज आपल्यावर सक्ती नाही. ई-बुकच्या रूपाने तो आनंद आता आपल्या मुठीत आला आहे. कागदी पुस्तकांची जागा इलेक्ट्रॉनिक पडद्याने घेतली आहे, एवढेच. ई-पुस्तकाच्या शोधाने आपण अशा टप्प्यावर आलो आहोत, की जिथे वाचन नावाचे सुख मिळविण्यासाठी पुस्तकाची दुकाने किंवा ग्रंथालये धुंडाळण्याची गरज नाही. संगणक, टॅब्लेट किंवा अगदी मोबाइल बाळगणारी व्यक्तीही आज वाचन नावाचे सुख अनुभवू शकते. किंडल, नूक्स आणि मोबाइलवरील ई-रीडर अॅप्सच्या माध्यमातून आज हा एक जगड्व्याळ उद्योग बनला आहे.

त्याचा एक फायदा असा झाला, की आपल्या वाचनानंदासाठी दर वर्षी शेकडो झाडे तोडण्याची गरज राहिली नाही. ‘व्याघ्रस्य चोपवासेन पारणं पशुमारणं’ अशी एक ओळ एका संस्कृत सुभाषितात आहे. ‘वाघाला उपवास सोडायचा असला, की हरिणासारख्या प्राणांचे मरण ओढवते,’ असा त्या सुभाषिताचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे वाचनाने कोणाच्या आयुष्याला वळण मिळणार असले, तरी ते वळण मिळण्यासाठी गदा झाडांवरच येणार. कारण पुस्तकांसाठी कागद झाडांपासूनच बनतात...!
ई-बुकने आणखी काय केले, की कट्टरातील कट्टर पुस्तकप्रेमीलाही कधी ना कधी भेडसावणारी समस्याच संपवून टाकली. पुस्तके कुठे ठेवायची, ही ती समस्या. जाडजूड पुस्तकांना सांभाळून ठेवणे आणि त्यांचे जतन करणे, ही एक अवघड कामगिरी असते. वर उल्लेख केलेल्या संस्कृत सुभाषितात त्याची केवळ एक झलक आली आहे. स्वयं-प्रकाशित (सेल्फ-पब्लिश) पुस्तकांनी ई-बुक्सच्या बाजारपेठेला मोठा हात दिला आहे. 

भारतीय संदर्भात ई-पुस्तकांची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आणखी जास्त आहे, त्याचे कारण म्हणजे त्यांची किंमत. छापील पुस्तकांपेक्षा ई-पुस्तके केव्हाही स्वस्त पडतात. अॅमेझॉनवरील ई-पुस्तक वाचण्यासाठी तुम्हाला किंडल विकत घ्यायलाच पाहिजे, असे नाही. अगदी अँड्रॉइड फोनवरही किंडलचे अॅप उपलब्ध आहे. एकदा हे अॅप डाउनलोड झाले, की पुस्तकांचा खजिना तुमचा! चकटफू आणि विकत - दोन्हीही!

असे असले तरी आजही भारतीय समाजात ई-बुकपेक्षा जास्त मान आणि भाव (सर्वार्थाने) छापील पुस्तकांना आहे. या संबंधात मी काही महिन्यांपूर्वी याच सदरात लिहिले होते. परंतु भारतच कशाला, जगात अन्यत्रही ई-बुक काहीसे मागे पडत असून, छापील पुस्तकांची सद्दी काही संपता संपत नाही, असे दिसते. या वर्षीच्या मे महिन्यात ‘इलेक्ट्रॉनिक मार्केट्स’ नावाच्या नियतकालिकात एका पाहणीचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यात नवयुवकांमध्ये छापील पुस्तकांनाच जास्त मागणी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यामागचे कारणही मजेदार होते. 

इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये (किंडल, मोबाइल इत्यादी) पुस्तके मोठ्या संख्येने सामावत असली, तरी एखादे पुस्तक आपल्या मालकीचे आहे, ही भावना ज्याप्रमाणे भौतिक पुस्तकांमध्ये निर्माण होते, तशी ई-पुस्तकांमध्ये निर्माण होत नाही. त्यामुळे सर्व वयोगटांतील वाचकांमध्ये छापील पुस्तकांनाच जास्त मागणी आहे, असे त्या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. शिवाय छापील पुस्तकांचा स्पर्श आणि अनुभव याबाबतही काही व्यक्ती अगदी संवेदनशील असतात. पुस्तकांच्या वासाशी त्यांची अगदी जवळीक असते. पुस्तकांचा सुवास ही जणू ‘मर्मबंधातली ठेव’ असल्याचे मानणारी वाचक मंडळी हजारोंनी नाही तरी शेकड्यांनी मिळू शकतात. ‘एखादे वनफूल तुम्ही ई-पुस्तकात कसे दडवून ठेवाल,’ असा प्रश्न लेव्हिस बझबी या लेखकाने एकदा उपस्थित केला होता!

कदाचित म्हणूनच आंतरराष्ट्रीय ई-बुक दिवस वाचन दिन साजरा केला जात असावा. वाचनाने स्वरूप बदलले असले, तरी वाचनाच्या प्रसाराची धडपड काही कमी झालेली नाही. अनेक वर्षे चालू असलेली तीच धडपड आज आंतरराष्ट्रीय ई-बुक वाचन दिनाच्या रूपाने साकार झाली आहे. दर वर्षी १८ सप्टेंबर रोजी साजरा होणारा हा वाचन दिवस जगात सर्वप्रथम २०१४मध्ये आयोजित झाला. ओव्हरड्राइव्ह नावाच्या प्रमुख ई-बुक वितरक कंपनीने त्याचे आयोजन केले होते. ही कंपनी अनेक प्रमुख ठिकाणी ई-बुकचे वितरण करते; मात्र मुख्यतः ग्रंथालयांना ई-पुस्तकांची सर्वांत मोठी पुरवठादार कंपनी म्हणून ती ओळखली जाते. यंदाही हा दिवस साजरा होईल. तो होईल तेव्हा छापील आणि इलेक्ट्रॉनिक, असा भेद न करता आपण वाचायला हवे. कारण आपल्या पूर्वसुरींनी सांगितलेच आहे- वाचाल तर वाचाल! 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(मराठीतील विविध विषयांवरील हजारो ई-बुक्स बुकगंगा डॉट कॉम या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अनेक ई-बुक्स मोफतही उपलब्ध आहेत. या वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search