Next
रत्नागिरीत २८ एप्रिलपासून मांडवी पर्यटन महोत्सव
प्रेस रिलीज
Tuesday, April 10, 2018 | 04:46 PM
15 0 0
Share this article:

मांडवी पर्यटन महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत डावीकडून काका तोडणकर, राजीव कीर, रूपेंद्र शिवलकर, रशिदा गोदड, दया चवंडे.

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी २८ एप्रिल ते एक मे २०१८ या कालावधीत मांडवी पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था आणि श्री देव भैरव देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी श्री देव भैरव देवस्थानचे अध्यक्ष रूपेंद्र शिवलकर, नगरसेवक बंटी कीर, नगरसेविका दया चवंडे, रशीदा गोदड, नितीन तळेकर, राजन शेटे, बिपिन शिवलकर, संतोष शिवलकर, काका तोडणकर, प्रवीण रुमडे, मनीषा बेडगे, शंकर मिलके, आदित्य वारंग यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कीर म्हणाले, ‘शहरातील पर्यटन व्यवसायाला चालना देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे, स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवसायाकडे आकर्षित करणे या हेतूने हा महोत्सव गेल्या वर्षीपासून सुरू केला आहे. २८ एप्रिलला सायंकाळी मांडवी भैरी मंदिर ते मांडवी समुद्रकिनारा या मार्गावर शोभायात्रा निघणार असून, सहा वाजता वाळूशिल्प, खाद्य महोत्सवाच्या उद्घाटनाने महोत्सवाला सुरुवात होईल.’

‘या महोत्सवामध्ये स्थानिक मच्छिमार मुलांच्या मदतीने पर्यटकांना मासेमारीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे; तसेच मासे पकडण्याचा ‘रापण’ हा प्रकार पर्यटकांना सहभागी होऊन अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी घोडागाडी रपेट, फनफेअर असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. व्यवसायांत आणि कलाविष्कारांमध्ये स्थानिकांना जास्तीत जास्त वाव दिला जाणार आहे. पर्यटकांना कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद देण्यासाठी खेकडे, कोळंबी, कालवे, मटण-वडे, कोंबडी-वडे, भाकरी, बिर्याणी यांबरोबरच जांभूळ, करवंद, तोरणे, काजू आदी रानमेव्याची चव चाखायला मिळणार आहे,’ असे कीर यांनी सांगितले.

महाबळेश्वरचे प्रसिद्ध स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, आरोग्यवर्धक नीरा स्ट्रॉबेरी वाइन हे या महोत्सवाचे खास आकर्षण आहे. उद्घाटनासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्ष राहुल पंडित, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, माजी आमदार बाळ माने, तर समारोपासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांना आमंत्रित केल्याचे कीर यांनी या वेळी सांगितले.

‘या महोत्सवांतर्गत रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटनेतर्फे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धाही घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ जलतरणपटू शंकर मिलके यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रकाश नाडर उपस्थित राहणार आहेत. नाडर हे दोन्ही पायांनी अपंग असूनही त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. १० आंतरराष्ट्रीय पदके, १३५ राष्ट्रीय पदके, दोन जागतिक साहसी स्पर्धा पदके, तीन राष्ट्रीय साहसी पदके पटकावली आहेत. ते मूळचे तमिळनाडू येथील असून, वेगवेगळ्या १५ राज्यांत त्यांनी आतापर्यंत ११० वेळा रक्तदान केले आहे,’ असेही कीर यांनी सांगितले.

(या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pranali Mohan Zapdekar. About
Very Nice Good Job 🙏🙏🙏🙏
2
0
Yasin Jamadar About
Best Wishes From Headmaster RNP School Nana Sure School Mandavi Ratnagiri
2
0
mrs.anagha thakurdesai About
स्तुत्य उपक्रम आहे. आपणाला हार्दिक शुभेच्छा
1
0

Select Language
Share Link
 
Search